माझी मुलं!

अदिती साने-जोगळेकर
गुरुवार, 11 जुलै 2019

माझ्या वर्गात येणारी सगळीच मुले माझी असतात, पण या मुलांबद्दलचे माझेपण खास आहे.

माझ्या वर्गात येणारी सगळीच मुले माझी असतात, पण या मुलांबद्दलचे माझेपण खास आहे.

होय, ती सारी माझी मुले. खरे तर प्रत्येक वर्षी नव्याने वर्गात येणारी मुले ‘माझीच’ असतात. पण तरीही या मुलांविषयी जरा जास्तच माझेपण आहे. आता ती चिमणी पाखरे पंख पसरून आकाशाला गवसणी घालायला उंच झेपावली. हो! मी शिक्षिका म्हणून एस.पी.एम. शाळेत रुजू झाले त्या वर्षीची ही पहिली तुकडी. माझ्या पूर्व माध्यमिकच्या वर्गातली चिमणी पाखरे आता दहावीच्या परीक्षेत उत्तम यश मिळवून पुढे निघाली आहेत. माझ्यासाठी खपू आनंदाचा क्षण. आज त्यांना आनंदाने शाळेत येऊन पेढे वाटताना पाहिले आणि आठवला त्यांचा शाळेतला पहिला दिवस. त्यांचा आणि माझाही. तो माझ्या कडेवरून खाली उतरायला तयार नसलेला आर्यन, माझ्याशिवाय कोणाकडूनही डबा न खाणारी वैभवी, बालवयातच आपल्या हुशारीची चुणूक दाखवणारी मिताली, सर्वजण अगदी बालरूपात मनात रुंजी घालू लागले.

त्यांचा विद्यार्थी म्हणून प्रवास सुरू झाला आणि मीदेखील शिक्षिका म्हणून घडू लागले. आज दहा वर्षांत खूप मुले हाताखालून गेली. माझ्या परीने मी त्यांना योग्य संस्कार देण्याचा, आपली मातृभूमी, मातृभाषा यावर प्रेम करायला शिकवण्याचा मनापासून प्रयत्न केला आणि तो नक्कीच यशस्वी झाला आहे याची मला खात्री आहे. आज या मुलांच्या संस्कारपूर्ण वागण्यावरून हे दिसून येते. 

आजकालच्या धावपळीच्या काळात सर्वच आई-वडिलांना अत्यंत व्यग्र आयुष्य जगावे लागते. मनात इच्छा नसली तरी मुलांना हवा तेवढा वेळ देता येत नाही. अशा वेळी त्यांच्यावर संस्कार करणे आणि त्यांच्या कोवळ्या वयात प्रेमाची पखरण करणे ही जबाबदारी पूर्ण प्राथमिकच्या शिक्षकांना उचलावी लागते. मी स्वतःला भाग्यवान समजते की मला ही संधी मिळाली आहे. ज्याप्रमाणे आईला आपली सगळी मुले समान, प्रिय असली तरी पहिल्या वहिल्या बाळाचा जरा जास्तच लळा असतो असे म्हणतात. तसेच माझ्या या पहिल्या तुकडीचे विद्यार्थी माझ्या हृदयाच्या सदैव नक्कीच जवळचे असतील यात शंका नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Muktpeeth Article Aditi Sane Jogalekar

टॅग्स