पावसाने झोडपले!

मिलिंद पानसरे
सोमवार, 1 जुलै 2019

हवाहवासा पाऊस कधी कधी घालमोड्यासारखा वागू लागतो. आपल्यासमोर अडथळे उभे करतो. असा अनुभव विसरला जात नाही.

हवाहवासा पाऊस कधी कधी घालमोड्यासारखा वागू लागतो. आपल्यासमोर अडथळे उभे करतो. असा अनुभव विसरला जात नाही.

सुमारे पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट. माझे आई-बाबा एका खासगी प्रवासी कंपनीने काश्‍मीरला जाणार होते. कितीही कमी करायचे म्हटले तरी दोघांच्या चार बॅगा झाल्याच. रेलगाडी संध्याकाळची होती. पावसाची रिपरिप सुरू झाली. पुण्याच्या वाहतूक कोंडीचा अनुभव असतोच आपल्याला. त्यात पाऊस म्हटल्यावर वाहतुकीचे तीनतेराच वाजलेले असतात. हे लक्षात घेऊन थोडे वेळेआधीच निघालो. मोटारीमध्ये सर्व सामान भरून आई-बाबांना घेऊन बालगंधर्व रंगमंदिरापर्यंत आलो. इथपर्यंत सर्व व्यवस्थित होते. तेवढ्यात पाऊस वाढला. इतका, की चार फुटांपलीकडचेही दिसेना. गाड्यांचा वेग एकदम मंदावला. वाहतुकीची कोंडी सुरू झाली. आता रेलगाडी सुटायला वीस मिनिटांचा अवधी उरला होता. आमची धाकधूक वाढू लागली. मोटार मुंगीच्या पावलांनी पुढे सरकू लागली. देवाचे नाव घेतले आणि चक्क मुसंडीच मारली. मोटार कशीही पळवत कसेबसे स्टेशन गाठले एकदाचे! हुश्‍श!
पण गाडीतून उतरल्यावर दुसरी अडचण उभी राहिली. डिकीचे कुलूप काही उघडेना. हाताशी वेळ अजिबात नसल्याने किल्लीवाला कोठे शोधणार?

तेवढ्यात माझी धडपड पाहणाऱ्याने जवळच पडलेल्या धोंड्याने डिकीचे कुलूप फोडले. आता रेलगाडी फलाटावरून सुटण्याची वेळ झाली होती. आई-बाबा कसेबसे गाडीत पोचले. सर्व सामान मी अक्षरशः डब्यात भिरकावून दिले. ग्वाल्हेरच्या बहिणीला तिकडे स्टेशनवर भेटण्याबद्दल कळवण्याचे गडबडीत राहून गेले होते, ते बाबांना आठवले. तेवढ्यात बाबांनी एका कागदावर हा स्मरणाचा मजकूर लिहिला आणि चालत्या गाडीच्या दारात उभे राहून माझ्या दिशेला फेकला. मी तो ‘वेल कॉट’ करून बाबांना ‘ओके’चा अंगठा दाखवला. पुन्हा हुश्‍श! पण एवढ्यावर संपले नाही!  गाडीने एकटाच परतत असताना घराजवळच चिखलात गाडी रुतली आणि ती त्यातून निघता निघेना! अखेरीस गाडी तेथेच सोडली आणि मुसळधार पावसात भिजून चिंब होऊन घरी पोचलो. दुसऱ्या दिवशी मित्राच्या मदतीने गाडी कशीबशी त्या चिखलातून बाहेर काढली आणि डिकीच्या फोडलेल्या कुलपाची दुरुस्ती करण्यासाठी निघालो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Muktpeeth Article Milind Pansare