सहल जपानची

Rama-Paranjape
Rama-Paranjape

बाई, तिकडे थंडी किती असेल? बाई, शाळेचा गणवेश घ्यायचा ना? किती दिवस घालायचा? बाई, आम्ही मोबाईल घेतला तर चालेल ना? म्हणजे आम्हाला फोटो काढता येतील. हॅन्डबॅगेत काय काय ठेवायचे? पुण्याहून किती वाजता निघायचे? त्या दिवशीचा डबा आणायचा का? असे अनेक प्रश्‍न विचारून आम्ही मुलीनी बाईंना भंडावून सोडले. आणि तो दिवस उजाडला. त्या दिवशी सकाळी साडेसात वाजता आम्ही सर्व मुली शाळेत पोचलो. सर्व छत्तीस मुली जमल्यावर ‘पंचकन्या भारतमातेच्या, आम्ही सुकन्या अहिल्यादेवीच्या...’ अशी खणखणीत घोषणा देऊनच आम्ही जपानला निघालो होतो.

निमित्त होते ‘असोसिएशन ऑफ फ्रेंड्‌स ऑफ जपान’ आणि ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ यांच्या वतीने जपानला शैक्षणिक सहल आयोजित केली होती. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या अहिल्यादेवी मुलींच्या शाळेतून आम्ही छत्तीस मुली या शैक्षणिक सहलीनिमित्त जपानला भेट देण्यासाठी निघालो होतो. आठ दिवसांची सहल होती. आम्ही गाडीने मुंबईतील जपानी वकिलातीमध्ये पोचलो. तेथील कॉन्सुलेट जनरल नाडा यांनी आम्हाला खास आमंत्रित केले होते. त्यांची भेट घेऊन इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोचलो. विमानतळावरचे तपासणीचे सोपस्कार झाल्यावर रात्री पावणेआठच्या विमानाने निघालो, ते दुसऱ्या दिवशी (जपानी वेळेनुसार) दुपारी सव्वा वाजता जपानच्या कान्साई विमानतळावर उतरलो. जपान पूर्वेकडे आहे आणि भारतीय वेळेआधी साडेचार तास तिथला दिवस सुरू होतो. त्यादिवशी आम्ही ओकायामामधील हॉटेलवर जाऊन आराम केला. हॉटेलमध्ये सर्व मुलींना तेथील पारंपरिक वेष, किमोनो घालायला दिला होता. खूपच गंमत वाटली किमोनोत. 

‘ओकायामा गाकुगैकान हायस्कूल’पासून आमची शैक्षणिक सहल सुरू झाली. शाळेच्या बाहेर काही विद्यार्थी तिरंगा घेऊन आमच्या स्वागतासाठी उभे होते. शाळेतील फलकांवर ‘आमच्या शाळेत भारत देशातील मुलींचे स्वागत आहे’ असे मराठीमध्ये लिहून आमचे जोरदार स्वागत केले. शाळेचे विद्यार्थी आणि आम्ही एकमेकांच्या मातृभाषेमध्ये एकमेकांची नावे लिहून दाखवली. शाळेमध्ये आम्हाला ‘जपानी टी सेरेमनी’चे प्रात्यक्षिक दाखवले गेले.

शाळेच्या बॅंडपथकाने वादन केले. आम्हालाही ड्रमवादन शिकवले. नंतर काही विद्यार्थ्यांनी कोतो हे पारंपरिक वाद्यवादन खूप सुंदर सादर केले.

जपानमध्ये शाळा, आजूबाजूचा परिसर येथील स्वच्छता शाळेचे विद्यार्थी स्वतः करतात. आम्हीदेखील त्यांना मदत केली. शाळेमध्ये ठिकठिकाणी इकेबाना पुष्परचना केलेली दिसत होती. त्या शाळेतील विद्यार्थ्यांना आम्ही ‘पणती सुशोभन’, ‘पेपर क्विलिंग’ अशा वस्तू शिकवल्या. सर्व मुलींनी मिळून मराठमोळे ‘लेझिम’ सादर केले. त्यांना ‘लेझिम’ खूप आवडले. दोन्ही शाळांच्या मुख्याध्यापकांनी संवाद साधला.तीनशे वर्षे जुनी असलेल्या जगप्रसिद्ध ‘ओकायामा गार्डन’ला भेट दिली. अतिशय स्वच्छ आणि सुंदर बाग. क्‍योटो येथील ‘गोल्डन टेंपल’ हे बुद्ध मंदिर बघितले. तसेच, तेथील चहाच्या मळ्यातूनही भटकलो. येथील समुद्र किनाऱ्यावरून लिफ्टने ‘खाली’ जाऊन लेणी बघितली. तानाबे हायस्कूलमध्येही आमचे जोरदार स्वागत झाले. तानाबे शाळेमध्ये ज्यूदो, केंदो, सॉकर, टेबल टेनिस इत्यादी खेळांचा सराव बघता आला. शाळेतील विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या. भारतातील ताजमहल, गेट वे ऑफ इंडिया, हिमालय, तसेच गणपती उत्सव, आपले पदार्थ वडापाव, पाणीपुरी, पुरणपोळी याची माहिती दिली. 

जपानमधील लोकांची माणुसकी, आपलेपणा, त्यांचे आदरातिथ्य यामुळे आम्ही भारावून गेलो. नम्रता, शिष्टाचार आणि विजीगीषू वृत्ती या जपानी माणसांच्या गुणांवर आम्ही कायम फिदा आहोत. दुसऱ्या महायुद्धात बेचीराख झाल्यानंतर जपानने फिनिक्‍स पक्ष्याप्रमाणे घेतलेली भरारी सर्व जगाला अचंबित करते. ज्याप्रमाणे एकमेकांत धागे गुंफून एखादे वस्त्र विणले जाते, त्याप्रमाणे आपल्या दोन्ही देशांमध्ये साहित्य, संस्कृती, व्यवहार यांची गुंफण झाली आहे. भारताच्या २०१४मधील प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाचे प्रमुथ अतिथी, जपानचे पंतप्रधान शिंजो आबे होते. हेच आपल्या देशातील मैत्रीचे प्रतीक आहे. अशी ही मैत्रीपूर्ण शैक्षणिक सहल पूर्ण झाली. परतताना किती झटकन प्रवास संपला! अहिल्यादेवी शाळेच्या मुख्याध्यापिका सुलभा शिंदे, पर्यवेक्षिका स्मिता करंदीकर, सहल समन्वयक स्वाती भागवत आणि इतर शिक्षिका यांनी आमची खूप काळजी घेतली. वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केले, मजाही केली. आठ दिवसांत ‘बाई’ या शब्दांतील ‘बा’ ची जागा ‘आ’ने घेतली होती... इतकंच! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com