अनपेक्षित भविष्य

दीपक कांबळे
सोमवार, 26 जून 2017

आपण वर्तविलेले भविष्य खरे झाले तर नक्कीच आनंद होईल. पण तो शिष्य दुर्दैवी होता. त्याने स्वतःच्या गुरूचा मृत्युयोग सांगितला आणि आता त्या खऱ्या झालेल्या भविष्याबद्दल पश्‍चात्ताप करत आहे. 
 

मी मूळचा फलटणचा. शिक्षण-नोकरीनिमित्त सध्या पुण्यात. मात्र न चुकता वर्षातून एकदा फलटणची वारी होतेच... तीही वारीसाठीच. संत ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी फलटणमधूनच जाते. कधी एक-दोन दिवस मुक्काम असतो. आम्ही एका दिंडीला दरवर्षी जेवण देत असतो. म्हणून दरवर्षी न चुकता मी पालखीनिमित्त फलटणला जातो. त्याचबरोबर माझ्या शैक्षणिक आणि आध्यात्मिक गुरू उषा दाणी (विभूते) यांना भेटत असे. 

आपण वर्तविलेले भविष्य खरे झाले तर नक्कीच आनंद होईल. पण तो शिष्य दुर्दैवी होता. त्याने स्वतःच्या गुरूचा मृत्युयोग सांगितला आणि आता त्या खऱ्या झालेल्या भविष्याबद्दल पश्‍चात्ताप करत आहे. 
 

मी मूळचा फलटणचा. शिक्षण-नोकरीनिमित्त सध्या पुण्यात. मात्र न चुकता वर्षातून एकदा फलटणची वारी होतेच... तीही वारीसाठीच. संत ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी फलटणमधूनच जाते. कधी एक-दोन दिवस मुक्काम असतो. आम्ही एका दिंडीला दरवर्षी जेवण देत असतो. म्हणून दरवर्षी न चुकता मी पालखीनिमित्त फलटणला जातो. त्याचबरोबर माझ्या शैक्षणिक आणि आध्यात्मिक गुरू उषा दाणी (विभूते) यांना भेटत असे. 

उषा दाणी माझ्या नववी-दहावीच्या विज्ञानाच्या शिक्षिका. एकदा त्या आम्हाला रसायनशास्त्राच्या संज्ञा विचारत होत्या. मी पोटॅशिअमची संज्ञा बरोबर सांगितली, पण काही केल्या मला ‘पोटॅशिअम’ हा शब्दच व्यवस्थित उच्चारता येत नव्हता. सर्व वर्ग मला हसत होता. या उषा मॅडमच काही वर्षांनी माझ्या ज्योतिषगुरू झाल्या. उषा मॅडम दर सोमवारी आणि गुरुवारी संध्याकाळी जन्मकुंडल्या पाहत असत. मी मॅडमच्या सोबत थांबून ज्योतिष शिकत असे. तसे ज्योतिषशास्त्राविषयी मला तेव्हाही खूप काही येत नव्हते आणि आताही काही येत आहे, असे अजिबात नाही. पण मला भविष्य जाणण्याची खूप इच्छा. खूप खूप शिकावे. नाव कमवावे असे मनोमन खूप वाटे. 

मी ज्योतिषशास्त्र शिकण्यामागेही एक कारण आहे. एम. ए. झाल्यावर एका ज्योतिष्याकडे पत्रिका दाखविली. त्याने सांगितले की, ‘‘तुमचे शिक्षण बारावीपर्यंतच होईल आणि तुम्ही खूप शिकला तरी त्याचा खूप उपयोग होईलच असे नाही....’’ खूप खूप राग आला मला. मला तर खूप खूप शिकायचे होते. अगदी पीएच. डी. करायची होती. मी माझे स्वप्न साकार करणारच होतो. त्या ज्योतिष्यावर मी विश्‍वास ठेवला नाही. मला आपण स्वतः ज्योतिषशास्त्र शिकावे असं वाटून मी ज्योतिषशास्त्रात एक-दोन नव्हे, चांगल्या तीन पदव्या घेतल्या. मला अचूक जन्मकुंडली काढता येत होती, गुणमेलन पाहता येत होते, पण भविष्य सांगण्यासाठीचे प्रॅक्‍टिकल नॉलेज नव्हते. मी उषा दाणी मॅडमकडे जाऊन ते शिकत होतो. 

खरे तर मला माझ्या स्वतःच्या जन्मकुंडलीतच जास्त रस होता. स्वतःची कुंडली पाहून पुढचे आयुष्य चांगल्या प्रकारे जगावे, एवढीच अपेक्षा होती. पुढे नोकरीनिमित्त पुण्यात आल्यावर ज्योतिष शिकण्यातही खंड पडला. मात्र ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीनिमित्त मी दरवर्षी फलटणला जातो आणि त्या निमित्ताने दाणी मॅडम यांना पत्रिका दाखवून भविष्य जाणून घेतो. 

तीन वर्षांपूर्वीची गोष्ट. मी पालखीनिमित्त त्यांच्याकडे गेलो असताना उलटाच प्रकार घडला. त्यांनी स्वतःची पत्रिका माझ्या हातात देऊन, ‘‘मी अजून किती वर्षे जिवंत असणार हे सांग’’, असे त्यांनी मला जवळ जवळ आव्हानच दिले. खरे तर कोणीच मृत्युयोग सांगत नाही. तसा तो सांगूही नये, पण मला दाणी मॅडम यांनी तसा जवळ जवळ हुकूमच दिला. विभूते काकाही तिथेच होते. खरे सांगतो, मला जन्मकुंडलीचे पूर्ण ज्ञान नाही. मला भविष्याबद्दलही काही कळत नाही. तरीही मॅडमच्या समाधानासाठी मृत्युस्थानाचे आठवे घर, सहावे घर अशी काहीतरी आकडेमोड करून मी त्यांना आकडा सांगितला - ‘७२ वर्षे.’ 

मी काहीतरी उत्तर सांगितले याचे त्यांना खूप समाधान होते. ‘‘चला, अजून दोन वर्षे मी जगणार तर!,’’ असे त्या म्हणाल्या. मी तर हे सर्व हसण्यावारी नेले. मात्र ती जागा पवित्र होती. तेथे सांगितलेले भविष्य नक्कीच खरे ठरत असे. मध्ये एक वर्ष गेले. गेल्या वर्षी मी पालखीसाठी फलटणला गेलो, तेव्हा रमजान ईद होती. सर्वांत आधी मी माझा मित्र नजीर काझी याच्याकडे गेलो. यथेच्छ शिरखुर्मा खाल्ला. बोलता बोलता त्याने सांगितले, की गेल्या आठवड्यात दाणी मॅडम गेल्याचा फलक चौकात वाचला. हा माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता. खात्री करण्यासारखे कोणतेही साधन नव्हते. पालखी पंढरीकडे मार्गस्थ झाल्यानंतर मी आवर्जून मंडईत आलो. तिथेच दाणी मॅडम यांचे घर आहे. नेहमीच्या झेरॉक्‍सवाल्याकडून माहिती काढली. त्याने सांगितले, की उषामॅडम जाऊन आता आठ-दहा दिवस झाले.

माझ्या अश्रूंचा बांध तिथेच फुटला. मॅडमनी पालखीपर्यंत तरी नक्कीच थांबायला हवे होते. मी पालखीला येणार आहे, हे त्यांना माहीतही होते. मला त्यांच्या घरी जाण्याचीही हिंमत झाली नाही. काय करणार होतो मी तिथे घरी जाऊन... विभूते काकांच्या नजरेत मी पाहू शकलो असतो का... की ज्यांच्यासमोरच मी मॅडमचा मृत्युयोग सांगितला होता... दुर्देवाने तो खरा झाला. माझ्यासारखा दुर्दैवी शिष्य मीच. खरंच... मी त्या दिवशी तसे भाकीत केले नसते तर... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktpeeth artical deepak kamble