चला, बिया पेरूया! (मुक्तपीठ)

Sujata Walawalkar
मंगळवार, 21 जून 2016

बिया पेरण्याचं काम माझ्यासारखी अनेक माणसं करीत असतीलच. पण गावोगावी असलेल्या सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन शास्त्रशुद्ध पद्धतीनं योग्य जागी बिया पेरण्याची आणि त्यांचं संवर्धन करण्याची मोहीम हाती घेतली, तर मोठं काम होईल.

बिया पेरण्याचं काम माझ्यासारखी अनेक माणसं करीत असतीलच. पण गावोगावी असलेल्या सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन शास्त्रशुद्ध पद्धतीनं योग्य जागी बिया पेरण्याची आणि त्यांचं संवर्धन करण्याची मोहीम हाती घेतली, तर मोठं काम होईल.

पर्यावरण बिघडल्यामुळे आपण हवामान बदलाचे चटके सातत्याने सोसत आहोत. गारपीट असो, सतत तीन वर्षे पडलेला दुष्काळ असो, दोन वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशात आलेला महाभयानक पूर असो, किंवा ठिकठिकाणची वादळं असोत; आपण दररोज नवनवीन संकटांचा सामना करीत आहोत. पूर्वी ज्याला दंडकारण्य म्हणत, तो आपला महाराष्ट्र एके काळी घनदाट जंगलांनी व्यापलेला होता. वृक्षराजी म्हणजे प्राणवायूचा भक्कम स्रोत. हे आपल्या पूर्वजांना माहीत होतं, म्हणूनच त्यांनी वनराई, देवराई, गायरान या नावांनी जमिनी राखीव ठेवल्या होत्या.

देश स्वतंत्र झाल्यानंतर शहरांत माणसांची गर्दी वाढू लागली. गावं ओस पडू लागली. घरांची गरज वाढली. बांधकाम क्षेत्राला महत्त्व आलं. दिसेल त्या जमिनीवर बांधकाम होऊ लागलं. भयंकर वृक्षतोड झाली. शहरं बकाल होत गेली. स्वाइन फ्लू, चिकुन गुनिया या रोगांची नावंसुद्धा पूर्वी आपल्याला माहिती नव्हती.. महाराष्ट्रात सध्या फक्त अकरा टक्के वनजमीन शिल्लक आहे, अशी बातमी मी 1980 मध्ये वाचली. काय करता येईल, याचा विचार करू लागले. काम फार मोठं आणि अवघड आहे, हे लक्षात आलं. आपण खारीचा वाटा तरी उचलूया, असं ठरवून घरात येणाऱ्या फळांच्या वापरानंतर त्यांच्या बिया साठवू लागले. चिकू, सीताफळ, जांभूळ, संत्री, मोसंबी यांच्या बिया, आंब्याच्या कोयी स्वच्छ करून तीन-चार दिवस उन्हात खडखडीत वाळवून बियांसाठीच्या पिशव्यांत ठेवू लागले. लिंबू कापताना सालाच्या बाजूनं कापून, म्हणजे सुरी गोल फिरवून हातानं त्याचे दोन भाग करते, अलगद बिया काढते. सवयीनं सहज जमतं. या सर्व बिया प्रवासाला जाताना बरोबर घेते.

माझं माहेर मुंबईचं. पूर्वी वरचेवर मुंबईला जाणं व्हायचं. ट्रेननं जाताना घाट आला, की पिशवीतल्या बिया दरीमध्ये विखरून टाकत असे. प्रवास चारचाकीने होई, तेव्हा गाडी चालवणाऱ्याला घाटात गाडी डाव्या बाजूने घ्यायला लावायची. घाटाच्या डाव्या बाजूला दरी असेल तर बिया विखरून टाकणं सोयीचं होतं. या उपक्रमांतर्गत मी खंबाटकी, पसरणी, आंबोली, बोरघाट, कात्रज, आंबेनळी इत्यादी अनेक घाटांत हजारो बिया विखुरल्या. बिया जमवण्याविषयीचा एक किस्सा सांगते. माझी नात तीन-चार वर्षांची असताना मला म्हणाली, "आजी, हात पुढे कर.‘ तिनं सीताफळाची उष्टी बी माझ्या हातावर ठेवली. माझा वैश्‍विक वारसा अशा प्रकारे पुढे टिकविला जाणार, या सकारात्मक विचारानं मी सुखावले!

तुम्ही म्हणाल, बिया दरीतच का टाकायच्या? माझं उत्तर असं, की रस्त्याच्या बाजूला टाकल्या, तर त्या जमिनीचा मालक त्यांची रोपटी उपटून टाकेल. बिया दरीत टाकल्या, त्या रुजल्या; तर त्या झाडांना येणारी फुलं, फळं परिसरातील पक्षी-प्राण्यांची भूक भागवतील. त्यांच्यावर जगणाऱ्या कोल्हे, जंगली कुत्री, बिबटे यांची भूक भागेल. नैसर्गिक अन्नसाखळी सुरक्षित राहील. मग कदाचित गावातल्या झाडावर वाघ दिसला, किंवा बिबट्यानं वासरू पळवलं, अशा बातम्या ऐकाव्या लागणार नाहीत. दरीत वृक्षसंवर्धन झालं, की जमिनीची धूप थांबेल. ओझोनचा थर विरळ व्हायचा थांबेल आणि आपण भयमुक्त जीवन जगू शकू.

महाराष्ट्र सरकारच्या वन विभागानं यंदा सुमारे दोन कोटी वृक्षलागवडीसाठी शिस्तबद्ध प्रयत्न चालविले आहेत, ही चांगलीच बाब आहे. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड होण्याकरिता बिया रुजविण्याची मोठी मोहीम हाती घेणं आवश्‍यक आहे, असं मला वाटतं. माझ्यासारखी अनेक माणसं असे प्रयत्न करीत असतीलच. पण त्यांना व्यापक स्वरूप मिळण्यासाठी गावोगावी असलेल्या सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन शास्त्रशुद्ध पद्धतीनं योग्य जागी बिया पेरण्याची आणि त्यांचं संवर्धन करण्याची मोहीम हाती घेतली, तर मोठं काम होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktpeeth, Sujata Walawalkar