चहाचा पाऊस

मेदिनी काळेले
सोमवार, 29 जानेवारी 2018

एखादी सहल विशिष्ट कारणाने लक्षात राहते. केनियात फिरत होतो, त्या भागात त्या दिवसात रोज संध्याकाळी चार वाजता पाऊस पडायचा. आमची ती चहाची वेळ असते, म्हणून आम्ही त्याला नावच ठेवले - चहाचा पाऊस.
- मेदिनी काळेले

एखादी सहल विशिष्ट कारणाने लक्षात राहते. केनियात फिरत होतो, त्या भागात त्या दिवसात रोज संध्याकाळी चार वाजता पाऊस पडायचा. आमची ती चहाची वेळ असते, म्हणून आम्ही त्याला नावच ठेवले - चहाचा पाऊस.

केनियाला जायचे होते मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात; पण तयारी एप्रिलपासून सुरू झाली. त्या देशात प्रवेश करायला ‘यलो फीवर इंजेक्‍शन’ व ‘पोलियो डोस’ दोन्ही घेतल्याचे सर्टिफिकेट लागते. निघायच्या आदल्या रात्री अतिउत्साहामुळे झोपच आली नाही. सायंकाळी पाच वाजता विमानात बसलो. सहा तासांनी केनियाची राजधानी नैरोबीला पोचलो. तिथली वेळ अडीच तास मागे आहे. म्हणून आमच्या घड्याळात रात्रीचे अकरा वाजले होते; पण तेथील स्थानिक वेळ रात्री साडेआठची होती. टॅक्‍सीने ‘रॉयल ऑर्किड अझुरे’ हॉटेलवर पोचलो. थकलेलो होतो. जेऊन झोपलो ते दुसऱ्या दिवशी सकाळीच जाग आली. दुसऱ्या दिवसापासून टोनी नावाचा ड्रायव्हर व त्याची लॅंडक्रुजर जीप सतत आठ दिवस सोबत होती. 

स्वीट वॉटर, लेक नेवासा, नुकूरू लेक प्रत्येक ठिकाणी सफारी केली. शेवटचे चार दिवस ‘मारा सेरेना’ या हॉटेलवर होतो. सगळीच हॉटेल्स प्रशस्त, डेकोरेटिव्ह. सर्व सुविधांनी युक्त अशा खोल्या होत्या. मच्छरदाणीची पद्धत अनोखी. छतापासून पडल्यासारखी. कुठेही डोक्‍यावर न येणारी. आम्ही प्रत्येक सफारीचा खूप आनंद घेतला. ‘झेड फॉर झेब्रा’ लहानपणी शिकलो; पण प्रत्यक्ष झेब्रा आता पाहिला. खूप ऐटबाज जनावर. पांढराशुभ्र रंग व त्यावर काळेभोर पट्टे. शेपटी तर पाचपेडी वेणीसारखी खूप सुंदर दिसते. हरणे, जिराफ, हत्ती, बिल्डबिस्ट सर्वांचे मोठे कळप पाहिले. हिप्पोपोटेमस व एकशिंगी ऱ्हाईनोही बघितले. केनियात घनदाट जंगल नाही. मोठे ग्रास पेंडस आहेत. त्यामुळे सिंह, सिहीण, त्यांचे छावे असा संपूर्ण परिवार पाहायला मिळाला. इथे वाघ अजिबात नाहीत. 

इथला मोसम खूपच छान. तापमान २२-२३ अंश सेल्सिअस. रोज संध्याकाळी चार वाजता पाऊस पडायचा. कसे कळत असेल त्याला घड्याळ? रोज नेमकी वेळ पाळायची, त्या पावसाची सवयही मजेशीर वाटली. त्याला ‘फोर ओ‘क्‍लॉक रेन’ म्हणतात. ही साधारण आपली दुपारची चहाची वेळ. म्हणून आम्ही याला ‘चहाचा पाऊस’ म्हणू लागलो. रोज इंद्रधनुष्य पाहायला मिळायचे. निसर्गाच्या सानिध्यात काय सुख आहे, हे अनुभवल्यावरच कळते. 

मारा नदीच्या त्या पारहून या पार यायला हजारोच्या संख्येने विल्डबिस्ट उड्या मारतात. ते दृश्‍य फारच अप्रतिम दिसते. मला आमच्या उज्जैनचा सिंहस्थ मेळा आठवला. तिथेही हजारोंच्या संख्येने नागा साधू क्षिप्रा नदीत उड्या मारतात. इथेही तेवढीच गर्दी, तोच जल्लोष, तोच उत्साह. तिथे उज्जैनला माणसांचा कुंभमेळा असतो, इथे केनियात जनावरांचा कुंभ अनुभवला. इथली आणखी एक गोष्ट खूप आवडली. भूगोल शिकताना भूमध्य रेषा, कर्क व मकर रेषा वाचले होते. नकाशावरचे अक्षांश-रेखांश प्रत्यक्ष पृथ्वीवर कुठे रेखलेले असतात. सगळेच आभासी. इथे मात्र भूमध्य रेषा प्रत्यक्ष पाहिली. कारण, जिथून ती जाते, तिथे ती आखलेली होती. ‘झिरो लॅटिट्यूड’ लिहिलेले होते. एक माणूस गमतीशीर प्रयोग पण दाखवत होता.

एक भोक असलेल्या भांड्यातून पाण्याची धार पाडत होता व ती जलधार भूमध्य रेषेवर अगदी सरळ पडते, तर तिच्या दक्षिण व उत्तर गोलार्धात गेल्यावर ती धार घड्याळाच्या दिशेने किंवा घड्याळाच्या काट्यांच्या उलट्या दिशेने  फिरते, हा तो प्रयोग. उज्जैनला ‘ऑब्झरवेटरी’ आहे; पण तिथे कुठे आखणी केलेली नाही. ही कमतरता जाणवली. केनिया व टांझानिया यांच्या सीमारेषेवर गेलो. तिथे ‘चेक पोस्ट’ बांधलेला होता. खूप मजेदार वाटले. 
केनिया देश १९६४ मध्ये स्वतंत्र झाला. ब्रिटिशांचेच राज्य होते. त्यामुळे सर्वदूर इंग्रजीतच पाट्या होत्या. म्हणून कुठे काय आहे हे समजायला सोपे वाटले. तिथले लोक खूप उंच व सडपातळ होते. खूप मेहनती होते. सायकल व मोटारबाइक ही दोन वाहने जास्त दिसली. महिला कुणीही दुचाकी चालवताना दिसल्या नाहीत. सगळेच लोक लालभडक रंगाचे वस्त्र पांघरतात. त्याची गाठ खांद्यावर बांधलेली असते. इथली स्थानिक भाषा स्वाहिली आहे. आम्ही पण दोन-तीन शब्द टोनीकडून शिकलो. वेलकम, स्वागताला ‘करीबू’ व चला चला म्हणजे ‘सावा सावा’. इथे पण भारतांसारखे ‘लेफ्टहॅन्ड ड्राइव्ह’च आहे. मात्र, इथले लोक वाहतुकीचे नियम तंतोतंत पाळतात, हे विशेष.

आमचा चौवीस जणांचा ग्रुप होता. त्यात एक धाडसी महिला होती मंजिरी. तिने चक्क लॅंडक्रुझ चालवली. तसेच शुभदा व प्रसाद देशपांडे यांच्याशी पण ओळख झाली. त्यांची लेक म्हणे पायलट आहे. ती एअरबस ए ३०२० चालवते. ऐकून मी थक्कच झाले. खूप अभिमान वाटला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktpeeth article medini kalele