esakal | द्विधा मन:स्थिती
sakal

बोलून बातमी शोधा

Rasik-Mutha

नसबंदीच्या शस्त्रक्रियेनंतरही ती महिला गर्भवती राहिली; पण या सर्व प्रकारामध्ये मी योग्य केले की अयोग्य केले? एक कुटुंब, निष्पाप मुलाकरिता खोटे बोलावे लागले.

द्विधा मन:स्थिती

sakal_logo
By
डॉ. रसिक मुथा

नसबंदीच्या शस्त्रक्रियेनंतरही ती महिला गर्भवती राहिली; पण या सर्व प्रकारामध्ये मी योग्य केले की अयोग्य केले? एक कुटुंब, निष्पाप मुलाकरिता खोटे बोलावे लागले.

एमबीबीएस झाल्यानंतर १९७१ मध्ये माझी नेमणूक एका प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंबनियोजन अधिकारी म्हणून झाली. त्या काळी आम्ही पुरुष नसबंदीच्या शस्त्रक्रिया गावोगावी जाऊन करत असू. एकदा मी एका पुरुषाची नसबंदीची शस्त्रक्रिया केली. त्यानंतर सहा-सात महिन्यांनंतर एका गुरुवारी बाजाराच्या दिवशी एक बाई माझ्या केबिनमध्ये आली व अद्वातद्वा बोलू लागली. माझ्याकडील सर्व रेकॉर्ड तपासून त्या पुरुषाची नसबंदी केल्याची खात्री केली. त्याच्या पत्नीला, त्या बाईला गर्भ राहिला होता. माझ्याकडून शक्‍यतो चूक होणार नव्हती. तरीपण मला खूप मानसिक दडपण आलं. काही वेळा नसबंदी फसू शकते. मी त्या बाईला विनंती केली की, तिने नवऱ्याला घेऊन आरोग्य केंद्रात यावे. त्याप्रमाणे ती बाई नवऱ्याला घेऊन आल्यानंतर त्या पुरुषाची आवश्‍यक तपासणी केली, तर माझ्याकडून झालेली शस्त्रक्रिया यशस्वी झाली होती. काय घडले असेल हे माझ्या लक्षात आले.

त्यानंतर मी त्या बाईला माझ्या केबिनमध्ये बोलावले व तिला दरडावून खरी परिस्थिती विचारली. त्या बाईला पोलिसांना बोलावतो म्हणून दमही दिला. लगेच ती बाई पाया पडून लागली. गयावया करू लागली. आता माझ्यापुढे पेच निर्माण झाला. जर खरे सांगावे तर तिचा संसार मोडेल. तिचा नवरा कदाचित त्या बाईला जिवंतही ठेवणार नाही. शिवाय तिला आधी असलेल्या दोन मुलांचाही प्रश्‍न निर्माण होईल. माझ्यापुढे यक्ष प्रश्‍न उभा राहिला. खोटे बोलावे तर माझे वैद्यकीय ज्ञान चुकीचे ठरत होते. शेवटी सारासार विचार करून माझी प्रतिष्ठा, ज्ञान बाजूला ठेवून शस्त्रक्रियेमध्ये दोष राहिला असे त्या नवऱ्याला पटवले. त्या बाईचे बाळंतपण माझ्याच देखरेखीखाली केंद्रावर केले व त्यानंतर तिच्यावर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करून तिला घरी पाठवली. या सर्व प्रकारामध्ये मी योग्य केले की अयोग्य केले? एक कुटुंब, निष्पाप मुलांकरिता खोटे बोलावे लागले, त्यामुळे खंतावलो नाही.

loading image