नवी ओळख

सुनील गाडगीळ
सोमवार, 17 जुलै 2017

काही गोष्टी कधीपासून तिथे असतातच; पण आपण आपल्या कामाच्या धबडग्यात, रोजच्या धावपळीत आपल्या मेंदूने त्याची नोंद घेतलेली नसते. एकदा निवांत फिरा. आपलीच ओळख नव्याने उमजेल.

- सुनील गाडगीळ

आपण ज्या शहरात, गावात, भागात राहतो तो भाग आपल्या परिचयाचा होऊन जातो. आपण तेथील रस्त्यावरून दिवसा, रात्री कायमच जात असतो. कधी गाडी, कधी टू व्हीलर, कधी सायकल तर कधी पायी. आपण सदा एखादा वाघ मागे लागल्यासारखे घाईत असतो. दररोज तोच तोच मार्ग आक्रमल्यामुळे त्याबद्दल आपण वेगळा असा विचार कधीच करत नाही. आपल्या क्रिया अगदी यंत्राप्रमाणे होतात. आपण निघतो व इकडे तिकडे न बघता सरळ इच्छित स्थळाकडे प्रस्थान ठेवतो. वाटेत लागणारा एखादा खड्डा पहिल्या एक दोन वेळेस आपल्याला दणका देतो, मग आपण तो टाळून पुढे जायची क्रिया यंत्रवत करून जातो. आपण असे काही केले हे आपल्या लक्षातच येत नाही. 

आता पाहा, आपण पुढील पैकी एखादी क्रिया करत असतो ः वाहन चालविणे, ड्रायव्हर असेल तर आरामशीर बसून फोनमधील मेसेजेस चेक करणे, कोणाशी तरी फोनवर बोलत राहणे, नाहीतर कानात हेडफोन लावून गाणी ऐकत बसणे.

बाहेर काय चालले आहे, आजूबाजूला कालच्या पेक्षा काही बदल झाले आहेत का, हे आपण बघतच नाही किंवा जरी आपल्या नजरेस पडले तरी आपल्या तंद्रीत असण्यामुळे त्या बदलांची आपले मन नोंद करून घेत नाही. पण जर तुम्हाला या यंत्रवत वागण्यातून बदल हवा असेल तर...एखादा दिवस (सुटीचा, मोकळा वेळ असेल) अगदी सकाळी किंवा रात्री वाहतूक कमी झाली की, सहज त्याच रस्त्यावरून पायी फिरा किंवा सायकल घेऊन निघा. आता डोळे, मन, कान, नाक जागे ठेवा.

तुम्हाला काय जाणवेल? 
अरे, या बंगल्यातील जाई, रातराणीच्या वेलीवरील लगडलेल्या फुलांचा किती छान वास सुटला आहे, पुढे प्राजक्त आणि गगनमोगरा फुलांचा सडा रस्त्याला वेगळीच शोभा देत आहे. नारळाची झाडे किती उंच गेली आहेत, आपण नेहमी चुकवत जाणारा खड्डा फार काही खोल नाही, सहज बुजवता येईल असा आहे की, हा कुठला पक्षी साद घालतो आहे, अरे ते मांजर आडवे गेले, तीन पावले मागे जावे का, आपल्या या भागात झाडे किती छान वाढली आहेत ना, नुकतीच पावसाची एक सर येऊन गेल्यामुळे सर्वत्र कसे हिरवेगार झाले आहे.

रस्ता छान वळण घेऊन परत सरळ होतो, तेव्हा कडेला काही दगड लाल रंग फासून ठेवले आहेत, येथे घाण करू नये असा बोर्ड आणि त्यासमोरच रस्त्यापलीकडे कचऱ्याची मोठी पेटी. कचरापेटी घराजवळ हवी, पण अगदीच आपल्या दारात नको. कचरा ओव्हरफ्लो होत आहे, कचरा उचलणारी गाडी अजून आलेली दिसत नाही. कावळे, भटकी कुत्री तो कचरा चिवडत आहेत. आपली नजर जरा रस्त्यावरून ढळली तर पायाखाली कुत्र्याने केलेली घाण येते. परदेशात सकाळी कुत्र्याला फिरवायला निघताना सोबत कॅरीबॅग नेतात आणि कुत्र्याने रस्त्यात केलेली घाण उचलून कचरापेटीत टाकतात, असे सांगणाऱ्यांच्या चेहऱ्यावर परदेशातील स्वच्छतेचा किती अभिमान पसरलेला असता, हे आठवते. इथे आता आपल्या चेहऱ्यावर किळस, राग असे भाव पटकन येतात. निरुपायाने पाय रस्त्यावर घासतच आपण पुढे निघतो. समोरून काठी टेकत येणाऱ्या आजीबाई, गात जाणारा वासुदेव, भंगारवाला असे अनेक जण आपल्या नजरेस पडतात.  

आजूबाजूच्या भल्या थोरल्या इमारती, बंगले बघत असतानाच त्यांची नावे आपण आपोआप वाचतो. अरेच्या, परवा आपल्याला एक माणूस पत्ता विचारत होता ती बिल्डिंग ही आहे तर. बिल्डिंगच्या गेटवर ‘नो पार्किंग’, ‘गाड्या आत आणू नये’ अशा पाट्यांची गर्दी नजरेस पडते. मध्येच एखाद्या घरातून एखादे गाणे कानावर पडते. एखाद्या घरातून तळणीचा वास आपल्या नाकात शिरतो. रात्रीची वेळ असेल, तर जोरात लावलेला टीव्ही कुठली सिरीयल चालू आहे हे जाणवून देतो.

रस्त्याला दिलेली नावे आपल्या नजरेस पडतात ती बहुतेक त्याच गल्लीत राहणाऱ्या कोणाची तरी असतात. रस्त्याला यांचे नाव देण्याएवढे याने काय केले असा ‘पुणेरी’ विचार आपल्या मनात येऊन जातो.

बराच वेळ जातो. आता परत फिरावे असे वाटून आपण परत फिरतो.
त्या अर्ध्या तासाने आपल्याला किती गोष्टी (ज्या तिथे होत्याच, पण आपल्या झापड लावलेल्या डोळ्यांना दिसल्या नव्हत्या.) नव्याने दिसलेल्या असतात.
ही नवी ओळख मनाला एक वेगळाच आनंद देऊन जाते.
शेवटी काय?
अतिपरिचयात अवज्ञा, हेच खरे...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktpeeth artical sunil gadgil