ग्रामीण चातुर्यकथा

- रमेश बेट्टिगिरी
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

ग्रामीण भागातील बॅंक व्यवस्थापनाचा माझा पहिलाच अनुभव होता. पहिल्या दोन महिन्यांतच एक झटका बसला. कर्ज नाकारलेला तरुण उपोषणाला बसला आणि मी नगरी डाव टाकून त्याला चितपट केले.

ग्रामीण भागातील बॅंक व्यवस्थापनाचा माझा पहिलाच अनुभव होता. पहिल्या दोन महिन्यांतच एक झटका बसला. कर्ज नाकारलेला तरुण उपोषणाला बसला आणि मी नगरी डाव टाकून त्याला चितपट केले.

मी राष्ट्रीयीकृत बॅंकेत काम करीत होतो. बॅंकेच्या नियमाप्रमाणे किमान दोन वर्षे ग्रामीण भागातील शाखेमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करणे आवश्‍यक होते. नगर जिल्ह्यातील एका छोट्याशा खेड्यामधील शाखेमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करू लागलो. मी तेथे रुजू होऊन एक-दोन महिने झाले. हळूहळू तेथील लोकांच्या ओळखी होत होत्या. तो भाग कायमस्वरूपी दुष्काळी असल्याने ठेवी वाढविण्यापेक्षा कर्ज वाटपावर भर द्यावा लागत असे. तसेच जुन्या कर्जाच्या वसुलीची जबाबदारी अधिक असे.

नवीन व्यवस्थापक आला की त्या गावामधील व परिसरातील खातेदार सरकारी योजनांच्या अंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी अर्ज करीत. त्या वेळी पंतप्रधान रोजगार योजना ही स्थानिक गरजू तरुण बेरोजगारांना संधी देणारी योजना बॅंकेमार्फत सुरू होती. त्यासाठी गरजू तरुणांनी अर्ज केल्यावर, छाननी होऊन, त्या तरुणाचे त्या उद्योगधंद्याबद्दल ज्ञान, कौशल्य वगैरे बाबी तपासून पंधरा दिवसांत कर्ज मंजूर केले जात असे किंवा नाकारले जात असे. मी रुजू होण्यापूर्वी ज्यांचे कर्ज नामंजूर झाले होते ते, व काही नवीन मंडळी येऊन भेटली होती. त्या सर्व अर्जांची छाननी करून प्रत्यक्ष जागेवर सत्य परिस्थितीची पडताळणी करून योग्यतेप्रमाणे छोट्या व्यावसायिकांना कर्ज वाटपदेखील केले. एका तरुणाचा अर्ज नामंजूर केला होता. त्याचा अर्ज याआधीच्या व्यवस्थापकांनीही नामंजूर केला होता. तो तरुण त्या गावातील राजकीय लोकांकडून माझ्यावर दबाव आणून कर्ज मिळवण्याचा खटाटोप करीत होता. एकदा आठ-दहा लोकांच्या गटासह बॅंकेमध्ये येऊन माझ्यावर अतिरिक्त दबाव आणण्याचा प्रयत्न त्याने केला. कर्ज मंजुरीसाठी मला आठ दिवसांची मुदत दिली. त्याचबरोबर त्यांनी जातीपातीचे राजकारण करून, कर्ज मंजूर न केल्यास वर तक्रार करू, असा धमकी वजा इशाराही दिला होता. तरीही मी दाद दिली नाही. त्यानंतर आठ दिवसांनी त्याने एक वेगळीच चाल केली. त्याने मला एक पत्र दिले, त्यात असे लिहिले होते की, मला कर्ज मंजूर न झाल्यास मी बॅंकेसमोर उपोषणाला बसेन. त्याप्रमाणे ठरल्या दिवशी त्याने बॅंकेच्या मुख्य दरवाजासमोर एक सतरंजी टाकली. भिंतीवर पुठ्ठे लावून कर्ज नामंजूर केल्याबद्दलची माहिती लावली. काडेपेटी, रॉकेलची बाटली समोर सर्वांना दिसेल, अशी ठेवून चार दिवसांनी आत्मदहन करणार असे लिहिले. स्थानिक वार्ताहराने ही बातमी वृत्तपत्रात दिली. वातावरण बरेच तापले. 

माझा अनुभव कमी पडतो की काय, असे मला वाटायला लागले. मला पहिल्यांदाच व्यवस्थापकपद सांभाळत असल्यामुळे मानसिक तणाव आला होता. असाच एक दिवस संपला. एकंदरीत नाट्यमय प्रसंग होता. दुसऱ्या दिवशी मी पुणे येथील कार्यालयाकडे फॅक्‍सने या प्रकरणाची माहिती पाठवून मला योग्य तो सल्ला व मदत मागितली. माझी कोंडी झाली होती; पण मी मन शांत ठेवले. तिसऱ्या दिवशी मला मुख्य कार्यालयाकडून कळवण्यात आले की, ‘आपण तिथे शाखाधिकारी आहात. आपण तिथे प्रत्यक्ष परिस्थिती जाणता, योग्य तो निर्णय घेऊ शकता.’  

मी रात्रभर विचार केला आणि मला रस्ता सापडला....
आमच्या शाखेमधे वयाने ज्येष्ठ असणारे व त्याच गावात वीस वर्षे सेवा केलेले दप्तरी (रेकॉर्ड शिपाई) होते. त्यांनी मला हळूच येऊन सांगितले की, हा तरुण दरवेळेला असाच त्रास देतो. त्याला कर्जाचा विनियोग करायचे ठावूक नाही व मागे त्याच्या घरांतील व्यक्तीला या योजनेंतर्गत कर्ज दिले होते. दहा वर्षे झाली तरी त्याने ते अद्याप फेडलेले नाही. त्या प्रकरणाची सर्व कागदपत्रे फाईल लोन रजिस्टर हुडकून दप्तरीने माझ्या टेबलवर आणून ठेवले. 

झाले! अखेर चौथा दिवस उजाडला. मी त्या तरुणाला व त्याच्या गटाला वाटाघाटी करण्यास बॅंकेत बोलाविले. त्यांना समजावून सांगितले की, ही सरकारी योजना आहे व ती बॅंकेमार्फत अंमलात आणली जाते. त्यासाठी योग्य व्यक्‍तीची निवड करणे हे गरजेचे आहे. कर्ज परतफेड न झाल्यास अयोग्य व्यक्तीला कर्जपुरवठा केल्याचा ठपका व जबाबदारी शाखाधिकाऱ्यांवर येऊ शकते. त्यासाठी तुम्ही तुमची जुनी कर्जबाकी परतफेड करा; मग मी तुमच्या अर्जाचा योग्य विचार करू शकतो. आणि ही मात्रा बरोबर लागू पडली. त्याने उपोषण थांबविले व आठ दिवसाने बाकी रक्कम भरतो असे सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी लवकरच रक्कम भरून बाकी शून्य केली. जे कर्ज आम्ही बुडीतखाती जमा केले होते, ते सगळे वसूल झाले. पुढे सर्व व्यवस्थित झाले. माझा तेथील दोन वर्षांचा कालखंड यशस्वीरीत्या पूर्ण झाला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktpeeth artical ramesh battegiri