मनाचिया विटेवरी...

प्रमिला गरुड
सोमवार, 23 जुलै 2018

आनंदाचे परमनिधान असलेला विठुसावळा भेदाभेद अमंगळ मानत त्याच्या भक्तांना प्रेमाने उराशी धरतो. 

एकदाचा योग आला ‘काळ्या’ला भेटण्याचा. पुरातन मंदिरातील ते काळेभोर पाषाण पाहताना देहभान हरपले. खरेतर मंदिरात पाऊल ठेवले, गार वाऱ्याची झुळूक अबीर, गंध, उदबत्तीचा सुगंध घेऊन आली. साक्षात विठूरायाच्या अस्तित्वाचा भास झाला. माउलीला डोळे भरून पाहतच राहिले. संतांनी ज्या विठुचरणांवर मस्तक टेकले, त्या चरणांवर मी मस्तक ठेवले. बाहेर आले. चांदीने मढवलेल्या गरुडखांबाला मिठी मारली. आनंदाश्रू वाहू लागले.

भारलेल्या अंतःकरणाने मंदिराला प्रदक्षिणा घातली. चंद्रभागेच्या तीरी गेले. पाण्यातल्या पुंडलिकाला भेटले. भक्त भक्तासी भेटला ऐसे झाले. 

आता मनी विचार आला, विठ्ठलावर रखूमाई नेमकी का रुसली असेल? शेजारच्या मंदिरात जाऊन का बसली असेल? तिला या विठ्ठलभक्तांचा खरंच हेवा वाटला असेल? की हे सारे लाडक्‍या विठ्ठलाला पळवून नेतील, अशी भीती वाटली असेल? विठूरायांनी तिची समजूत काढली असेल, ‘अगं रख्माई, ऐक माझे जरा. तू तर या विश्‍वाची माउली आहेस. त्या भक्तांचा हेवा नको करूस. माझ्या प्रेमाखेरीज त्यांना काहीही नको. त्यांना तू समजून घे. हा संसाररूपी भवसागर पार करण्यासाठी ते मज चरणासी येतात. चल उठ बरं लवकर, ये माझ्याजवळ येऊन उभी राहा. त्यांची माउली हो. त्यांच्या अंगावरून मायेचा हात फिरू दे तुझा.’ भागेच्या पाण्यात उभी राहून मंदिराकडे पाहताना मला आपले हे वाटले.

वडील भक्तिभावाने गायचे - ‘पंढरपूर परगणा, विठ्ठलाच्या दरवाजाला मोत्यांचा पाळणा.’ त्या मोत्याने मढवलेल्या पाळण्यात बसलेला छोटासा बाळकृष्ण आपल्या मनात हसू लागतो अन्‌ आपल्या स्त्रीहृदयी मातृत्वाला मायेचा पाझर फुटतो. माझ्या मनात त्याच्यासाठी श्रद्धा आहे, विश्‍वास आहे, प्रेम आहे, भक्ती आहे. आणखी त्याला तरी काय दुसरे लागते! एवढे दिले की तो सावळा आपलाच आहे. 

माझ्या मनाच्या विटेवर कधीपासून उभा आहे कटीवर हात घेऊन माझा विठुसावळा!

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Muktpeeth Article Prmila Garud