esakal | अनाथांचा नाथ
sakal

बोलून बातमी शोधा

अनाथांचा नाथ

अनाथांचा नाथ

sakal_logo
By
- मीना जोशी

गिरणीच्या दारात दिशा उजळताना एखाद्या नारायणालाच गंगाराम सुर्वे यांच्या घराचा आसरा आणि नाव मिळते. इतरांच्या भाळी नाकारलेपणाचा टिळा... 

ही हृदयद्रावक कहाणी आहे भारतातील लाखो मुलांची. आई-वडिलांना किंवा त्यांच्या नातेवाइकांना नकोशी असलेली. नकोसेपणाचे कोणकोणते संदर्भ घेऊन ही मुले अनाथाश्रमांत वाढतात आणि पुन्हा एकदा वयाच्या अठराव्या वर्षी नाकारले जातात. आयुष्याचे समीकरण समजून यायच्या आतच ही मुले सज्ञान झाल्याचे कायदा जाहीर करतो आणि ती पुन्हा नाकारली जातात. त्यांना आता अनाथाश्रमाचेही छप्पर नाहीसे होते. डोक्‍यावर छप्पर नाही, जातीचे प्रमाणपत्र नाही, जन्म दाखला नाही, पत्ता नाही, म्हणून आधार कार्ड नाही, मतदार ओळखपत्र नाही. या भारताचे ते सज्ञान नागरिक असल्याचा कोणताच पुरावा त्यांच्यापाशी नाही. एवढ्या मोठ्या जगांत एकट्याने जीवन संघर्ष कुठल्या आधारावर करायचा? हे दुसरे नाकारलेपण अधिक जिव्हारी लागणारे, अधिक क्‍लेशदायक, संघर्षमय आणि वाईट मार्गाला लागण्याच्या अनेक शक्‍यता असलेले असते. 

देहातून काही कल्लोळ बाहेर पडू पाहण्याच्या वयातच ही मुले अनाथालयातूनही अनाथ होतात. कसे त्यांनी स्वतःला सावरावे? या वाटेवरूनच स्वतःला सावरत चालणारा सागर रेड्डी या अशा तरुणांचा आधारवड आहे. सागरची कहाणी फारच करुण आहे. सुशिक्षित पण भिन्न धर्मीय जोडप्यांच्या प्रेम विवाहांतून सागरचा जन्म झाला. पण तो दोन वर्षांचा असताना कट्टर धार्मिकतेतून त्याच्या आई-वडिलांचा खून झाला.

दोन वर्षांच्या निरागस बालकाचे पालक हिरावून घेताना त्या नराधमांना काहीच कसे वाटले नसेल? धर्म असे निष्ठूर काळीज कसे निर्माण करतो? यानंतरचे सागरचे आयुष्य अनाथाश्रमांत गेले. नातेवाइकांनी कधीच पाठ फिरविली होती. चौदाव्या वर्षी दहावी पास झाल्यावर, चेंबूरच्या मंगल मंदिर या संस्थेत त्याने आय.टी.आय. पूर्ण केले. पुढे काय? जगण्यासाठी केवळ शिक्षण पुरेसे नसते इथे. जन्मदाखला, जात-धर्म, पत्ता असेल तरच नोकरी मिळते. सागरपुढे किनारा नसलेल्या प्रश्नांच्या लाटा उसळल्या. अनाथ असल्याचा ठसठशीत शिक्का भाळावर घेऊन वावरणाऱ्या सागरचा राहण्याचा पत्ता रेल्वे स्थानके, मंदिरे, फुटपाथ असाच असायचा. पण तो हिंमत हरला नाही. प्रथम दूरध्वनीची वायर खेचण्याचे मजुरी काम मिळाले. त्यातच तो मुलाखतींना जायचा. दोन-तीन तास चालत जाऊन ‘कॉल्स’साठी त्याने मुलाखती दिल्या. त्या काळातच एका दानशूर व्यक्तीने डिप्लोमा घेण्यासाठी मदत केली. मग मुंबईत एका चांगल्या कंपनीत सागरला नोकरी लागली. सागर स्थिर होईल अशी ही स्थिती होती. पण त्याच्या आयुष्याला याच काळात कलाटणी मिळाली. 

एका कार्यक्रमांत जुने आश्रमशाळेतील मित्र भेटले. सगळ्यांच्या कहाण्या संघर्षमय व करुणाजनक होत्या. सागर फार व्यथित झाला. केवळ आपणच नाही, तर अनाथालयातील बहुतेकांच्या वाट्याला हेच दुःख येतं हे त्यानं जाणलं आणि पुढील जीवन आपल्या या भावंडांसाठीच जगण्याचा त्याने निश्‍चय केला. तेव्हापासून आपला पूर्ण पगार तो या कामासाठी खर्च करतो. लग्नाचा विचारही तो करीत नाही. त्याने प्रथम वाशीला दोन सदनिका भाड्याने घेऊन तेथे आठ मुलांची व दोन मुलींची राहण्याची सोय केली. दोनच वर्षांत ‘एकता निराधार संघ’ हा नोंदणी असलेला न्यास स्थापन केला. न्यासाचे कार्य नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, नागपूर, पुणे, नांदेड या जिल्ह्यांमध्ये, तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेश व बिहारपर्यंत पसरले आहे. आज भारतात अठरा वर्षांवरील अनाथांना सांभाळणारी कोणतीही संस्था नाही. या अनाथांकडे नागरिकत्वाचा कोणताही पुरावा नाही, त्यामुळे ते पुन्हा एकवार सर्व दृष्टीने अनाथ होतात. सरकारनेही टाकून दिलेलं पोर अशीच त्यांची स्थिती होते. सागर त्यांच्यासाठी सर्वस्व अर्पून काम करतो. त्यांच्या निवाऱ्याची सोय, नोकरी, व्यवसायाच्या दृष्टीने सक्षम करून पायावर उभे करणे, शिलाई मशिनचे वाटप, वृक्षारोपण, करिअर मार्गदर्शन, पुनर्वसन अशी अनेक कामे न्यासातर्फे चालतात. शासनाने अशा मुलांसाठी ठोस पावले उचलावीत म्हणून सरकार दरबारी हा तरुण धडपडतो आहे. दिशा हरविलेल्या अभागी जिवांना व्याख्याने, परिसंवादाद्वारे प्रेरणा देत असतो. समाजात वाईट माणसे आहेत, त्यापेक्षा कितीतरी अधिक चांगली माणसे आहेत. अनेक चांगल्या व्यक्ती, संस्था, सरकारी कार्यालये, त्याचे सहकारी या सर्वांच्या मदतीने हे कार्य करू शकतो, असे तो आवर्जून नमूद करतो. आपल्या जीवनाची ससेहोलपट झाली तशी इतरांची होऊ नये म्हणून सागरने या कार्यास झोकून दिले आहे. एकेदिवशी पहाटवारा वाहत असताना एका गिरणीच्या दाराशी फडक्‍यात गुंडाळलेलं बाळ गंगाराम सुर्वे या गिरणीकामगाराला मिळालं आणि उगवत्या सूर्याच्या साक्षीनं तान्हुल्या नारायणाला नाव व पत्ता मिळाला. पण सर्वांनाच हा आधार मिळत नसतो. नव्या सहकाऱ्यांना सनाथ करण्यासाठी सागरच आधार बनतो आहे.

loading image