म्हातारबाचा आंबा

जयंत पंढरीनाथ शिंदे
शुक्रवार, 3 मे 2019

बालपणी आंब्याची गडद माया अंगावर घेतलेली. इतक्‍या वर्षांनंतरही मनात तो आंबा हिरवा ठिपका होऊन राहिलेला.

बालपणी आंब्याची गडद माया अंगावर घेतलेली. इतक्‍या वर्षांनंतरही मनात तो आंबा हिरवा ठिपका होऊन राहिलेला.

वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक लागले, की अभ्यासाबरोबर सर्वांत आधी आठवायचे ते आजोळ. चाळकवाडी गाव आपल्याला हाका मारतेय असे वाटायचे. दरवर्षी सुटीत आई व आम्ही भावंडे दोन महिने गावालाच मुक्काम.

घरापासून पाच मिनिटांच्या अंतरावर आंब्याचे झाड होते. म्हातारबाचा आंबा. माझ्या गावाकडील असंख्य आठवणींना म्हातारबाचा आंबा साक्षीदार आहे.

आम्ही घरातून निघतानाच खिशातून हळद व तिखट मिठाच्या पुड्या आणलेल्या असायच्या. कैऱ्या कापल्यानंतर हळद, तिखट मीठ लावून खाताना फार मजा यायची. रखरखीत दुपारी आंब्याच्या झाडाखाली सुखद गारवा पसरलेला असायचा, काही वेळा उन्हाच्या झळा अंगावरून जात, पण तेवढ्यापुरतेच. बाकी आजूबाजूला कित्येक कोस नीरव शांतता. अगदी दूरवरची काळी डांबरी सडक दिसायची, पण संपूर्ण परिसर निमर्नुष्य असे.

तेथेच झाडाखाली एखाद्या मोठ्या ढेकळाची अशी करून दुपारची छोटी झोप उरकली जायची. दुपार उलटून गेल्यावर पुन्हा एकदा मुलांचा कल्ला सुरू व्हायचा, कधी-कधी मध्यम लाकडी बांबूचा मांडव जाड काथ्याच्या साह्याने बांधून व त्यावरती एखादी जुनी चादर टाकून आम्ही शिवाजी महाराजांच्या नाटकाची तालीम करायचो. कुठला तरी जुना पुराणा पत्र्याचा भोंगा असायचा, त्यावरती मोठ्याने ओरडून नाटकाची जाहिरात केली जायची.

मोठी जाडजूड फांदी बघून झोका बांधला जायचा. कधी तरी पत्त्यांचे डाव रंगायचे, सापशिडीचा खेळही जिवाची धाकधूक वाढवत रंगत आणायचा. कंटाळा आला की गाण्यांच्या भेंड्या. आवडती गाणीच पुन्हा पुन्हा बेसूर गायली जायची. मात्र त्याविषयी कुणाचीच काही तक्रार नसायची. 
हा दोन महिन्यांचा कालावधी मंतरलेला असायचा. मे महिन्याच्या अखेरीस परतीचा दिवस उजाडायचा. सकाळपासूनच मन सैरभैर होऊन जायचे.

परतीच्या वाटेवर आंब्यांच्या झाडाजवळ आल्यावर मनात प्रचंड कालवाकालव व्हायची, काय होतेय ते नेमके कळायचे नाही, पण आतून काहीतरी निसटून चालले आहे असे वाटायचे. क्षणभर झाडापाशी पावले थबकायची, म्हातारबाचा आंबा नजरेआड होईपर्यंत मी मागे वळून-वळून पाहत राहायचो. अगदी दूरपर्यंत, तो हिरवा ठिपका दिसेनासा होईपर्यंत!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Muktpeeth Article Jayant Shinde