वाटचालीतील आठवणी (मुक्‍तपीठ)

सुचित्रा रमाकांत कवठेकर
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

माणूस आहे तोपर्यंत नीट ओळखायचे राहून गेले आणि आता ते गेल्यावर त्याच्याबरोबरच्या वाटचालीतील आठवणी दाटून येतात. मन हिरमुसले की त्या आठवणी आपसूक जागवल्या जातात.
 

माणूस आहे तोपर्यंत नीट ओळखायचे राहून गेले आणि आता ते गेल्यावर त्याच्याबरोबरच्या वाटचालीतील आठवणी दाटून येतात. मन हिरमुसले की त्या आठवणी आपसूक जागवल्या जातात.
 

आमच्या घरात कायमच बारा बलुती असायची. लग्नानंतर कौतुकाने सर्व मित्र एक एक दिवस आम्हाला जेवायला बोलवत होते. एक दिवस हे म्हणाले, ‘‘प्रभा, उद्या तुझ्या लाडक्‍या भावाकडे जेवायला जायचे आहे; पण तो गरीब वस्तीतला आहे. कुठलेही नखरे करू नकोस.’’ खरे तर तिकडे जायचे म्हटल्यावर मला कसेतरीच झाले. माझ्याकडे रोखून पाहात होते. त्यांच्या चेहऱ्यावर एकही कठोर रेषा उमटलेली नव्हती. पण, आता बोलण्यात एक प्रकारची जरब होती, ‘‘प्रभा, ती पण माणसेच आहेत ना? आपण उद्या त्यांच्याकडे जायचे आहे. ’’

दुसरा दिवस उजाडला, आम्ही वस्तीत पाऊल टाकले. बघतो तर काय? तेथील सर्व बायका, पुरुष नवे कपडे घालून त्यांच्या वेशीवर आमचे स्वागत करायला आलेले. दारांना फुलांच्या माळा, सगळ्यांची घरे शेणाने सारवून अंगणांत व भिंतीवर सुंदर रांगोळ्या काढलेल्या. भिंती रंगविलेल्या. जणू काही मोठा सणच असल्यासारखे वातावरण होते. सर्वांच्याच घरात तांब्याची व पितळेची भांडी चकाचक लावलेली नव्यासारखी चमकत होती. आमच्या डोक्‍यावर शाल धरली होती. सगळ्या बायकांनी आम्हाला ओवाळले व मित्राच्या बायकोने भाकरीचा तुकडा ओवाळून टाकला. असे आमचे अप्रतिम स्वागत झाले. आमच्या दोघांकडे सर्व जण एकटक कौतुकाने भारावून जाऊन बघत होते. वेगवेगळ्या प्रकारची सरबते आमच्यापुढे आणून ठेवली. आम्ही खूप गप्पा मारल्या. आता जेवणाची वेळ आली. आपल्याकडे गणपतीच्या वेळी गौरी बसतात तेव्हा जसे जेवण असते, तसे सगळ्यांनी आपापल्या घरातून आमच्यापुढे ठेवले. ह्यांना नॉनव्हेज आवडते म्हणून नॉनव्हेजसुद्धा. इतके अप्रतिम जेवण होते, आम्ही प्रत्येक पदार्थाची आवर्जून चव घेतली. कारण त्यांचे प्रेम त्यात दिसत होते. सगळे आमच्याभोवती उभे होते. मग ह्यांनी सगळ्यांनाच आमच्याबरोबर जेवणाचा आग्रह केला. आम्ही दोघांनी त्यांना सगळ्यांना भरवले. ते क्षण खरोखरच टिपण्यासारखे होते. सगळ्यांशी खूप गप्पा मारून आनंदाश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी आम्ही तेथून निघालो. हे नेहमीच त्यांच्याकडे जायचे. सर्वांचे हे खूप आवडते होते. हे घरी आल्यावर म्हणाले, ‘‘प्रभा, हे वेडं प्रेम आहे. तुला काय वाटते?’’ मला रडू यायला लागले. ‘‘माझ्या आयुष्यात पूर्वी मी कधीच असे जेवण केले नव्हते. असे कौतुक कधीच लाभले नाही. हा कौतुकाचा प्रसंग मी कधीच विसरू शकणार नाही.’’

हे पंढरपूरला वारीला निघाले की माझा रुसवा-फुगवा सुरू व्हायचा. माझा आणि पांडुरंगाचा छत्तीसचा आकडा होता. कारण ह्यांना पांडुरंगाव्यतिरिक्त कुणाचीही ओढ नव्हती. वारीच्या दोन-तीन महिने आधीपासूनच ह्यांना वारीची ओढ लागत असे. वारीसाठी ते वीस-एकवीस दिवस मला सोडून जायचे. मी खूप अस्वस्थ असायची. सर्वात प्रथम हे वारीला गेले तेव्हा ह्यांना दोनशे रुपये पाहिजे होते. दिंडीची भिशी म्हणून. मला पगार होता तीनशे. ह्याना पैसे दिले तर घर कसे चालवायचे? हे म्हणाले, ‘‘प्रभा, तू काळजी करू नकोस. मला पैसे देऊ नकोस. मी माउली बरोबर चाललो आहे.

तो माझी काळजी घेईल.’’ हो- नाही करता करता हे वारीला निघाले. मला राहावेना. मी ह्यांना दोनशे दिले. गंमत म्हणजे, ज्या दिवशी पालखी पंढरपूरला पोचते त्याच दिवशीची घटना... त्यांनी एक चित्र स्पर्धेसाठी पाठविलेले होते. त्या चित्राला प्रथम पारितोषिक दोनशेचेच मिळाले. त्यांची मनिऑर्डर आली होती. मला आश्‍चर्य वाटले. हे वारीहून आल्याबरोबर ह्यांच्या हातात ते पैसे मी ठेवले व ह्यांची माफी मागितली. हे म्हणाले, ‘‘प्रभा, तुला संसार सांभाळायचा आहे. तू बोललीस तर मला कधीच राग येत नाही, पण माझ्या माउलीवर विश्‍वास ठेव. काळजी करू नकोस. माझा बाप पंढरीचा पांडुरंग आपल्याला कधीच काही कमी पडू देणार नाही.’’ पुढे त्यांनी पंढरीच्या वारीवर चित्रपट काढला, तेव्हा मला खूप आनंद झाला.

रमाकांत कवठेकर यांना पुष्कळसे ओळखलेच नाही, असे वाटते. ज्या ठिकाणी ह्यांनी शेवटचा श्‍वास घेतला तिथे जाते. ह्यांच्याशी मौनातच खूप बोलते. खरे म्हणजे माझ्या मनाविरुद्ध काही घटना घडल्या की माझे पाय आपोआप तिकडे वळतात. ह्यांच्याशी मनापासून बोलल्यावर बरे वाटते. हा एकटीचा प्रवास कधी संपणार? हे पण माझी वाट पहात असतील. मला लवकर गेले पाहिजे.

Web Title: muktpeeth artical suchitra kavthekar

टॅग्स