किल्ले भ्रमंती - हरिहर किल्ला 

भारत सकपाळे
गुरुवार, 27 जुलै 2017

या आठवड्यात ट्रेकसाठी हरिहरगडासाठी निवड केली होती. तसं तर या किल्ल्यावर जाण्याचा प्लॅन खूप आधीपासून बनवत होतो. पण काही कारणांमुळे बेत ठरत नव्हता. शेवटी या रविवारी ते जमवलंच.. मी, भारत सपकाळे सुरेंद्र रावत, जितेंद्र शिंदे आणि त्याचा साडेपाच वर्षांचा मुलगा वेद अशी चार मावळ्यांची तुकडी घेऊन मी निरगुडपाड्याकडे कूच केलं. नेहमीप्रमाणे माझ्याच गाडीने निघालो. 

या आठवड्यात ट्रेकसाठी हरिहरगडासाठी निवड केली होती. तसं तर या किल्ल्यावर जाण्याचा प्लॅन खूप आधीपासून बनवत होतो. पण काही कारणांमुळे बेत ठरत नव्हता. शेवटी या रविवारी ते जमवलंच.. मी, भारत सपकाळे सुरेंद्र रावत, जितेंद्र शिंदे आणि त्याचा साडेपाच वर्षांचा मुलगा वेद अशी चार मावळ्यांची तुकडी घेऊन मी निरगुडपाड्याकडे कूच केलं. नेहमीप्रमाणे माझ्याच गाडीने निघालो. 

'नाशिक 50 किलोमीटर' असा माईलस्टोन दिसायला लागल्यावर 'जीपीएस' चालू केलं. गाडी 'जीपीएस'च्या सूचनांनुसार धावू लागली आणि शेवटी निरगुडपाडा या हरिहरच्या पायथ्याच्या गावात पोचलो. समोरच काही अंतरावर रांगडा हरिहर गड दिसत होता. हा तसा जास्त कठीण चढाईचा किल्ला नाही. 

किल्ल्याकडे जाणारी वाट ही झाडाझुडपातून जाणारी आहे आणि अंदाजे तासाभरात आपण किल्ल्याजवळ पोचतो. ट्रेकिंग सुरू असताना छोट्या वेदचं चिखलातून-दगडांमधून उड्या मारत, मस्ती करत चालणं, भारत दादाला गरगरल्यासारखं होणं असे अनुभव घेत घेत शेवटी किल्ल्यावर पोचलो. 

खरोखरच किल्ल्यामद्दल जसं वाचलं होतं, अगदी तसंच किल्ल्यावर जाणाऱ्या दगडांमध्ये कोरलेल्या पायऱ्या पाहून त्यांच्या प्रेमात पडायला होतं. किल्ला तसा फारसा मोठा नाही; पण किल्ल्यावरच्या एका टेकडीवरून सभोवतालचा परिसर न्याहाळणं हा हाडाच्या ट्रेकरसाठी अविस्मरणीय अनुभव असतो. किल्ल्यावर ढग जमा झाल्यामुळे दारूगोळा ठेवण्याचे कोठार मात्र पाहायला जमलं नाही. 

गडाविषयी थोडीशी माहिती -
नाशिक जिल्ह्यातील ब्रह्मगिरीच्या पश्‍चिमेस सुमारे 20 किलोमीटर अंतरावर हरिहरगड उर्फ हर्षगड वसला आहे. हा किल्ला प्राचीन काळात बांधला गेला आहे. अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात हा गड होता.

1636 मध्ये शहाजीराजांनी शेजारचा त्र्यंबकगड घेताना हाही किल्ला जिंकून घेतला. मात्र नंतर याचा ताबा मोगलांकडे गेला. पुढे 1670 मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी हा गड जिंकून स्वराज्यात मोलाची भर घातली. 8 जानेवारी, 1689 रोजी मोगल सरदार मातब्बर खान याने हा किल्ला जिंकला. शेवटी 1818 मध्ये हा गड मराठ्यांच्या ताब्यातून इंग्रजांनी जिंकून घेतला. इतकी मालकी अनुभवणारा हा किल्ला इतिहासकाळात शेजारच्या त्र्यंबकगडापाठोपाठ या भागातील हा दुसरा महत्त्वाचा किल्ला आहे. आजही या किल्ल्याच्या पायथ्याच्या वाड्यांना 'टाकेहर्ष', 'आखली हर्ष' अशा नावाने ओळखले जाते. 

त्रिकोणी आकाराचा हरिहरगड, त्याचा सरळसोट दगडी जिन्याचा मार्ग, पुढे लागणारा बोगदा व गडावरील सर्व दुर्गावशेष वैशिष्ट्यपूर्ण असेच आहेत. त्याच्यावर पोचण्यासाठी दगडात खोदलेल्या खड्या जिन्याच्या मार्गामुळे दुर्गयात्रींच्या परिचयाचा आहे. समुद्रसपाटीपासून 1120 मीटर उंचीवर असलेला हा त्रिकोणी आकाराचा किल्ला, त्याचा कातळ कोरीव पायऱ्यांचा मार्ग, त्याची बोगद्यातून करावी लागणारी अंतिम चढाई हे सारं सारं गिरीप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. 

1818 मध्ये मराठेशाही बुडविण्याच्या इंग्रजांच्या धडक कारवाईत कॅप्टन ब्रिग्ज हा इंग्रज अधिकारी हरिहरगड जिंकून घेताना त्याच्या पायऱ्या पाहून आश्‍चर्यचकित झाला व उद्गारला.. 'या किल्ल्याच्या पायऱ्यांचे वर्णन शब्दांत करणे कठीणच..! सुमारे 200 फूट सरळ व तीव्र चढाच्या या पायऱ्या अतिउंच ठिकाणावर बांधलेल्या एखाद्या जिन्यासारख्या वाटतात..' खरेतर त्यावेळी इंग्रजांचे धोरण गिरीदुर्गाच्या वाटा व प्रवेशमार्ग तोफा लावून उध्वस्त करण्याचे होते. त्या धोरणास अनुसरून त्यांनी अनेक गडांचे मार्ग उध्वस्त केलेही.. पण हरिहर किल्ल्याच्या अनोख्या पायऱ्यांनी आपल्या राकट सौंदर्याची मोहिनी अशी काही त्या कॅप्टन ब्रिग्जवर घातली, की त्याने हरिहरगड जिंकून घेतालच; पण त्याच्या सुंदर पायऱ्यांच्या मार्गाला मात्र हात लावला नाही. यावरूनच लक्षात येते की हरिहर त्याच्या पायऱ्यांसाठीही प्रसिद्ध आहे. 

किल्ल्यावर पाहण्यासारखे -
या ठिकाणी डोंगराच्या मध्यभागी शेंदूर फासून ठेवलेले अनगड देव आपणास दिसतील. त्यांच्या मध्यभागी एक त्रिशूळही रोवून ठेवलेला असून हा अनामिक देवतांचा दरबार येथून येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतो. पुढे गेल्यानंतर आपण काही वेळातच किल्ल्याच्या अजस्त्र अशा काळ्या पहाडासमोर येतो. हरिहर किल्ल्याच्या पायथ्यावरून किल्ल्याच्या पायऱ्यांच्या मार्गाकडे दृष्टी देताच हा अक्षरश: गगनाला भिडलेला मार्ग पुढे आपणांस स्वर्गारोहणाचा अद्भुत अनुभव देईल, याबद्दल मनात तीळमात्र शंका उरत नाही. 

काळ्या कातळात एकापाठोपाठ एक पायऱ्या कोरलेला हा दगडी जिन्याचा मार्ग एकावेळी एकच व्यक्ती वर चढू शकेल, इतका अरुंद आहे. म्हणून काळजीपूर्वक वाटचाल करावी. शेवटी साधारणत: 90 पायऱ्यांचा सोपान चढल्यावर आपण हरिहर किल्ल्याच्या पहिल्या छोटेखानी, पण देखण्या प्रवेशद्वारात येऊन पोचतो. इथे थोडावेळ थांबून थंडगार वाऱ्याचा आनंद घ्यायचा व पुढील चढाईस ताजेतवाने व्हायचे. 

हरिहर किल्ल्याचे हे पहिले प्रवेशद्वार व त्याच्या दोन्ही बाजूंस असणारे दोन लहान बुरुज कातळात खोदून काढलेल्या मार्गाची शोभा वाढवितात. गडाच्या या प्रवेशद्वाराशेजारीच गणरायाची शेंदूर फासलेली एक छोटी मूर्ती दिसेल. या मार्गाने अंग चोरत पुढे गेल्यानंतर कातळातच खोदलेले दोन दरवाजे पार केल्यानंतर परत साधारण 130 पायऱ्यांचा दगडी जिना लागतो. या मार्गाच्या दोन्ही बाजूंना हाताचा पंजा रुतविण्यासाठी खोबणी आहेत. त्यांची मदत घेत, धापा टाकत आपण शेवटी अंतिम प्रवेशद्वारात येऊन पोचतो. हरिहर किल्ल्याचा हा शेवटचा छोटा दरवाजा पार करून थोडे पुढे गेल्यानंतर डाव्या हाताला खालच्या बाजूला एक गुहा आहे. पण तिथे उतरण्यासाठी दोराची मदत घेणे गरजेचे ठरते. त्यामुळे वरूनच ही गुहा पाहून पुढे गेल्यावर गडाच्या सदरेचे अवशेष आपणांस दिसतात. ते पाहून पुढे गेल्यावर तीन पाण्याची टाकी व एक प्रशस्त तलाव लागेल. पश्‍चिम बाजूने दगडी भिंत बांधून पाणी अडविलेल्या या तलावाच्या काठावर हनुमंताचे छोटे देऊळ असून येथील बाजूच्या खडकावर उघड्यावरच शिवलिंग व नंदी आपणास दिसेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktpeeth article bharat sapkale