क्षण कसोटीचा

डॉ. शुभदा जठार
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

बाळाचा व आईचाही जीव धोक्‍यात होता. पण तिच्या घरचे नैसर्गिक बाळंतपणासाठीच हटून बसले होते.

कळा सुरू झाल्यामुळे ती प्रसूतीसाठी रुग्णालयात आली होती. गेल्या दोन महिन्यांत एकदाही तपासायला आली नव्हती. ही तिची दुसरी प्रसूती होती.

बाळाचा व आईचाही जीव धोक्‍यात होता. पण तिच्या घरचे नैसर्गिक बाळंतपणासाठीच हटून बसले होते.

कळा सुरू झाल्यामुळे ती प्रसूतीसाठी रुग्णालयात आली होती. गेल्या दोन महिन्यांत एकदाही तपासायला आली नव्हती. ही तिची दुसरी प्रसूती होती.

पहिली प्रसूती नैसर्गिक होती. तपासताना आढळले की बाळ पायाळू आहे. बाळाचे वजनही खूप जास्त आहे. या खेपेस नैसर्गिक बाळंतपणाचा प्रयत्न बाळाच्या जिवाला धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे सिझेरिअन करणे आवश्‍यक आहे, असे माझे निदान होते. नातेवाइकांना सर्व परिस्थिती समजावून सांगितली आणि सिझेरिअनसाठी संमतीपत्रावर सही करण्यास सांगितले. परंतु, नातेवाइकांनी सिझेरिअनसाठी संमती देण्यास स्पष्ट नकार दिला. ‘प्रसूती होताना बाळाचा मृत्यू झाला तरी चालेल. परंतु, आमची सिझेरिअन करण्यास संमती नाही. त्यातून आईच्याही जिवाला धोका उत्पन्न होऊ शकतो. याचीही कल्पना आम्हाला डॉक्‍टरांनी दिली आहे,’ असे निवेदन गर्भवती स्त्रीच्या नवऱ्याने दिले. मी हतबद्ध झाले. 

सही घेतली म्हणजे माझी डॉक्‍टर म्हणून जबाबदारी संपत नव्हती. तिच्या कळा वाढून बाळाचे पाय दिसायला लागले होते. तिला कुठे सरकारी दवाखान्यात पाठविणेही शक्‍य नव्हते. पावणेचार किलो वजनाच्या सुदृढ बाळाचा, प्रसूतीमध्ये होणारा मृत्यू बघण्याची हिंमत आई-वडिलांमध्ये असली तरी माझ्यात डॉक्‍टर म्हणून नव्हती. माझी भीती खरी ठरली. बाळ खांद्यापर्यंत बाहेर आले. डोके खूप मोठे असल्यामुळे खूप जोरात कळा येत असूनही अडकले. शिकलेल्या सर्व पद्धती आणि तंत्रे अयशस्वी ठरली. माझ्या हातात बाळाच्या छातीचा भाग होता. त्यातील हृदयाचे ठोके मंदावू लागले.

मी बाळाची आशा जवळजवळ सोडली. मग शेवटचा उपाय म्हणजे फोर्सेस लावणे. हा पायाळू केसमध्ये अवघड प्रकार असतो. बाळाच्या डोक्‍याला व मेंदूला इजा होऊ शकते. पण परमेश्‍वर कृपेने तो यशस्वी झाला. बाळाचे डोके बाहेर आले. तोपर्यंत हृदय जवळजवळ बंद पडले होते. मी भूलतज्ज्ञ, बाळांचे डॉक्‍टर अशी टीम तयारच ठेवली होती. त्यांनी शर्थीने प्रयत्न करून बाळाचे हृदय व श्‍वासोच्छ्वास सुरू केला. दहा मिनिटांनी बाळ रडले आणि मला आनंदाने रडू फुटले. 

या सर्व जीवघेण्या नाट्यमय प्रसंगातून बाहेर पडल्यावर मी जरा चिडूनच नातेवाइकांशी बोलायला बाहेर आले. नवऱ्याची पहिली प्रतिक्रिया ‘काय डॉक्‍टर, झाली ना नॉर्मल?’ मी अत्यंत शांतपणे घडलेल्या गोष्टी सांगितल्यावरही कोणाच्याही चेहऱ्यावरची रेषाही हलली नाही. त्या दिवशी अडकलेले डोके फोर्सेप्सने काढले नसते, तर ते अत्यंत क्रूर शस्त्रक्रियेने काढावे लागले असते. बाळाचा आणि आईचाही जीव धोक्‍यात होता. मेंदूचा रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे बाळ मतिमंद झाले असते, तर त्याला जबाबदार कोण असणार होते?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Muktpeeth Article Shubhada Jathar