शंभर रुपयांची पैज

गिरीश जाधव
बुधवार, 10 जुलै 2019

पैजा लावणे खूप जणांना आवडते. दादा स्वतःहून पैजा लावायचे नाहीत; पण दुसऱ्याने पैज लावली तर ती जिंकायचे.

पैजा लावणे खूप जणांना आवडते. दादा स्वतःहून पैजा लावायचे नाहीत; पण दुसऱ्याने पैज लावली तर ती जिंकायचे.

सुटीत मी हमखास आजोबांसोबत गावी जात असे. एका सुटीत मी आणि आजोबा एसटीने गावी निघालो होतो. एसटी थांबली, की दादा एसटीतून खाली उतरून मला काही तरी खायला किंवा वाचायला घेऊन येत असत.

प्रत्येक थांब्यावर दादा उतरताना पाहून आमच्या शेजारी बसलेले सद्‌गृहस्थ हसत होते. दादाही त्यांच्याकडे बघून स्मितहास्य करीत होते. थोड्या वेळाने ते गृहस्थ दादांना म्हणाले, ‘‘आजोबा, तुमच्याबरोबर मला शंभर रुपयांची पैज लावायची आहे. पैज तशी सोपी आहे. तुम्ही पुण्यापासून प्रत्येक एसटी थांब्याला उतरत होता, तसेच तुम्ही कोल्हार थांब्याला उतरून काहीतरी घेऊन यायचे.’’ पुणे-मनमाड एसटी कोल्हार थांब्यावर फार वेळ थांबत नाही, हे त्या गृहस्थांना माहीत असावे. दादांनी पैजेचा विडा उचलला. ठरल्याप्रमाणे दादा कोल्हार थांब्याला उतरले होते. दहा मिनिटे झाली, पण दादा एसटीमध्ये आले नव्हते. मी काळजीत पडलो होतो. कंडक्‍टर आत येऊन नव्या प्रवाशांना तिकिटे देऊ लागला होता. बहुतेक दादा खालीच राहतील म्हणून माझ्या हृदयाची धडधड वाढू लागली होती. तो गृहस्थ मला सारखा चिडवत होता.

अधूनमधून पेपर वाचत होता आणि लिमलेटच्या गोळ्या खात होता. मधूनच माझे गालगुच्चे घेत होता. पण आश्‍चर्य एसटीसुद्धा जागेवरून हालली नव्हती. अखेर पंचवीस मिनिटांनी आमचे दादा एसटीमध्ये आले. दादांपाठोपाठ ड्रायव्हरही आला. कंडक्‍टरने एसटीची घंटा वाजवली आणि गाडी पुढच्या प्रवासासाठी निघाली. त्या गृहस्थांनी दादांना त्याच्या पाकिटातून शंभर रुपये काढून दिले. काय झाले होते, कोल्हारला पोचल्यानंतर दादांनी एक युक्ती केली. एसटीच्या ड्रायव्हर-कंडक्‍टरला चहाला बोलावले. त्या दोघांनी दादांचे चहाचे निमंत्रण स्वीकारले. ड्रायव्हर आमच्या गावाच्या बाजूचा कोकणखेड गावचा होता आणि कंडक्‍टर लासलगावचा होता. ते दोघेही दादांना ओळखत होते. म्हणून त्यांनी दादांचे चहाचे निमंत्रण स्वीकारले होते. अशा पद्धतीने आमच्या दादानी शंभर रुपयांची पैज जिंकली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Muktpeeth Article Girish Jadhav