esakal | आठवरेषा
sakal

बोलून बातमी शोधा

Shubhada-Sapre

ज्येष्ठत्वात आठवणींशी निगडित असा एखादा छोटा प्रसंग, संवाद घडला तरी मन अस्वस्थ होते. आठवणींचा मोकळा प्रकाश आणणे ज्याला जमले अथवा समजले तर तो साधुसंत बनू शकतो.

आठवरेषा

sakal_logo
By
शुभदा सप्रे

ज्येष्ठत्वात आठवणींशी निगडित असा एखादा छोटा प्रसंग, संवाद घडला तरी मन अस्वस्थ होते. आठवणींचा मोकळा प्रकाश आणणे ज्याला जमले अथवा समजले तर तो साधुसंत बनू शकतो.

लहानपणी वह्यांवर एकतरी सुविचार लिहिण्याची पद्धत होती. सुविचारही बालिशच असायचे. ‘आकाशाचा कागद केला, समुद्राची शाई केली तरी महती कमी पडेल...’ वगैरे. आता डोक्‍यात येते की आपल्या मनःपटलाचा कागद केला तर त्यावर कितीतरी आठवणींच्या रेषा आखल्या गेल्या आहेत. काही अधोरेखित आहेत, काही अधोरेखितच नाहीत. तर काही लाल रेषांनी अधोरेखित आहेत. 

बालपणीच्या आठवरेषा पुसट नाहीत, तर बऱ्याच गडद आहेत. अत्यंत सुखद आठवणी. एक होळीची आठवण. पाचवीत होते. माझ्या मैत्रिणीच्या वाड्यात होळी केली जायची. होळीच्या दिवशी संध्याकाळी ती घरी आली. मी घरी नव्हते. त्यामुळे आईजवळ निरोप ठेवला, ‘‘मृणालिनीला आमच्याकडे बोंबा मारायला पाठवा.’’ ‘बोंबा मारणे’ या शब्दाचा अर्थ त्या काळात नीट समजत नव्हता. खेळताना रागावणाऱ्याच्या नावाने, होळीला लाकूड न देणाऱ्याच्या नावाने, खेळात सतत चिडणाऱ्यांच्या नावाने बोंबा मारल्या जायच्या. नंतर कॉलेजची ओळख त्याबरोबर त्या वयातील गंमती. पण चिंचा, आवळ्यांच्या गंमतीची सर त्याला नाही. संसार, नोकरी या रहाटगाडग्यात नंतर सर्वांना फिरावेच लागते. सामान्यपणे त्या वेळेला जीवनात कोणत्या ना कोणत्या रूपाने टक्केटोणपे खावेच लागलेले असतात. त्यातील बऱ्याचशा कटु आठवणी लाल रंगाने अधोरेखित होतात. कितीही विसरू म्हटले तरी विसरता येत नाहीत. ज्येष्ठत्वाकडे गेल्यावर त्या फारच त्रास देतात. मानसोपचार तज्ज्ञ, अध्यात्मिक गुरू वर्तमानकाळात जगण्यास सांगतात. पण खरेच असे जगता येईल का? त्या आठवणींशी निगडीत असा एखादा छोटा प्रसंग, संवाद घडला तरी मनात अस्वस्थपणा सुरू होतो. जर माणसाला देवाने स्मरणशक्ती फारच थोडी दिली असती तर किती बरे झाले असते. पशू-पक्ष्यांप्रमाणे आपणही स्वैर आनंदात फिरलो असतो. कसलीही चिंता, काळजी नसती. 

ही स्मरणशक्ती विद्यार्थिदशा किंवा नोकरीच्या ठिकाणी देणगी असते. पण रोजच्या जीवनात मात्र ही त्रास देते. कटु आठवणींचे अंधाराचे जाळे कधी संपतच नाही व मोकळा प्रकाश येत नाही. हा मोकळा प्रकाश आणणे ज्याला जमले अथवा समजले तर तो साधुसंत बनू शकतो. तो आठवरेषा पुसट करतो. पण हे अत्यंत कठीण, अशक्‍य आहे.

loading image