शस्त्र ही तर दुर्बलांची गरज!

संजय नहार
गुरुवार, 5 एप्रिल 2018

शस्त्र नव्हे, मनातला विश्‍वास महत्त्वाचा. गुंड मनाने दुबळे असतात म्हणून शस्त्र बाळगतात. नम्रपणा व आत्मविश्‍वास हीच सज्जनांची ताकद असते.

शस्त्र नव्हे, मनातला विश्‍वास महत्त्वाचा. गुंड मनाने दुबळे असतात म्हणून शस्त्र बाळगतात. नम्रपणा व आत्मविश्‍वास हीच सज्जनांची ताकद असते.

पंधरा दिवसांपूर्वीची गोष्ट. सकाळी दहा वाजले असावेत. नगरचे पोलिस निरीक्षक अभय परमार यांचा ‘सरहद’च्या क्रमांकावर दूरध्वनी आला. मी फोन घेतल्यावर ते म्हणाले, ‘‘कुठे जाऊ नका. काल रात्री नगरच्या एका कुरिअर ऑफिसमध्ये पार्सलचा स्फोट झाला असून, तो क्रूड बाँबस्फोट असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या स्फोटामध्ये तीन जण जखमी आहेत. ज्या पार्सलचा स्फोट झाला ते कुरिअर तुमच्या नावाने होते. तुम्हाला ठार करण्यासाठी ते पाठविले होते. दहशतवादविरोधी पथक आणि सर्व सुरक्षा यंत्रणा येथे आल्या आहेत. आपण लगेचच कुठे याची चर्चा करायला नको.’’

मला या बातमीचे गांभीर्य लक्षात आले. फोन येण्याच्या काही वेळ आधी शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या हुसैनीवाला या पंजाबमधील स्मारकावर जाण्यासाठी तिकीट काढले होते, त्यामुळे मला पहिली आठवण आली शहीद भगतसिंगांच्या ‘दम निकले इस देश के खातीर बस इतना अरमान है!’ या वाक्‍याची आणि क्षणभर मनात विचार आला, की मृत्यू तर अटळच आहे, कधी तरी तो येणारच, मग घाबरायचे कशाला? उलट या परिस्थितीला संयमाने तोंड द्यायला हवे. एवढ्यात एका पोलिस अधिकाऱ्याचा फोन आला. त्या पार्सलमध्ये नगमा शेख या नावाने एक पत्र असल्याचे त्यांनी सांगितले. मी काश्‍मिरी विद्यार्थ्यांना जी मदत करतो तिची परतफेड म्हणून ही भेट असल्याचे म्हटले होते. प्रत्यक्षात हे नाव, त्यावरील पत्ता, दूरध्वनी क्रमांक सगळेच खोटे होते. तपास यंत्रणांची दिशाभूल करण्यासाठी बहुधा असे केले असावे. माझा पत्ता मात्र बरोबर होता. याला काश्‍मिरीविरुद्ध उर्वरित भारतीय असे स्वरूप देण्याचा प्रयत्न आहे की काय, अशी शंका मनात आली. एव्हाना सगळ्या महत्त्वाच्या तपास यंत्रणांकडून संपर्क सुरू झाला आणि इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांमध्ये बातमीही सुरू झाली. मला एका जवळच्या मित्राने स्वरक्षणासाठी म्हणून अधिकृत परवानाधारक रिव्हाल्व्हर देऊ केले तर, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संरक्षणासाठी सशस्त्र सुरक्षा रक्षकाची नेमणूक केली. मात्र, आपल्या सुरक्षिततेसाठी शस्त्र ठेवले म्हणजे धोका टळतो असे नाही, केवळ मानसिक धीर लाभतो इतकेच.

मला माझ्या महाविद्यालयीन काळातील एका घटनेची आठवण आली. मी सर परशुराम महाविद्यालयात शास्त्र शाखेत शिकत होतो. महाविद्यालयीन निवडणुका सुरू होत्या. ‘वंदे मातरम्‌’ संघटनेनेही महाविद्यालयीन निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. त्याच काळात आमच्यावर हल्ला होऊ शकतो, अशी एका विद्यार्थ्याने माहिती दिली. माझ्याकडे शास्त्र शाखेच्या विद्यार्थ्यांकडे प्रयोगासाठी असते ते डिसेक्‍शन बॉक्‍स होते. त्यातील वस्तरा (बेडूक किंवा तत्सम प्राण्यांचे डिसेक्‍शन करण्यासाठी वापरायचा) काढून मी स्वसंरक्षणासाठी माझ्या पॅंटच्या मागील खिशात ठेवला. कुणी हल्ला केलाच तर स्वतःचे संरक्षण करता यावे, असा त्यामागील हेतू होता. तो तसा खिशात असताना आम्ही काही मित्र माझे एक सहकारी विकास हांडे यांच्या घरी गेलो होतो. विकासचे वडील, शंकरराव हांडे गुरुजी मंगळवार पेठेतील काशीगीर वस्ताद तालमीचे वस्ताद आणि कुस्तीचे राष्ट्रीय पंच होते. त्यांचा शिष्य बबन डावरे ऑलिंपिकपर्यंत पोचलेला. अण्णा म्हणजे पहिलवानांचे वस्ताद; पण अगदी संत माणूस. त्यांनी माझ्या खिशात तो वस्तरा पाहिला आणि म्हणाले, ‘‘कशासाठी बाळगला आहेस?’’ मी म्हणालो, ‘‘अण्णा, जिवाला धोका आहे. विरोधी गटाचे लोक हल्ला करण्याची शक्‍यता आहे.

संरक्षणासाठी हे शस्त्र जवळ बाळगले आहे.’’ त्यावर अण्णा शांतपणे उत्तरले, ‘‘तुमची (ते लहानांनाही आदराने ‘तुम्ही’ म्हणायचे) भावना मी समजू शकतो; मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, नम्रपणा हे सज्जनांचे सामर्थ्य असते, तर शस्त्र बाळगणे ही दुर्बलांची गरज. अर्थात, हे सैनिकांना आणि पोलिसांना लागू होत नाही. शक्ती मनगटात पाहिजे. तुम्ही चांगला व्यायाम करा, शरीर कमवा. आपल्या अस्तित्वाची दुर्जनांना भीती वाटली पाहिजे आणि सज्जनांना आपल्या कर्तृत्वाचा आदर. नम्रपणा आणि आत्मविश्‍वास हे आपले सर्वांत मोठे शस्त्र आहे. ते शत्रूच्या मनातील शत्रुत्वाची भावना नष्ट करू शकते. ते नेहमी जवळ ठेवा.’’ त्यानंतर आजतागायत कधी शस्त्र बाळगले नाही. 

अण्णांचे मध्यंतरी अल्पशा आजाराने निधन झाले. पण नगरच्या घटनेनंतर मला अण्णांच्या शब्दांची तीव्रतेने आठवण झाली. मला माध्यमांनी जेव्हा माझ्यावरील हल्ल्याच्या प्रयत्नाबद्दल प्रतिक्रिया विचारली, तेव्हा मी म्हटले, ‘‘माझे कोणाशीच व्यक्तिगत शत्रुत्व अथवा स्पर्धा नाही. ज्याने हे कृत्य केले, त्याने सारासार विचार करून हे केले असते तर... अर्थात, विचार संपतो तेव्हाच बाँब, पिस्तुले आणि शस्त्रांचा आधार लागतो. हे दुर्बलांचेच लक्षण आहे. शक्तिवानाचे नाही. क्रांतिकारकांची, भगतसिंगांची बॉम्बस्फोटाची कृती समाजाचा आवाज मोठा करण्यासाठी होती, तर नगरचा बॉम्बस्फोट अथवा या प्रकारची कृत्ये समाजावर दहशत बसविण्यासाठी किंवा आवाज दाबण्यासाठी असतात. त्याला नम्रपणे, संयमाने आणि तरीही निर्भीडपणे तोंड द्यायला हवे.’’ या माझ्या शब्दांना खरे तर अण्णांच्या शब्दांनी दिशा दिली होती. याची जाणीव या घटनेने प्रकर्षाने झाली. 

यातून एकच धडा आहे, संवाद साधा, संवादाने अनेक प्रश्न सुटतात. जे सुटत नाहीत, तेथे निर्भीडपणे परिस्थितीचा सामना करा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktpeeth article sanjay nahar