छोट्यांच्या मोठ्या गोष्टी

विजयालक्ष्मी गायकैवारी
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

सर्वसामान्य माणसेही काही वेळा खूप वेगळेपणाने व्यक्त होतात. ते त्यांचे व्यक्त होणे खूप शिकवून जाणारे असते. 

सर्वसामान्य माणसेही काही वेळा खूप वेगळेपणाने व्यक्त होतात. ते त्यांचे व्यक्त होणे खूप शिकवून जाणारे असते. 

मी व माझा मुलगा गावातून डेक्कन जिमखान्यावरून मॉडर्न हायस्कूलकडे जात होतो. त्या वेळी डेक्कनवर चित्रपटगृहापाशी खूपच गर्दी दिसली होती. मुलाला म्हणाले, ‘‘बघ, सिनेमासाठी किती गर्दी.’ त्याच वेळी रिक्षावाले म्हणाले, ‘‘उतरा खाली.’’ मला कळेनाच, त्यांना एकाएकी काय झाले ते. मी विचारले, ‘‘पण का?’’ ते म्हणाले, ‘‘तुम्हाला माहीत नाही महाकवींचे निर्वाण झाले ते? गदिमांची महानिर्वाण यात्रा आहे ही. मला त्यांच्याबरोबर चार पावले का होईना जायचेय. पाहिजे तर तुम्ही रिक्षाचे भाडे देऊ नका.’’

डोळ्यांतील पाणी पुसून ते त्या यात्रेत मिसळलेही. माझे सद्‌भाग्य, निदान त्यांच्यामुळे मी व माझा मुलगा त्या यात्रेत चार पावले चाललो. 

दुसरा अनुभवही असाच. मी पीएमटीमधून जात होते. बस प्रयाग रुग्णालयाकडून डेक्कनकडे जात होती. कंडक्‍टर दारात उभा राहून रुग्णालयाकडे पाहून नमस्कार करीत होता. नंतर त्याने आकाशाकडे पाहून हात जोडले. मी त्याच्याकडे पाहत होते. तो पुटपुटला, ‘‘आपले ‘पुलं’ आहेत ना इथे.’’ नकळत दोघांच्याही डोळ्यांत पाणी आले. 

ग. दि. माडगूळकर व पु. ल. देशपांडे या दोघांच्याही जन्मशताब्दीनिमित्त आठवले. 

गोष्ट माझ्या नात्यातच घडलेली. अत्यंत गरीब कुटुंब. कर्ता पुरुष गमावलेला. मुलांच्या संगोपनाची जबाबदारी अत्यंत ओढग्रस्ततेने पेलणारी आई. तिला जमेल तशी मदत करणारी तिची मुले. सगळ्यात लहान मुलाला नोकरी लागली. सुटीदिवशी त्याने गणवेश धुऊन अंगणात वाळत टाकला होता. दुपारी बाहेर गलका झाला म्हणून त्याने बाहेर पाहिले. एका भुरट्या चोराला त्याचा गणवेश काठीने काढून घेताना शेजारच्या लोकांनी पकडले होते. त्याने त्या चोराला घरात नेले. म्हणाला, ‘‘सणाचा दिवस आहे.

जेवणाची वेळ आहे. शांतपणे जेवण कर.’’ जेवण झाल्यावर त्याला समजुतीने म्हणाला, ‘‘अरे, आज माझा गणवेश पळवला असतास तर मला केवढ्यात पडले असते. वेळ प्रत्येकावर असते. माझ्यावरही होती. पण त्यासाठी चोरी हा मार्ग नव्हे.’’ त्यानंतर त्या तरुणाने भुरट्याला आपली एक जुनी शर्ट-पॅंट दिली व पाठवले. तो तरुण म्हणजे माझे मामेदीर चंद्रशेखर गंधे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Muktpeeth Article Vijayalaxmi Gaikaiwari