स्वयंपाकाचा सराव

नचिकेत नगरकर
सोमवार, 7 मे 2018

रविवारी मी घरी निवांतच होतो. घरातील किरकोळ कामे केली. वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. आई तिच्या लाडक्‍या लेकीकडे गेली होती. घरात मी आणि माझी बायको. तब्येत जरा ठीक नव्हती.

तासाभराने उठवा, असे सांगून ती औषध घेऊन झोपली होती. झोपू देत जरा. पण जेवणाचे काय? मनात विचार आला, आपणच स्वयंपाक केला तर! थोडेसे धाडस करून किचनमध्ये गेलो. आई नेहमी पीठ मळत असते, त्या भांड्यात पीठ घेतले. तीन माणसांसाठी पीठ घ्यायचे किती? पीठ घेतले जरा अंदाजाने. आता त्यात पाणी किती घालायचे? ते पण अंदाजानेच घातले.

रविवारी मी घरी निवांतच होतो. घरातील किरकोळ कामे केली. वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. आई तिच्या लाडक्‍या लेकीकडे गेली होती. घरात मी आणि माझी बायको. तब्येत जरा ठीक नव्हती.

तासाभराने उठवा, असे सांगून ती औषध घेऊन झोपली होती. झोपू देत जरा. पण जेवणाचे काय? मनात विचार आला, आपणच स्वयंपाक केला तर! थोडेसे धाडस करून किचनमध्ये गेलो. आई नेहमी पीठ मळत असते, त्या भांड्यात पीठ घेतले. तीन माणसांसाठी पीठ घ्यायचे किती? पीठ घेतले जरा अंदाजाने. आता त्यात पाणी किती घालायचे? ते पण अंदाजानेच घातले.

पाणी जास्त झाले म्हणून त्यात परत पीठ घातले. मग घट्ट झाले म्हणून परत पाणी. तोपर्यंत चेहऱ्यावर पिठाचा थर. हाताला कणीक चिकटत होती. मग आठवले, आई हातावर तेल घेते. मग तेल घेऊन आधी हाताला लागलेली कणीक दूर केली. अथक प्रयत्नांनंतर कणीक मळून झाली. कणीक घट्ट झाली की सैल, हा काय प्रकार असतो तो त्या दिवशी मला समजला. 

बायको अजून उठली नव्हती. तिला उठवायचे धाडस माझ्यात नव्हते. मी म्हटले, बायकोला उठवायचा धोका पत्करण्यापेक्षा स्वयंपाक केलेला बरा. मी परत ‘एकला चलो रे’ म्हणत किचनमध्ये परतलो. 

आता गॅसवर आई जसा तव्याच्या थोड्या वर अंतरावर हात धरते, तसा मी हात धरला; पण हात थोडासा खाली राहिला आणि माझ्या धसमुसळेपणाने हात कधी तव्यावर आला कळलेच नाही. घेतला हात भाजून. तेव्हा बहिणांबाईंचे वाक्‍य आठवले, ‘आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर’. लगेचच गॅस बंद करून मी फ्रिजकडे धाव घेतली. पटकन बर्फ काढला व हातात धरून बसलो. नंतर औषध लावले व लगेचच पोळ्या करायला सुरवात केली. तवा तापला होता. 

आता वेळ होती ती प्रत्येक देशाचे नकाशे तयार करण्याची. शाळेत असताना कधीच नकाशा भरला नव्हता, त्यामुळे कुठल्या देशाचा कुठला नकाशा हे माहीत नव्हते. पण आज जेव्हा मी एखाद्या देशाचा नकाशा स्वतःहून तयार करत होतो, याचा मला खूप अभिमान वाटत होता. (तेवढ्यापुरताच).

पोटातील कावळ्यांची जागा आता भीषण आगीने धारण केली होती. त्यामुळे थोड्याशा चुका होत होत्या. सर्व देशांचे नकाशे तयार झाल्यावर मी जरा शांत बसलो. कणीक अजून बऱ्यापैकी शिल्लक होती. आमच्या तिघांपुरत्याच पोळ्या तयार केल्या. 

आता वेळ आली ती भाजी करण्याची. ही माझ्या दृष्टीने खूपच अवघड परीक्षा होती. बराच वेळ विचार केल्यावर मी टोमॅटोची भाजी करण्यावर शिक्कामोर्तब केले. फ्रिज उघडला व तीन टोमॅटो काढले. 

माणशी एक टोमॅटो या हिशेबाने मी तीन टोमॅटो घेतले. मस्त बारीक कापले. ही भाजी करण्याचा माझा स्वतःचा एक स्वार्थ होता. ही भाजी फारशी आमच्या घरात कोणाला आवडत नाही, त्यामुळे मी निर्धास्त होतो. कशीही झाली तरी जास्त प्रमाणात मलाच खायची होती. 

टोमॅटो बारीक कापून झाल्यावर आता जरा कढई तापायला ठेवून फोडणीची तयारी करत होतो. तेल तापल्यावर सर्व गोष्टी माझ्या प्रमाणानुसार टाकल्या. बहुतेक सर्व प्रमाणे चुकीचीच असणार. कारण भाजीला चव लागत नव्हती. परत सर्व प्रमाणाचे वेगवेगळे मिश्रण केल्यावर परत एक टोमॅटो टाकण्याची वेळ आली आणि मग परत तेल. भाजी जरा सुक्की झाली होती. दहा वेळा चव घेतल्यावर भाजी जरा खाण्यालायक झाली असा मला खोटा विश्‍वास वाटत होता. आता मला खूप बरे वाटत होते. कारण मी कोणाच्याही मदतीविना स्वयंपाक केला होता. 

तोच मोबाईल फोन वाजला आणि बायकोला जाग आली. तिने घड्याळात पाहिले तर दीड वाजला होता. ‘बापरे, अजून स्वयंपाक बाकी आहे,’ म्हणत ती ताडकन उठली. किचनमध्ये आली. आता तिला धक्का बसला तो पाहण्यासारखा होता. माझा अवतार भयानकच होता आणि किचनची अवस्थापण काही ठीक नव्हती. मी म्हटले, ‘‘अगं सगळा स्वयंपाक तयार आहे. तू जेवायला बस. मी आपली दोघांची ताटं वाढून आणतो.’’ ‘‘अहो मला उठवायचे तरी. मी केला असता स्वयंपाक. तुम्ही कशाला केलात उगाच.’’ ‘‘अगं रोजच तुम्ही करता, आज मी केला तर कुठं बिघडलं?’’ मग आम्ही दोघेही जेवायला बसलो. बायको म्हणाली, ‘‘जेवण छान झालं आहे; पण फक्त पाच, सहा माणसे अजून आरामात जेवतील.’’ मग आम्हा दोघांनाही हसू आवरेना.

Web Title: muktpeeth article nachiket nagarkar