अंजली आणि आयफोन

अंजली आणि आयफोन

नितीनला आणि मला समुद्राची फार ओढ. वेळ मिळाला की समुद्रकिनाऱ्यावर धाव घेतो. दिवेआगरला जायच्या दोन दिवस आधी मी माझा पहिला आयफोन घेतला. या फोनसाठी मी जवळपास दोन वर्ष वाट बघितली होती. अखेर मी आयफोन घेतला. पुढचे दोन दिवस आयफोनचे कौतुक करण्यात निघून गेले. सकाळी लवकर आम्ही दिवेआगरसाठी निघालो. 
प्रवास मस्त मजेत चालला होता. आयफोनवर गाणी लावणे, ‘मॅप’ बघणे, ‘फोटो’ काढणे आणि अजून बरेच काही प्रकार चालले होते. अथर्व आणि अंजली मागत होती, पण मी त्यांना माझ्या फोनला हातही लावू दिला नव्हता.  

रमत गमत आम्ही दिवेआगरला पोहोचलो. दुपारी चार वाजता आम्ही समुद्रकिनारी निघालो. जाताना नितीनने त्याचा फोन खोलीतच ठेवला, पण मी मात्र माझा आयफोन सोबत घेतला. मी फोनला एक मिनिट सुद्धा दूर करू इच्छित नव्हते. पर्समध्ये फोन सुरक्षित ठेवून मी निघाले. त्या दिवशी खूप सुंदर हवा होती. आम्ही चौघांनी पाण्यात मस्त दंगा केला, रेतीत किल्ला बनवला. हे सगळे करतांना माझें अर्ध लक्ष फोनकडेच होते. त्याला पाणी लागता नये, याची मला काळजी होती. पाच वाजता ‘वॉटर स्पोर्टस’ सुरु झाले.

अथर्व मोठा असल्यामुळे तो सगळ्याचा आनंद घेऊ शकला. पण अंजली फक्त सात वर्षाची असल्यामुळे तिला एकाही ठिकाणी जायला मिळाले नाही. ती खूप नाराज झाली. अथर्व खेळतानाचे आणि समुद्राच्या पार्श्‍वभूमीवर अंजलीचे खूप फोटो काढले. तेवढ्यात डॉल्फिन राइडसाठी बोट तयार करत होते. तिथे चौकशी केली आणि कळले की त्या राईडला सगळे जण जाऊ शकतात. अंजली खूप खुश झाली. आणखी एक कुटुंब सोबत असणार होते.

एक एक जण बोटीत चढू लागले. नितीन, अथर्व आणि अंजली चढले. एकदम माझ्या मनात फोनचा विचार आला. बोट पाण्यात आत जाणार आणि फोन वर पाणी पडले तर? मी लगेच खाली उतरले.  

‘‘मी नाही येणार. तुम्ही तिघे जा. माझा फोन ओला झाला तर?’’ मी ठामपणे सांगितले.
‘‘अगं, काही होणार नाही तुझ्या फोनला. चल, मजा येईल डॉल्फिन बघायला.’’ नितीन समजावत होता. पण मी हट्टाने किनाऱ्यावरच राहिले. बोट निघाली. बोट जरा हळू हळूच जात होती. अंजलीने माझ्याकडे बघून आनंदाने हात हलवला. समुद्रावर डॉल्फिन पाहायला मिळणार म्हणून अंजली खूष होती. माझा फोन सुरक्षित राहणार म्हणून मीही आनंदात होते. हळू हळू बोट दूर जाऊ लागली. बोट आता समुद्रात खूप दूर गेली होती. मला नीट दिसतही नव्हती. डोळ्यात पाणी उभे राहिले. डोळ्यातल्या पाण्यामुळे बोट दिसत नाही की, ती दूर गेल्यामुळे दिसेनाशी झाली. माझ्या मनात अचानक चलबिचल सुरु झाली.  मनात नाना शंका कुशंका. अथर्वला चांगले पोहता येते आणि नितीनला स्वतःचा जीव वाचवण्यापुरते तरी पोहता येते. पण अंजलीचे काय? लाईफ जॅकेटचा काय भरवसा? देव न करो, पण काही भलते सलते झालें तर? नितीन दोन्ही मुलांकडे पाहू कसा शकणार? अंजली घाबरली तर तो तिला घेऊन परतू शकेल? हो, मला पोहता येत नाही हेही मी त्याक्षणी विसरले. माझ्या अंजलीसोबत मी असायलाच हवे होते. माझे डोळे भरून आले. मी सोबत जायला पाहिजे होते असें माझें मन मला वारंवार सांगू लागलें. 
वाटले की, फेकून द्यावा हा फोन आणि ही पर्स! अंजली समुद्रात जात असतांना मी तिच्याबरोबर असायला पाहिजे ना... पण या आयफोनपुढे मला काही दिसले नव्हतें. पोटच्या पोरीपेक्षा का आयफोन महत्त्वाचा? त्याक्षणी मी कोणत्या मोहात सापडले? आईपण विसरले?

माझ्या डोळ्यातून पाण्याच्या धारा  वाहायला लागल्या. बाकीच्या बोटी परतू लागल्या, पण आमची बोट काही दिसेना. मला काही सुचेना. माझे डोळे फक्त ती बोट शोधात होते. काही मिनिटांच्या जीवघेण्या प्रतीक्षेनंतर एकदाची ती बोट दिसली. एकदाची अंजली दिसली. तिचा छोटासा हात हलताना दिसला. बोट किनाऱ्याला लागली. पाणी तुडवतच अंजली आणि अथर्व धावत आले. मला बिलगले, ‘‘मम्मा, तू कां  नाही ग आलीस, किती मज्जा आली तिकडे आत!’’ 
मी फक्त दोघांना उराशी कवटाळून रडत होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com