आठवणी जलप्रलयाच्या (मुक्तपीठ)

Vitthal maniyar
मंगळवार, 12 जुलै 2016

पानशेत धरण फुटल्याच्या भीषण आठवणींनी आजही अंगावर शहारे येतात. लाकडी पुलाच्या पाच-सहा फूट उंचीवरून पाणी घोंघावत होते. पूल पार करू न शकलेली काही माणसे वाहून जात होती. आम्हाला थोडासा उशीर झाला असता तर! आम्ही थोडेबहुत पूरग्रस्तांच्या मदतीस धावून जाऊ शकलो, एवढेच काय ते मनास समाधान.

पानशेत धरण फुटल्याच्या भीषण आठवणींनी आजही अंगावर शहारे येतात. लाकडी पुलाच्या पाच-सहा फूट उंचीवरून पाणी घोंघावत होते. पूल पार करू न शकलेली काही माणसे वाहून जात होती. आम्हाला थोडासा उशीर झाला असता तर! आम्ही थोडेबहुत पूरग्रस्तांच्या मदतीस धावून जाऊ शकलो, एवढेच काय ते मनास समाधान.

"याचि देही याची डोळा‘ पाहिलेल्या पानशेत प्रलयाच्या आठवणींनी मन आजही सुन्न होते.. आम्ही बी.एम.सी.सी. कॉलेजात असतानाच धरण फुटल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. सकाळी साडेदहाची वेळ. मुठा नदीला अचानक पूर आलेले पाणी पाहण्यासाठी शरद पवार, अभय कुलकर्णी, भिका वाणी, विजय शहा, चंदू चोरडिया, मी आणि अन्य काही मित्र सायकलवरून लाकडी पुलावर पोचलो. समोरून पाण्याचा लोंढा प्रचंड वेगाने झेपावत होता. पुलावरून माणसांची गर्दी हटवण्याची पोलिसांची घाई चालली होती. आम्हाला अक्षरशः ओढून पोलिसांनी पूल पार करावयास लावले. पाण्याचे उग्र रूप पाहून आम्ही अलका टॉकिजच्या बाजूला टिळक रोडकडे पळालो. मागे पाहिले तर अक्षरशः धडकी भरणारे भयाण दृश्‍य दिसले. लकडी पुलाच्या पाच-सहा फूट उंचीवरून पाणी घोंघावत होते. पूल पार करू न शकलेली काही माणसे वाहून जात होती. आम्हाला थोडासा उशीर झाला असता तर? विचारानेच घाम फुटला.

पुरात सापडलेल्यांचे काय, हा विचार मनात येताच, नारायण पेठेत नदीकाठी राहणारे आमचे पी.टी. शिक्षक, ज्युदोपटू खाणीवाले सरांची आठवण झाली. पाण्याने नारायण पेठेला वेढले होते. खाणीवाले सर आणि त्यांच्या पत्नी टिळक रोडच्या बाजूस हताशपणे उभे असलेले दिसले. सरांना आम्ही भेटताच त्यांना अश्रू आवरेनात. त्या परिस्थितीतही सर म्हणाले, "अरे, संसार काय; तो उभा करता येईल. परंतु आयुष्यभरात मिळवलेली जागतिक खेळातील पदके, प्रमाणपत्रांसारखा अमूल्य ठेवा परत कसा मिळणार?‘ ते सर्व पुरात वाहून गेले होते. सरांची आणि काकूंची जबाबदारी सरांचा विद्यार्थी दीपक टिळकने घेतली. आमचा मित्र, प्रसिद्ध टेनिसपटू दत्ता शिंदे त्याच्या "शिंदे स्पोर्टस‘मधील क्रीडासाहित्य बाहेर काढण्याची धडपड करीत होता. पाणी टिळक रोडच्या बाजूसही येऊ लागले होते. जे काही सामान काढता आले, ते घेऊन आम्ही त्याला सुरक्षित जागेवर घेऊन गेलो.

दुपारी चारनंतर पाणी ओसरू लागले. रात्री आम्ही धनाजी जाधव याच्या नगरपालिकेसमोरील घरी निघालो. नवा पूल बंद होता. बंडगार्डन पुलावरून रेंज हिलमार्गे शिवाजीनगरला पोचलो. तीन मजली घरात दोन मजल्यांपर्यंत पाणी भरलेले होते. शरद पवार, श्रीनिवास पाटील हे खाद्यपदार्थ, मेणबत्त्या, दोरी, बॅटरी आदी वस्तू घेऊन आले. सर्वांनी घर स्वच्छ केले. त्या रात्री संपूर्ण पुणे भीतीने जागे होते.

सकाळ उजाडली, ती खडकवासला धरण फुटल्याची अफवा घेऊनच. असं म्हटलं जायचं, की खडकवासला धरण फुटलं तर अख्खं पुणे शहर वाहून जाईल. त्या भीतीपोटी शहरभर गोंधळ माजला होता. हाती लागेल ते सामान घेऊन जो तो सुरक्षिततेसाठी उंच भागात पोचण्याचा प्रयत्न करीत होता. मुलाबाळांचेदेखील भान कुणाला नव्हते. "पाणी आपल्या भागात आलंय, पळा‘, एवढेच प्रत्येकजण बोलत होता. स्वतःचा जीव वाचवण्याच्या धडपडीत कित्येकजण आपल्या बायका-मुलांनाही सोडून पळत होते. मी आणि चंदू त्याच्या घराच्या तिसऱ्या मजल्यावरील पत्र्यावर उभे होतो. लांब डोंगरावर माणसे मुंग्यांसारखी दिसत होती. पोलिसांच्या गाड्या "धरण फुटल्याची अफवा आहे, शांत राहा‘ असे सांगत फिरत होत्या. धरण फुटल्याची अफवा होती, हे तासाभरानंतर लोकांना कळले. पानशेत धरणफुटीमुळे संपूर्ण पाणी वाहून गेले होते. पुराची भीती राहिलेली नव्हती.

पुढचा प्रश्‍न होता पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचा आणि तात्कालिक मदतीचा. त्या हेतूने त्यावेळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि शिवाजीनगर मतदारसंघातून नुकतेच निवडून येऊन मंत्री झालेले स. गो. बर्वे पुण्यात आले होते. पूरग्रस्तांना तात्कालिक मदतीच्या दृष्टीने "पूना मर्चंट चेंबर्स‘ या व्यापाऱ्यांच्या संघटनेमार्फत केसरीवाड्यात मोफत अन्नधान्यवाटपाचा कार्यक्रम हाती घेतला होता. आम्ही सर्व मित्रांनी पवारांच्या नेतृत्वाखाली या कामात गुंतवून घेतले. वेळ मिळेल तसे स्वच्छतेच्या कामातही भाग घेत असू. माणुसकीचा प्रत्यय त्या काळात आम्ही सर्वांनी घेतला. थोडेबहुत पूरग्रस्तांच्या मदतीस धावून जाऊ शकलो, एवढेच काय ते मनास समाधान..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth vitthal maniyar