चॉकलेटचा बाँब

कमल उत्तम सोनजे
सोमवार, 25 फेब्रुवारी 2019

कोणीतरी दाराशी बॉक्‍स ठेवून गेले होते. काय असेल आत? बाँब किंवा ब्राऊन शुगर तर नसेल? कोण व कशासाठी ठेवून गेले असेल?

कोणीतरी दाराशी बॉक्‍स ठेवून गेले होते. काय असेल आत? बाँब किंवा ब्राऊन शुगर तर नसेल? कोण व कशासाठी ठेवून गेले असेल?

मोठ्या मुलाकडे ऑस्ट्रेलियात होते. एके दिवशी माझा मुलगा आणि सून दोघेही घरात नव्हते. साडेचार वर्षांची नात ईशा आणि सव्वादोन वर्षांचा नातू प्रसाद यांच्यासह मी घरात होते. आम्ही फिरायला जाण्यासाठी घराबाहेर पडलो आणि दारातच एक मोठे बॉक्‍स दिसले. त्याच्यावरचा पत्ता वाचला; पण तो आमचा नव्हता. मी त्याला हात लावला नाही आणि मुलांनाही हात लावू दिला नाही. सून रात्री आठ वाजता आली. दारात ते बॉक्‍स पाहून तिलाही आश्‍चर्य वाटले. तिने ते बॉक्‍स आवाज न करता मागच्या दाराने हळूच गॅरेजमध्ये नेले. थोडीशी चिकटपट्टी काढली. आत बाँबऐवजी लाल, पिवळे, हिरवे असे वेगवेगळ्या रंगाचे चॉकलेट दिसले. तिने हळूच वास घेऊन पाहिले; पण काही कळेना. जर ब्राऊन शुगर असेल तर? किंवा मुलांना फितविण्यासाठी आणखी काही विषारी पदार्थ असतील तर? अनेक शंकांचे जाळे. शेवटी न राहवून मुलाला फोन केला. थोडक्‍यात सगळी हकीकत सांगितली. तो घरी परतला. दोघांनी हळूहळू पॅकिंग खोलले. पेपरमेंटच्या चॉकलेटसारखा वास येत होता.

सकाळी दिवसाच्या उजेडात पुन्हा बॉक्‍स उघडले. मोठ्या हिमतीने एक चॉकलेट खाऊनच पाहिले तर ते पेपरमेंटचेच चॉकलेट होते. आता त्याने त्यावरचा तुटक तुटक लिहिलेला पत्ता नीट वाचला आणि तात्काळ तो पत्ता शोधायला बाहेर पडला. पत्ता सापडला नाही. पुन्हा थोड्या वेळाने मी, तो आणि माझी नातवंडे पत्ता शोधायला निघालो. सगळीकडे गरागरा फिरत होतो. शेवटी एकदाचे त्याला ते घर मिळाले. त्या लोकांनी प्रशांतला घरात बोलावले. त्याने थोडक्‍यात पण सर्व कथा कथन केली. त्या कुटुंबातील मुलीचे लग्न असल्याने त्यांनी इतक्‍या प्रकारचे चॉकलेट मागवले होते; पण कंपनीने ते चुकीच्या पत्त्यावर आमच्या घरी आणून ठेवले होते. तो बॉक्‍स त्यांना परत केल्यामुळे त्या कुटुंबाला योग्य वेळी ती चॉकलेट्‌स मिळाली. त्यांना खूप आनंद झाला. कारण तिकडे कुठलाही कार्यक्रम असला तर वेगवेगळ्या स्वादांचे केक आणि चॉकलेट्‌स भेट देण्याची पद्धत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Muktpeeth Article Kamal Sonaje