द्योती आणि बोद्दी

- मोहिनी पाटणकर
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

प्रवासात भाषेची धमाल अनुभवायला मिळते. कोण कुठची अक्षरं खातील, पत्ता नाही. मग त्या गाळीव अक्षरांच्या शब्दांची मूळ रूपे शोधण्यात तुमच्या भाषाज्ञानाची, संवाद कौशल्याची मिजास उतरते.

प्रवासात भाषेची धमाल अनुभवायला मिळते. कोण कुठची अक्षरं खातील, पत्ता नाही. मग त्या गाळीव अक्षरांच्या शब्दांची मूळ रूपे शोधण्यात तुमच्या भाषाज्ञानाची, संवाद कौशल्याची मिजास उतरते.

‘द्योती फी चाजिंग डेक्‌ इज देअ’ अबूधाबीच्या विमानतळावर मी जेव्हा चौकशी केली, की मोबाईल चार्जिंग फॅसिलिटी आहे का, कुठे आहे? तेव्हा त्या अधिकाऱ्याने तत्परतेने वरीलप्रमाणे उत्तर दिले. माझा प्रश्‍नार्थक चेहरा पाहून त्याने परत एकदा सांगितले. मग मात्र उत्तर देताना त्याने दाखविलेल्या दिशेने मी चालू लागले व परत एकदा मनातल्या मनात ते वाक्‍य उच्चारले आणि माझ्या डोक्‍यात ट्यूब पेटली, तो म्हणत होता, ते वाक्‍य होते, ‘ड्यूटी फ्री चार्जिंग डेस्क इज देअर’ ‘इंग्लिश बोलणाऱ्या लोकांना मग ते कोणत्याही देशात राहणारे असोत, ‘र’चा उच्चार करण्याचे एवढे वावडे का आहे कुणास ठाऊक. शब्दाच्या शेवटी जर ‘र’ असेल तर ‘र’चा उच्चार करू नये, असा अलिखित नियम आहे, जणू काही शब्दाच्या सुरवातीला ‘र’ आला तर नाइलाज असतो; पण शब्दाच्या मध्ये जर हा ‘र’ कडमडला तर, त्याचा उच्चार अलगद, बोबड्या बोलात करावा व शेवटी असल्यास करू नये, नाहीतर पाप लागेल, असा धाक लोकांच्या मनात असावा. ही झाली ‘र’ची व्यथा; पण ‘ड’चा उच्चार कुणी ‘द’ केला तरी समजू शकते; पण परत ‘द’ला ‘य’ जोडायची, एवढं बोबडे बोलायची काय गरज आहे, हे मला कळत नाही. त्यामुळे ‘ड्यूटी’ला ‘द्योती’ म्हटल्यावर, ‘ड्यूटी’ या शब्दाचा शोध लावायला मला जरा वेळ लागला. त्यानंतर आला शब्द ‘फ्री’. त्यातील ‘र’ खाऊन झाल्यावर फक्त ‘फ’चा उच्चार केला. तोही असा की ‘प’ ते ‘फ’ हे अंतर पार करताना दमछाक झाल्याने उच्चारावा तसा. ‘पी’ म्हणणे योग्य नाही व ‘फी’ स्पष्टपणे उच्चारता येत नाही, अशी अवस्था.

‘चार्जिंग’मधला ‘र’ अर्थातच प्रेमळपणे गिळून टाकलेला. पुढे ‘डेस्क’मधला ‘स’ उडवून टाकलेला व ‘देअर’मधला ‘र’ खाल्लेला. फक्त एका वाक्‍यात एवढी खाबूगिरी अनुभवाला आली होती. 

आता अबुधाबी ते मॅंचेस्टर प्रवासाला सुरवात झाली. कितीही डुलक्‍या काढल्या, कितीही ज्यूस प्यायला, काही खाल्ले तरी, व्हिडिओवर सिनेमे पाहिले तरी ते आठ तास संपता संपत नाहीत, असे वाटते. मग मनात विचार सुरू झाला, प्रवासात भाषेची एवढी धमाल अनुभवायला मिळते आहे, तेथे तर अजून कसोटी असते. माझ्यासारखी मराठीतून इंग्लिश बोलणारी आजी व वयाला शोभेशा बोबड्या सुरात, तेही तेथील उच्चारांची सवय असलेली इंग्लिश बोलणारी नातवंडे, यांचा संवाद केवढा मनोरंजक असतो. एकदा त्यांच्या मित्राने कुठल्या शाळेत जातोस विचारल्यावर उत्तर दिले, ‘मॅंचेस्ट-अ ॲमऽऽ क्‌ ऽऽ’ आता संदर्भ माहीत असल्याने पहिला शब्द ‘मॅंचेस्टर’ व तिसरा शब्द ‘स्कूल’ आहे, हे लगेच कळले; पण त्या ‘ॲमऽऽ’ चा अर्थ कळेना, नंतर शोध लागला, तो ‘मॅंचेस्टर ग्रामर स्कूल’ असे म्हणतोय. 

मॅंचेस्टरला उतरल्यावर कशीबशी व्हीलचेअरची व्यवस्था झाली. त्याकरिता एक कर्मचारी आमच्याबरोबर होता. कस्टम काउंटरच्या दिशेने जाताना त्या कर्मचाऱ्याने विचारले, ‘‘बोद्दी? बोद्दी काऽऽ? दु यू हॅ युअ बोद्दी काऽ?’’ आता हे ‘बोद्दी का’ काय असेल विचार करू लागले. ‘काऽऽ’ म्हणजे ‘का’च्या पुढचे अक्षर, ‘र’, व ‘र’शी संबंधित शब्द असणार. मग शोधाशोध सुरू झाली.

आपल्या इवल्याशा मेंदूला आपण त्रास तरी किती द्यायचा, या विवंचनेत मी असताना शेजारून जाणाऱ्या एका तरुण भारतीय महिलेने सांगितले, तो विचारतो आहे, ‘बोर्डिंग कार्ड’, खाल्लेले शब्द ओळखा, या प्रश्‍नाला परत एकदा मला शून्य मार्क मिळाले होते! ‘बोर्डिंग’ या शब्दातील ‘र’ खाल्ला तरी ठीक आहे. ‘र’ खाल्ला तर तो त्याचा जन्मसिद्ध हक्क आहे व तो हक्क बजावणारच, याची मला खात्री होती. ‘ड’चा उच्चार ‘द’ केला तर तेवढे बोबडे बोलणेपण परिचयाचे झाले होते. बोर्डिंगमधला ‘इंग’ कशाला खायचे हे मला कळले नाही. तेवढ्यात आम्ही कस्टम काउंटरपर्यंत पोचलो होतो. तर त्या अधिकाऱ्याने चक्क हिंदीत व नंतर गुजरातीत बोलायला सुरवात केली.

प्रथमच भारताची लोकसंख्या एवढी मोठी असल्याबद्दल माझ्या मनात चक्क अभिमान दाटून आला. माझ्या भारत देशाची एवढी मोठी लोकसंख्या म्हणजे व्यापारी जगाच्या दृष्टीने मोठी बाजारपेठ आहे. सध्याच्या कमर्शिअल जगात टुरिझमच्या व्यवसायाला प्रचंड महत्त्व आले आहे. जगभर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या यादीत, भारतीय प्रवाशाची संख्या खूप मोठी आहे. म्हणून भारतीय भाषांना त्यातही हिंदीला जगात प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. 
थोड्याच वेळात घरी पोचलो. पुण्यातील नव्या पेठेतील घर ते मॅंचेस्टरमधील स्वप्नाचे घर, हा प्रवास आता पूर्ण झाला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktpeeth artical mohini patankar