रिक्षा, आजी आणि मी

भालचंद्र जुवेकर
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

रिक्षा मिळत नव्हती. तेवढ्यात एका आजीबाईनी त्यांची रिक्षा दिली. रिक्षावालाही प्रामाणिक होता.

रिक्षा मिळत नव्हती. तेवढ्यात एका आजीबाईनी त्यांची रिक्षा दिली. रिक्षावालाही प्रामाणिक होता.

भुसारी कॉलनीमधील बॅंकेत गेलो होतो. काम झाल्यावर रस्त्यावर येऊन रिक्षाची वाट पाहत उभा होतो. मला एकलव्य कॉलेजपाशी जायचे होते. पाच-सहा रिक्षा थांबवल्या. पण इतक्‍या जवळ येण्यास कोणीच तयार नव्हते. दुपारचे बारा वाजले होते. कडक उन्हात अर्धा तास उभा राहिल्यामुळे उन्हाचा त्रास जाणवू लागला व पायही दुखायला लागले होते. तेवढ्यात एक
रिक्षा माझ्यासमोरच थांबली. रिक्षामधून साधारण पंचाहत्तरीच्या आजी खाली उतरल्या. रिक्षाचालकाला काही सूचना देऊन त्या बॅंकेत जाण्यास निघाल्या. मी लगेच रिक्षावाल्याकडे गेलो आणि एकलव्य कॉलेजजवळ जायचे आहे, असे सांगितले. पण त्याने चक्क नकार दिला. ‘रिक्षा खाली नाही’ म्हणून सांगितले. आमचे बोलणे त्या बॅंकेत निघालेल्या आजीने ऐकले. त्या रिक्षाचालकाजवळ परत आल्या आणि त्याला रागावून म्हणाल्या, ‘‘का रे! का त्यांना नाही म्हणतोस? तुला दिसत नाही का, ते एक वयस्कर नागरिक आहेत! इतक्‍या उन्हात ते चालत कसे जाणार? जा त्यांना घेऊन जा. बॅंकेतील माझे काम संपायला अर्धा-पाऊण तास तरी लागेल. तोपर्यंत तू जाऊन परत येशील.’’ रिक्षाचालकाने मला रिक्षात बसायला सांगितले. 

एकलव्य कॉलेज आल्यावर रिक्षा थांबवण्यास सांगितले. भाडे अठरा रुपयेच झाले होते. त्याच्या सीटवर वीस रुपयांची नोट ठेवून सोसायटीत जाण्यासाठी निघालो. कारण आत्तापर्यंचा अनुभव असा होता, की वीस रुपयातले दोन रुपये कुठल्याच रिक्षावाल्याने परत केले नव्हते. तेवढ्यात रिक्षाचालकाने मला हाक मारून परत बोलावले. म्हणाला, ‘‘काका, मला रिक्षाचे भाडे नको.

तुमचे वीस रुपये परत घ्या.’’ मला आश्‍चर्य वाटले. नंतर त्यानेच खुलासा केला, की ‘‘आजींनी भाडे घेऊ नकोस म्हणून मला बजावले आहे.’’ मला आजींचे कौतुक वाटले. मोठेपणाचा आव न आणता अगदी न कळत त्यांनी मला मदत केली होती. पण मला जास्त आश्‍चर्य वाटले ते त्या रिक्षाचालकाचे. त्याने माझ्याकडून वीस रुपये घेतले असते तरी ते आजीला कळणार नव्हते. परंतु त्याने आजींचा शब्द पाळला आणि आपला प्रामाणिकपणा सिद्ध केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Muktpeeth Article Bhalchandra Juvekar

टॅग्स