दुःखी मन मेरे...

अविनाश भिडे
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

अनेक रुग्णांशी बोलता बोलता माझे मन अनेकदा आठवणींभोवती घोटाळायला लागते आणि मी अस्वस्थ होऊन जातो.

अनेक रुग्णांशी बोलता बोलता माझे मन अनेकदा आठवणींभोवती घोटाळायला लागते आणि मी अस्वस्थ होऊन जातो.

पन्नास वर्षे उलटली. अजूनही एक बोच कायम आहे. खरे तर, लहानपणी मिरगीचा आजार असल्यामुळे त्याच्यात काही कमतरता निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे मीच काय, आम्ही अनेक जण त्याला निरनिराळ्या प्रकारे चिडवत होतो, त्याच्या त्या कमतरतेचा फायदा घेत होतो. खेळत असताना आम्ही त्याच्यावर नेहमी हार आणत होतो. तो चालत असताना त्याच्या पायात आडवा पाय टाकून त्याला पाडत होतो. त्याची मस्करी करत होतो.

पत्ते खेळताना त्याचे पत्ते फोडून त्याला हरवत होतो. त्याची वह्या-पुस्तके लपवून ठेवत होतो. आमच्या अशा वागण्याचा त्याच्यावर काय परिणाम होत असावा, असा विचार आमच्या मनात त्या वेळी कधीच आला नाही. तो एकाकी पडत असल्यामुळे, मनाशी काहीतरी विचार करत असणार असे आम्हाला वाटलेही नाही. तो मात्र फक्त एकच गाणे कायम स्वतःशीच गुणगुणत असे... दुःखी मन मेरे। सुन मेरा कहना। जहां नही चैना। वहां नही रहना। 

वास्तविक त्याच्यापाशी अनेक गुण होते. त्याचा आवाज गोड होता. इंग्रजी चांगले होते. चांगला बोलत असे. शाळेत इंग्रजी विषयात उत्तम गुण मिळवत असे. त्याचे गणित कच्चे होते आणि तशातही तो मॅट्रिक पास झाला होता.

त्या वेळी त्याचे कौतुक करण्याऐवजी, तू परीक्षकांच्या चुकीमुळेच पास झालास असेही आम्ही चिडवत होतो. या सर्व गोष्टींचा त्याच्यावर परिणाम होऊन त्याच्यामध्ये न्यूनगंड निर्माण झाला होता आणि नंतर एकामागून एक आलेल्या अपयशांमुळे तो वाढत गेला. तो व्यसनांच्या आहारी गेला होता, इतकेच कळले होते. आज मानसशास्त्राचा डॉक्‍टर म्हणून खुर्चीत बसलो असताना मी जास्तीच बेचैन होतो. अनेक रुग्णांशी बोलता बोलता माझे मन अनेकदा त्या आठवणींभोवती घोटाळायला लागते आणि मी अस्वस्थ होऊन जातो. एकदा माझा बरा झालेला रुग्ण भेटायला आला होता. बोलत होतो आम्ही. तेवढ्यात त्याने मला विचारले, ‘‘डॉक्‍टर, बोलता बोलता आता तुम्ही मधेच थांबलात का?’’ मी डोळे मिटले, म्हणालो, ‘दुःखी मन मेरे।’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Muktpeeth Article Avinash Bhide