स्वयंपाकघरातील सोबती

विजया आगाशे
मंगळवार, 23 एप्रिल 2019

स्वयंपाकघर हे प्रत्येक स्त्रीचे कार्यक्षेत्र असते. हक्काचे व मानाचे. ती तिच्या भांड्याकुंड्यातच रमलेली असते.

स्वयंपाकघर हे प्रत्येक स्त्रीचे कार्यक्षेत्र असते. हक्काचे व मानाचे. ती तिच्या भांड्याकुंड्यातच रमलेली असते.

लग्नानंतर माझ्या सासूबाईंनी मोठ्या विश्‍वासाने माझ्या हाती सोपविलेल्या कढईने मला जीव लावला. छान छान परतून भाज्या, खमंग पिठले, तऱ्हतऱ्हेचे तळलेले पदार्थ करण्यात या बाईसाहेब एकदम पटाईत. रवा, दाणे भाजणे ही कामेही आनंदाने करतात. पण खूप दिवसांत वापरले नाही, तर मात्र रुसून बसतात. मग या आयर्नपॉटचा रुसवा लिंबू लावून घासून-पुसून काढावा लागतो. भाज्यांबरोबर लोह विपुल प्रमाणात पुरवितात. यांच्याच कुळातली छोटीशी लोखंडाची पळी! तोंडी लावण्यांवर लसूण-मिरचीची झणझणीत फोडणी घालतात. आजच्या धावपळीच्या आयुष्यात लोखंडी कढई वापरणे जमणार नाही, पण लोखंडी पळी तरी नक्की वापरा असे मी आवर्जून सांगेन. तांब्याचे बूड असलेल्या पातेलीत भाज्या चांगल्या शिजतात. या पातेल्यांचा स्वयंपाकघरात प्रवेश होण्यापूर्वी मी पितळेची पातेली वापरत होते. पण त्यांना कल्हई लावून घेणे कठीण होत गेले तसा कॉपर बॉटमच्या भांड्यांचा पर्याय शोधला.

शेजारणीकडे वाटीभर साखर किंवा विरजण मागायला वाटी उपयोगी! जेवताना एक वाटी पुरते, पण बाहेर जेवायला गेल्यावर तीन-चार वाट्यांमधून वेगवेगळे पदार्थ पुढे येतात. ते कसे संपवायचे असा मला प्रश्‍न पडतो. चमच्यांचे अनेक प्रकार. अगदी चहा-साखरेत ठेवायचे बिनदांड्याचे चमचे. सुपारी व मिसळण्याच्या डब्यातले छोटे चमचे, रोज लागणारे वेगळे. तरी हे बिचारे उगीचच बदनाम होतात. कोणी दुसऱ्याच्या कामात ढवळाढवळ करू लागले तरी ऐकवले जाते, चमचेगिरी करू नकोस म्हणून. संत महात्मे जसे संसारतापापासून अलिप्त असतात, तसाच हा निर्लेप तवा. कोणतीच गोष्ट आपल्या अंगाला चिकटवून घेत नाही. डबे तर किती प्रकारचे! किती हौसेने वेगवेगळे प्रकार मी जमविले आहेत, तरीपण लग्नात आईने दिलेल्या चहासाखरेच्या डब्यांवरून हात फिरविताना तिचा प्रेमळ स्पर्श आठवत राहतो. असेच कुणी प्रेमाने म्हणून दिलेले डबे, कुंडे यांच्याकडे बघताना त्या व्यक्तीच्या आनंददायी आठवणीत मन रमून जाते. लहान मुली भातुकली खेळताना चूल-बोळक्‍यांच्या संसारात रंगून जातात, तशीच मी याही वयात भांड्याकुंड्यात रमलेली असते.

Web Title: muktapeeth article written by vijaya aagashe