काय बाई सांगू?

- शुभदा जोशी
बुधवार, 12 ऑक्टोबर 2016

आयुष्यात अनेक वेळा अनेक प्रसंगाना सामोरे जावे लागते. विविध प्रसंगांना मनुष्य तोंड देत असतो. घडून जाते काही नकळत. आपण विचार करीत राहतो, इतका मूर्खपणा आपण कसा केला? 

आयुष्यात अनेक वेळा अनेक प्रसंगाना सामोरे जावे लागते. विविध प्रसंगांना मनुष्य तोंड देत असतो. घडून जाते काही नकळत. आपण विचार करीत राहतो, इतका मूर्खपणा आपण कसा केला? 

नागपूरला नात्यातले लग्न होते. रजा मिळाली तर जायचे ठरविले होते. ‘महाराष्ट्र एक्‍स्प्रेस’चे आरक्षण करून ठेवले होते. रेल्वेचे आरक्षण हाताशी असावे. काही कारणाने शक्‍य झाले नाही तर रद्द करता येते. सातत्याने गाड्यांना गर्दी ही असतेच. मला तीन दिवसांची रजा मिळाली. हुश्‍श झाले. आपण आता निर्धास्तपणे जाऊ शकू असे म्हणत, मन शांत झाले. प्रवासाची तयारी केली. एकटीच जाणार होते. प्रवास लांबचा होता. रात्री झोप लागली नाहीच. सकाळ झाल्यावर मस्त प्रकाश पसरला. आता वाचन सुरू झाले. मागे पडणारी स्टेशने पाहायची, वाचायचे, बाजूच्या प्रवाशांशी बोलायचे, असे चालले होते. यात धाडकन नागपूर आले. नागपूर स्टेशनवर सामान घेऊन उतरले. रिक्षा करून घर गाठले, तर घरी सर्व जण कार्यालयात जाण्याच्याच तयारीत होते. मीपण थोडीशी फ्रेश झाले. साडी बदलून सगळ्यांबरोबरच कार्यालयात गेले. 

श्रीमंत पूजन चालू झाले. कोणी कोणी लांबचे नातेवाईक भेटले. आठवणी, विनोद, गप्पा टप्पा करून जेवण केले. जरा जास्तच झाले जेवण असे म्हणत होते. सगळे गप्पांत दंग असतानाच एकदम दिवे गेले. ‘अरे बापरे!’ ‘सर्व जण जागच्या जागी बसा’, असे फर्मान आले. पुढच्या भागात विजेची सोय झाली. पण इतरत्र अंधारच होता. बाहेरच्या बाजूला एक टेबल होते. त्या टेबलावर पानाचे तबक होते. विड्याची पाने, बडीशेप, सुपारी असे काही काही ठेवले होते. अंधारच होता तिथे. 

‘अग, सुपारी आहे का ग?’ माझा प्रश्‍न होता. बहीण व भाची म्हणाली, ‘‘त्या तबकात असेल बघ.’’ अंधारात काहीच दिसत नव्हते. बडीशेप हाताच्या स्पर्शाने मला कळली; परंतु सुपारी काही हाताला कळेना. बडीशेपच्या बाजूलाच काही तरी होते. बडीशेप नाही, म्हणजे ती सुपारीच असेल. ती सुपारी थोडी हातात घेऊन तोंडात टाकली. चव थोडी वेगळी वाटली. म्हणून पुन्हा लक्ष देऊन चघळून पाहिली. कसले काय? पोटात कसे तरी व्हायला लागले. तोंडातही काहीतरी वेगळेच वाटू लागले. मला काही कळलेच नाही. क्षणार्धात भडाभड उलट्या झाल्या. नवीन साडीवर सर्व उलटलेले अन्न पडले. मी काय खाल्ले, ते काहीच कळत नव्हते. इतकी का मला सुपारी लागली? माझे मला कळेना, उलटी काही थांबेना. अंधार असल्याने काही दिसत नव्हते. कोणी म्हणे, थोडे पाणी पी. कोणी म्हणे, आले खा. कोणी म्हणे, थोडी साखर खा. कोणी म्हणे, लवंग देऊ का? मला तर कसलेही त्राण अंगात उरले नव्हते. काय करावे, कसे करावे काही सुचत नव्हते. उलट्या थोड्याशा थांबल्या असाव्यात;  परंतु आतडी पिळवटून निघत होती. 

खाल्लेले सर्व पोटातून निघून गेले होते. आता भूक लागली होती; पण खाल्ले तर पुन्हा उलट्या होतील या भीतीने खाल्ले नाही. माझी नवीन साडी, मला धरायला आलेल्या जावेने माझी साडी कशी तरी टॉवेलने पुसली. पाण्याने धुतल्यासारखे केले. काय करायचे ते करा, मी निपचित पडून राहिले. आणखी काही करूही शकत नव्हते.   मनात विचारांचे थैमान सुरू होते. सर्व जण भोवती कोंडाळे करून होते. कोणी तोंड पुसत होते. आतून रडू फुटत होते. आता आवरेनाच. कण्हत कण्हत रडायलाच लागले. आपल्यामुळे इतरांच्या आनंदावर, उत्साहावर पाणी पडते आहे, या भावनेने शरमल्यासारखे झाले. शेवटी मी भाचीला हळू आवाजात सांगितले, ‘‘मला कोणीतरी घरी सोडा.’’ 

मांडवात लग्नाची उद्याची तयारी सुरू होती. माणसांची लगबग सुरू होती. कोणी तरी मला घरी आणले. काही कळत नव्हते. एकदाची कशी तरी घरी आले. आता पुन्हा पडते की काय, असे वाटू लागले. पातळ सुती साडी नेसले. उन्हाळा होता. उकडत होते. थोडे पाणी मागून घेतले. झोप लागेना. भूक लागली होती. अंगात त्राण नव्हता. क्षणभर वाटले, आपले इथे काही बरेवाईट झाले तर? नाना विचार डोक्‍यात घुमू लागले. घरात लग्नाची गडबड आणि मुद्दाम या समारंभाला आलेली मी पाहुणी... 

दुसरा दिवस उजाडला. रात्र तळमळून काढली. ‘‘तुम्हा सर्वांना किती त्रास झाला. आज कार्य आहे. किती पळापळ करावी लागली माझ्यासाठी.’’ सर्व जण माझ्याभोवती गोळा झाले. ‘‘अगं, तू खाल्लेस तरी काय काल?’’ मला प्रश्‍न विचारणे सुरू झाले. ‘‘अगं, मला काय माहीत काय खाल्ले ते. रात्री अंधार होता.’’ ‘‘अगं, तुला दिसले नाही. तू सुपारी घेतलीस असे तुला वाटले, पण तो ‘तंबाखू’ होता.’’ काय? तंबाखू? सुपारीऐवजी तंबाखू? फजीत वडाच झाला माझा. एकच कल्ला. मावशीने सुपारी समजून तंबाखू खाल्ला. ‘‘अगं, आमच्याकडे पानदानात तंबाखू नसतो. असलाच तर बंद पुडीमध्ये असतो. इथे असा पानदानात खुलाच होता. अंधारात दिसला नाही. कडकही होता,’’ असे होते केव्हा केव्हा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktpeeth story by shubhada joshi