संस्कारांची शिदोरी!

सुरेख निरगुडकर
Monday, 13 January 2020

तांबट आळीत गेले होते. पूर्वी माझे सासरही तिथेच होते. त्या वेळच्या आठवणी जाग्या झाल्या. तांबट आळीतून जाताना भांड्यांचा ठोक-ठोक आवाज कानावर पडत असे. आता सर्व काम बंद पडले आहे. एकदम शांतता होती. मला खूप चुकल्या-चुकल्यासारखे झाले. आईकडे तांब्यापितळेची खूप भांडी होती. स्वयंपाकघरातील मोठ्या मांडणीवर चाळीस एक तरी पितळी डबे चकचकीत घासून मांडलेले असत.

आईकडून मुलीला संस्काराची शिदोरी मिळते. ती तिला आयुष्यभर पुरतेच; पण तीही आपल्या नातींपर्यंत ती पोचवते. 

तांबट आळीत गेले होते. पूर्वी माझे सासरही तिथेच होते. त्या वेळच्या आठवणी जाग्या झाल्या. तांबट आळीतून जाताना भांड्यांचा ठोक-ठोक आवाज कानावर पडत असे. आता सर्व काम बंद पडले आहे. एकदम शांतता होती. मला खूप चुकल्या-चुकल्यासारखे झाले. आईकडे तांब्यापितळेची खूप भांडी होती. स्वयंपाकघरातील मोठ्या मांडणीवर चाळीस एक तरी पितळी डबे चकचकीत घासून मांडलेले असत. दर महिन्याला डबे रिकामे करून चिंचेने स्वच्छ घासायचे व वाळवायचे. कोरड्या टॉवेलने पुसून मगच महिन्याचे सामान भरायचे. पाण्यासाठी मोठे पितळी ठोक्‍याचे तपेले व तांबुसलाल तांब्याचा हंडा होता. आंघोळीचे पाणी तापवण्याचा मोठा तांब्याचा बंब व घंगाळे होते.

सर्व एकदम चकाचक. दर चार-पाच दिवसांनी आम्ही ही सर्व भांडी घासत असू. दरवर्षी एप्रिलमध्ये परीक्षा संपली, की कुरडयांचा कार्यक्रम ठरलेला. बटाट्याचा किस, साबुदाण्याच्या पापड्या, सांडगे, पापड अशी वाळवणे पण आम्ही केली आहेत.

होळीनंतर आई वर्षाचे तिखट, हळद, मसाला, शिकेकाई करीत असे. वर्षाचे गहू, तांदूळ, डाळी यांची बेगमी करणे, भाजण्या, लोणची, चकली, लाडू, चटण्या करणे या गोष्टी इतक्‍या सरावाच्या झाल्या, की मला आजपर्यंत कुठले पीठ, तिखट, मसाला, लोणचे विकत आणल्याचे आठवत नाही. आईने काटकसरीने व नेटकेपणाने घर चालविले व नकळत आम्ही चौघी बहिणी ते सर्व शिकत गेलो. 

आमचे घर दोन खोल्यांचे. आम्ही भावंडे पाच. त्यातच आतेभाऊही शिकायला आलेला. पाहुण्यांचा सतत राबता. दोन्हीकडचे नातेवाईक जपले पाहिजेत, ही आई-वडिलांची शिकवण. आम्हाला घर लहान आहे असे कधीच वाटले नाही. घासातला घास द्यावा हे आईने शिकवले. मोजके कपडे व गरजेच्या वस्तू असायच्या. खाण्यापिण्याची मात्र रेलचेल असायची. भरपूर अभ्यास करून गुण मिळवले पाहिजे हे नक्की. घरात कडक शिस्त. अपशब्द उच्चारायचा नाही. वाईट वागायचे नाही, हे संस्कार होते. छोट्या-छोट्या गोष्टींचे कौतुक व अप्रुप होते. आईकडून मिळालेली संस्काराची शिदोरी आता मी माझ्या दोन नातींपर्यंत पोचवते आहे. चांगल्या-वाईटाचे त्यांना भान राहावे, यासाठी प्रयत्नशील असते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktpeeth article surekh nirgudkar