वराडतं पाखरू रामाच्या पारी

- विनायक बोरकर
मंगळवार, 24 जानेवारी 2017

झाडांच्या टर्मिनल्सवर एकाच वेळी आकाशात झेपावणाऱ्या उद्‌घोषणांचा सुरेख कल्लोळ. निशाचरांची ॲरायव्हल्सही आपापल्या पार्किंग लॉटमध्ये कोणी घुसले नाही ना, याची खात्री करताना आढळतील. 

पहाटेच्या पावलांबरोबर आपण चालू लागलो की, अनेक कुतूहल नजरेस पडतात. कान, नाक, डोळे, त्वचा उघडी ठेवून आपण चालायला हवे म्हणजे पहाटवाऱ्यातील निसर्ग अनुभवता येईल.  जलभार न सांभाळता आल्यामुळे नारळाच्या झावळ्यांमधून झेपावलेला थंडगार थेंब भानावर आणतो.

झाडांच्या टर्मिनल्सवर एकाच वेळी आकाशात झेपावणाऱ्या उद्‌घोषणांचा सुरेख कल्लोळ. निशाचरांची ॲरायव्हल्सही आपापल्या पार्किंग लॉटमध्ये कोणी घुसले नाही ना, याची खात्री करताना आढळतील. 

पहाटेच्या पावलांबरोबर आपण चालू लागलो की, अनेक कुतूहल नजरेस पडतात. कान, नाक, डोळे, त्वचा उघडी ठेवून आपण चालायला हवे म्हणजे पहाटवाऱ्यातील निसर्ग अनुभवता येईल.  जलभार न सांभाळता आल्यामुळे नारळाच्या झावळ्यांमधून झेपावलेला थंडगार थेंब भानावर आणतो.

वाटेकडेच्या गवतातील सळसळ ऐकताच तुम्ही चपापून खडे होता. इतक्‍यात, परतायला उशीर झालेले एखादे वटवाघूळ पंखांचा झपझप आवाज करत आपल्या डोक्‍यावरून उडताना दिसेल. पाकोळीचा विलोभनीय ‘स्क्वेअर कट’ आपली लयबद्ध चाल पुन्हा बिघडवेल. झाडांच्या डोलीत अगर फांदीवर किंवा काटक्‍या-कुटक्‍यांच्या घरट्यातून पक्ष्यांची चाललेली आवराआवरीची तयारीही स्पष्टपणे जाणवेल. पानापानांतून वाहणाऱ्या पहाटवाऱ्याचे संगीत कानाला स्पर्शून जाईल. सावकाश क्षितिजावर तांबडी कड दृष्टीस पडेल. आकाशात झेपावण्याच्या उद्‌घोषणांचा सुरेख कल्लोळ झाडांच्या अनेक टर्मिनल्सवर अनुभवयास मिळेल. निशाचरांची ॲरायव्हल्सही एखाद्या पुराण्या चिंचेच्या अगर अश्‍वत्थांच्या अंगाखांद्यावर आपापल्या पार्किंग लॉटमध्ये कोणी घुसले नाही ना, याची खात्री करताना आढळतील. इतका वेळ ‘डिपार्चर’च्या तयारीत असलेल्या अनेक पक्ष्यांची उड्डाणे आसमंतात घिरट्या घालू लागतील. एखादी बगळ्यांची पांढरीशुभ्र माळ या केशरी रंगात न्हाऊन निघेल. उगवत्या सूर्याच्या गळ्यात क्षणभरासाठी माळ घालून बगळे हारीने पुढे सरकतील. लष्कराच्या प्लॅटून निघाव्यात शिस्तीने तशा पक्ष्यांच्या रांगा सरकतील ओळीओळीने. 

एखादा पोपटांचा थवा टिऽऽ टीऽऽ चि-ऽऽ आवाज काढत वायुवेगाने एखाद्या झाडाचा शेंडा गाठावयास निघालेला असेल. इतर पक्ष्यांनीही आपापली खाद्याची जागा त्या फळांच्या गंधाने हेरली असेल. रातराणीच्या फुलांचा गंधही एखाद्या बंगल्यात आपल्या सुवासाला सोडून गेलेला असेल.

सोनचाफ्याच्या अगर मोगऱ्यांच्या अस्तित्वाच्या खुणाही घाणेद्रियांना जाणवतील. आंब्याच्या मोहरांचा गंध मनाला बेधुंद करत ‘मी येतोय’ अशी आठवण करून देईल. पिकलेल्या फळांचा गोडसर वास आपल्या सभोवताली लपेटून उभा असलेला औदुंबरही आपल्याला अवचित भेटेल. इतके दिवस पारखे झालेल्या अनेक गंधांचे, घटनांचे संदर्भ आपल्या पंचेद्रियांना करून द्यायलाही ही वेळ कारणीभूत ठरेल. ऐन थंडीत कोठे तरी उन्हाळ्याच्या आगमनाची, चाहुलीची वर्दी देणारा, आठवण करून देणारा पळस निपर्ण होऊन अग्निशिखेचे रूप धारण करील. या केशरी फुलांभोवती भुंग्यांचा आरव, सूर्यपक्ष्यांची लगबग, पोपटांच्या न्याहरीची धडपड चालू असताना दिसेल. कुठून तरी एखादी खारूताई आपले पदलालित्य दाखवून शेपटीचा शेंडा उडवत कसलेल्या ‘जिम्नॅस्ट’ला ही लाजवील असे नर्तन करीत इकडून तिकडे उड्या मारत जाईल, शिंजीरसारखे पिटुकले पक्षी शेपट्या उडवीत इकडून तिकडे काही तरी टिपताना आढळतील. अखिल पक्ष्यांचे हे स्वरसंमेलन शब्दबद्ध करणे अवघड आहे, इतके नानाविध आवाज एकमेकांत मिसळून जो संगीतकल्लोळ तयार होतो, त्या स्वराविष्काराची प्रत्यक्ष अनुभूतीच घ्यायला हवी. रामप्रहरीचे हे पक्षिगान मनाला, तनाला प्रसन्न करणारे असते. 

मिस्टर कोकीळ यांची लकेर त्यांच्या वेगात उडण्याची कल्पना देऊन जाईल, कोणत्या तरी झाडावर कावळ्यांची शाळा भरलेली आढळेल. सातबायांचा (सातभाई) गलका वर्गात गुरुजी नसल्याची आठवण करून देईल.

पक्ष्यांमध्ये कोणत्या तरी कारणावरून चाललेली ‘दंगल’ही अनुभवयास मिळेल. मुंग्यांची शिस्तबद्ध रांग पुणेरी ट्रॅफिकवर मल्लिनाथी करताना आढळेल. एखाद्या सर्पराजाच्या दर्शनाने घाबरलेल्या चिमण्यांचा चिवचिवाट नेहमीसारखा नसेल. मधमाश्‍यांची मोहराच्या फुलांशी चाललेली सलगी... फळप्राप्त प्रीत्यर्थम्‌ करण्याची जाणीव करून देईल. उन्हाची तिरीप अंगावर घेत असलेला एखादा पक्षी चोचीने अंग स्वच्छ करताना आढळेल. सुतार पक्ष्याची लयबद्ध ठोकाठोकी कोणत्या तरी झाडाच्या खोडामधून ऐकू येईल.

हवेतल्या हवेत गिरकी घेत उडणाऱ्या पतंगालाही आपली शिकार कधी झाली हे कळणार नाही अशा सुखोईच्या स्वप्नातील वेगात एखादा वेडा राघू आढळून येईल. एखादा मुनियांचा थवा भर्रकन जमिनीवर उतरून सांडलेल्या गवत बियांचा समाचार घेताना आढळून येईल. बुलबुलांची उंबराच्या झाडावरील लगबग एखाद्या मंगल कार्यालयातील करवल्याच्या वरताण दिसेल. गवताळ रंगाची लाव्हरी आपल्या पायरवाने भुऽऽ र्रकन पंख फडकवत झेपावेल. एखादं पाखरू घरट्यातल्या बाळांना भरवताना दिसेल. सकाळच्या या सांगीतिक मेजवानीत अनुभवलेला लाइव्ह परफॉर्मन्स शब्दविरहित असेल. इतका वेळ निसर्गाशी चाललेला आपला संवाद खरे तर आपल्याशीच असेल. समोरचा लख्ख उजेड मनातही पडलेला असेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktpeeth artical vinayak borkar