मोगऱ्याचे रोप

अरुणा नगरकर
मंगळवार, 26 डिसेंबर 2017

त्यांनी मोगऱ्याचे रोप लावले होते. त्याचा गंध पसरला चहुकडे. त्या गंधाच्या मंडपाखालून दोन मैत्रिणी आधीच निघून गेल्या होत्या. त्यांच्यामागून गेलेल्या तिसरीच्या आठवणी दाटून आल्या.
- अरुणा नगरकर

कुसुम नगरकर ही माझी आई. ‘लक्ष्मी क्रीडा मंदिर’ची सुरवात झाली, त्या वेळी ती तेथे बॅडमिंटन, टेबल टेनिस खेळण्यासाठी जायची. तेथे सिंधूताई जोशी याही येत असत. दोघींची ओळख झाली. काहीतरी नवे करून पाहावे म्हणून त्यांनी १९५८ला मॉडर्न हायस्कूलमध्ये ‘आहार केंद्र’ चालू केले. त्यांना तिसरी मैत्रीण मिळाली, लीला भागवत. तिघी मैत्रिणींच्या कामाला सुरवात तर छान झाली होती. पुढे पानशेतचा पूर आला, तेव्हा काँग्रेस हाउसजवळ पूरग्रस्त वसाहतीत त्या मदत करायला धावल्या. 

याच काळात मतिमंद मुलांसाठी शाळा सुरू करण्याचा विचार सिंधूताईंच्या मनात आला. त्या वेळी मतिमंद मुलांसाठी काम करणारी संस्था पश्‍चिम महाराष्ट्रात नव्हती. घरातील दिव्यांग व्यक्ती म्हणजे त्या घराला ‘शाप’ आहे असेच वाटत असे. अशी मुले सांभाळणे म्हणजे घरातील लोकांची परीक्षाच.

मानवी भावना आहेत, पण त्या योग्य पातळीवर जगण्याची बौद्धिक क्षमता नाही, अशा कात्रीत सापडलेल्या मुलांचे अनेक प्रश्‍न असतात. सिंधूताईंच्या घरात एका खोलीत दोन मुलांसह शाळा सुरू झाली. निःस्वार्थी, सेवाभावी वृत्तीने तिघी मैत्रिणीच पडेल ते काम करायच्या. ‘कामायनी’ नावाच्या संस्थेची स्थापना झाली. कामायनी म्हणजे श्रद्धा. हे सामाजिक कार्य श्रद्धापूर्वक करावयास सुरवात झाली. अशा मुलांना रागावून चालत नाही. त्यांचे रुसवेफुगवेही खूप असतात. कार्यानुभवावर भर देऊन शिकवावे लागते. खूप संयम ठेवावा लागतो.

अशा मुलांना शिकवण्यापासून सुरवात झाली. विद्यार्थिसंख्या वाढू लागली. विद्यार्थ्यांना शाळेत गुंतवून ठेवायचे; पण ती मुले स्थिर कधी बसणार? त्यांना काम हवे. भवानी पेठेतून दाण्याचे, साबुदाण्याचे पोते आणले, वजनकाटा आणला. मुलांकडून एक-दीड किलोच्या कागदी पिशव्या भरून विकायला सुरवात केली. मग प्लॅस्टिकच्या पिशव्या आल्या. त्याची सगळी माहिती करून घेतली. त्याचे मशिन आणून पिशव्या बनू लागल्या.

मुलांकडून नॅपकिन्स बनवले, भेटकार्डे बनवली, मेणपणत्या, डस्टर्स बनवले, असे अनेक उद्योग सुरू झाले. दिव्यांग मुलांना उद्योगात गुंतवून अर्थार्जन करता यावे, या हेतूने उद्योगकेंद्रास सुरवात झाली. बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी ठिकठिकाणी हिंडून ऑर्डर्स आणण्यापासून सर्व कामे आईने केली आहेत. सायकलवर चकरा मारून तिने संस्थेची कामे केली आहेत. हे काम वाढत जाऊन आज कामायनी शाळेची मोठी इमारत, तसेच उद्योगकेंद्राची स्वतंत्र इमारत उभी राहिली आहे.

आता पैशाची जोखीम वाढली होती. आईने डोळ्यांत तेल घालून पै-पैचा हिशेब जपला. स्वतः हिशेब लिहिणे, तपासणे, प्राप्तिकर-विक्रीकर आदीची माहिती करून घेऊन सर्व व्यवहार चोख ठेवणे या सर्व अनुभवातून पन्नास वर्षे ती संस्थेची खजिनदार राहिली. तिच्या अनुभवाचे ज्ञान वाणिज्य पदवीधर हिशेबनीस यांच्यापेक्षा भारी ठरायचे. एम.कॉम. झालेले अकाउंटंटसुद्धा हिशेब लिहिताना, कुसुममावशी तपासणार ना, मग ते चोख झालेच पाहिजेत असे लिहीत. कारण त्यांची एखादी चूकही मावशींना एक नजर टाकून कळते, हे त्यांना माहीत होते. अशा प्रकारे तिच्या सेवाभावी वृत्तीला अनेक दिशा प्राप्त झाल्या. कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता ती सतत कार्यरत राहिली.

दैवयोगाने तिला उत्तम आयुरारोग्य लाभले होते. त्याचे रहस्य साठाव्या वर्षांपर्यंत सायकल चालवण्यात आणि रोज चार किलोमीटर चालण्यात होते. ‘कामायनी’तले काम झाले, की रोज चालत ती लक्ष्मी क्रीडा मंदिरात जायची. प्रत्येक कार्यक्रमात तिचा सहभाग असायचा. तेथे भरतकाम, विणकाम, पदार्थ बनवणे अशा अनेक प्रकारच्या स्पर्धा व्हायच्या. सर्व स्पर्धांमधून तिला जास्तीत जास्त बक्षिसे मिळायची. नंतर तेथे ब्रिज खेळायला सुरवात केली.

ब्रिज तर तिच्या आवडीचा विषय. वयाच्या ९६ वर्षांपर्यंत ती ब्रिज खेळायची. खेळताना पाने बरोबर लक्षात असायची. तिने मंडळात नवीन येणाऱ्या सभासदांना ब्रिज शिकवून तयार केले.

कुठलेही हातात घेतलेले काम चोखपणे, नीटनेटकेपणे करणे हे तिचे वैशिष्ट्य होते. आणखी एक गुण म्हणजे सुगरणपणा. कोणताही पदार्थ ती उत्तम बनवायचीच; पण किती करावा याचा अंदाज कधीही चुकत नसे. मंडळातील सत्तर-ऐंशी बायकांना डाळ, पन्हे किंवा कोणताही पदार्थ ती एकटी स्वतःच्या हिमतीवर करत असे. मनुष्यसंग्रह करायची तिची एक वेगळीच शैली होती. कायम ती पडद्यामागची कार्यकर्ती होऊन वावरली, त्यात ती समाधानी होती. मिळाले त्याचा सात्त्विक आनंद घेणारी होती. हुरळून जाणे तिला माहीत नव्हते. तिघी मैत्रिणींनी लावलेले कामायनी नावाचे मोगऱ्याचे झाड आज चांगलेच बहरून त्याचा सुगंध सर्वदूर पसरला आहे, एवढे मात्र खरे. या तीन मैत्रिणींमधली दोन कड्या आधीच निखळल्या होत्या. मधली उरलेली कडीही निखळली, तसे हे सगळे मनात दाटून आले, इतकेच.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktpeeth article aruna nagarkar