समंजसपणा

कल्पना जाखडे
सोमवार, 29 जुलै 2019

मुलांच्या शाळेच्या पहिल्या दिवसाचा कौतुक सोहळा काहीजण डोळाभर पाहतात, काहींच्या डोळ्यांत कौतुकाचा सोहळा असतो.

मुलांच्या शाळेच्या पहिल्या दिवसाचा कौतुक सोहळा काहीजण डोळाभर पाहतात, काहींच्या डोळ्यांत कौतुकाचा सोहळा असतो.

नुकत्याच शाळा सुरू झाल्या. सर्व जण आपापल्या मुलांना नव्या शाळेत घालून नवे दप्तर, युनिफॉर्म, टिफीन बॅग आवर्जून घेऊन शाळेत सोडायला येतात. कौतुक सोहळा डोळाभर बघतात. जे मला मिळाले नाही ते सारे काही माझ्या मुलाला मिळो म्हणून धडपडतात. त्यातलीच स्नेहा, मात्र थोडी वेगळी. खरे तर इतर कामवाल्या ताई-बाईंचे प्रतिनिधित्व करणारी. काम करता करता म्हणाली, ‘‘काकू, आज शाळा सुरू झाल्या ना! माझी विद्याबी शाळंत गेली. लई मस्त वाटतंय. छान छान कपडे, दप्तर, वॉटरबॅग घेऊन शेजारच्या काकूबरोबर शाळेत गेली. मी ठरवलय, विद्याला खूप शिकवायचं. माझ्यासारखे काम नाही करू देणार.’ ‘अगं, पण तू का नाही गेलीस तिला सोडायला? आज सुटी घ्यायची होती.’

‘तिचा बा मजुरी बुडंल म्हणून खाडा नाही करू शकत. मोठा पोरगा गेला पेपर लाइनला. मंग शाळेत जाणारं. खरं सांगू का काकू, झाली सवय याची. माझी विद्या लईऽऽ समजूतदार हाय. या महिन्यात खर्च खूप असतो; पण आपला गेल्या वर्षीचा युनिफॉर्म, दप्तर, डब्याची पिशवी आपण वापरायची बरं का?

पुढच्या वर्षी नक्की घेऊ.’’ म्हणते, ‘‘चालेल, पण मम्मे मला शाळा लई आवडते. टीचर छान असत्यात. नसू देत नवा युनिफॉर्म; पण पुढच्या वर्षी नक्की बर का मम्मे.’’ ‘‘काकू, मी गेल्या वर्षीचा विद्याचा युनिफॉर्म धुऊन गादीखाली ठेवला. दप्तर स्वच्छ करून पेपरात गुंडाळून ठेवले. आता उन्हाला ठेवलं होतं. रिबन धुऊन गॅसवर भांड गरम करून रिबनीवर फिरवलं. त्यापण नव्यासारख्या झाल्या. आता बघा विद्या साळंतनं आली का समद्यास्नी शाळेत काय झालं ते सांगत बसेल. दिवसभर शाळा आन टीचर. मी तर दोघास्नी बी सांगते, लोक मदत करतात; पण त्ये जपून वापरायचं आन त्यांना इसरायचं नाही.’’ समाधानाने कसे जगावे, याचाच धडा होता हा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Muktpeeth Article Kalpana Jakhade