रंग माझा राखाडी

gray
gray

रंगांच्या संचामधे काळ्या आणि पांढऱ्या ‍या रंगांना कमालीचे महत्त्व असते. दोन्ही रंग हे स्वतःमधे परिपूर्ण असून त्यांचे एक वेगळे भावनिक आणि लाक्षणिक अस्तित्व आहे. या दोन्ही रंगांचा स्वभाव मात्र एकमेकांच्या अगदी उलट. पांढरा रंग हा शांतता, शुद्धता, सुरक्षितता, प्रकाश, सज्जनता अश्या विविध बाबींचा प्रतीक आहे. तर दुसरीकडे काळा रंग हा गूढ, रहस्य, संताप, कुरापत, अधिकार, भय, शक्ती असल्या विविध बाबींचा प्रतीक मानला जातो. या दोन्ही रंगातील आणि त्यांचा गुणधर्मातील तफावत ही अगदी उघड, स्पष्ट आणि प्रकर्षाने जाणवणारी आहे. त्यामुळे या दोन्ही रंगांच्या बाबतीत संभ्रमात पडणे हे अतिशय कठीण.

काळ्या आणि पांढऱ्या रंगांमध्ये असंख्य अश्या विविध राखाडी छटा येतात. या छटांमध्ये काळ्या आणि पांढऱ्या दोन्ही रंगांचे प्रमाण हे वेगवेगळे असते. एखाद्या छटेमध्ये पांढरा रंग वरचढ असतो तर दुसऱ्या छटेमध्ये काळा रंग हा वरचढ असतो. याच धर्तीवर मानवी स्वभाव आणि समाज पण विविध छटांनी रंगलेला असतो. कुठलीच व्यक्ती आणि त्या व्यक्तीचा स्वभाव हा एकाच बाबीने परिपूर्ण असेल असे होत नाही. स्वभावातील आणि आयुष्यातील विविध जटिल अनुभव या छटा घडण्यात कारणीभूत ठरतात व एकंदरच या छटा घडण्यात नेहमीच वेगवेगळी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, व्ययक्तिक अशी कारणे असतात.

आपल्यापैकी किती लोकं या सर्व बाबी लक्षात घेऊन समाजात वावरत असणार याचा विचार केला, तर ही संख्या अगदीच नगण्य दिसेल. आपल्याला अगदी लहानपणापासून हीच शिकवण दिली जाते की एखादी व्यक्ती ही एखाद्या क्षेत्रातील कामामुळे किंवा त्या क्षेत्रातील झालेल्या चुकीमुळे आयुष्यातील इतर क्षेत्रात पण तशीच असेल. याउलट एखाद्या व्यक्तिला एखाद्या क्षेत्रातील उत्तम कामगिरीमुळे प्रत्येक क्षेत्रात अक्षरश: डोक्यावर घेऊन नाचवतात व त्यांचे ज्ञान आणि काम हेच सर्वोच्च आहे असे मानले जाते.
माझे उदाहरण द्यायचे झाले तर मी सुरक्षित आहार, शेती आणि शेतीप्रश्नावर काम करतो. त्यामुळे साहजिकच या क्षेत्रातील लोकांना माझ्या कामामुळे मी खूप छान व्यक्ति आहे वगैरे वगैरे असा समज होऊ शकतो. पण शेतीबद्दल मला जितक्या प्रकर्षाने आणि आत्मियतेने काम करावेसे वाटते तितक्याच आत्मियतेने मी बाकी क्षेत्रात पण काम करेल असे नाही. शेती क्षेत्रातील कामामुळे माझ्या वैयक्तिक जीवनात मी खूप मानवी नीती आणि मूल्यांचा विचार करत असेल, इतर लोकांविषयी सहानुभूती दर्शवत असेल असे ही ग्राह्य धरले जाऊ शकत नाही. माझा स्वभाव हा भ्रष्ट, हुकुमशाही, दुष्ट, कुचकामी पण असूच शकतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने एखाद्या क्षेत्रात केलेलं छान काम हे त्या व्यक्तीचे प्रामाणिक असण्याचे आणि एकंदर वागणूक मानवी असण्याचे प्रमाण होत नाही. मानवी स्वभाव हा काळ्या-पांढऱ्या रंगाप्रमाणे कधीच परिपूर्ण आणि उघड नसतो, त्याला विविध छटा असतातच.

एका उत्तम कामामुळे कुणाला तरी देव म्हणून प्रस्थापित करणे, त्यांच्या इतर बाबींना कानाडोळा करणे, त्यांना प्रश्न विचारणाऱ्यांना हिणवणे आणि खलनायक घोषित करणे ही आंधळी वर्गवारी पण समाजाच्या हिताची नसते. त्यामुळे कुठलीच व्यक्ति ही परिपूर्ण नसून राखाडी रंगाप्रमाणे त्या व्यक्तिची वागणूक ही वेळेनुसार आणि सोयीनुसार बदलत असते. हे लक्षात ठेऊन चिकित्सक वृत्तीने समाजाला आणि समाजातील प्रश्नांना बघितल्या गेले तरच स्वतः ला व समाजाला प्रस्थापित भोंदू, फकीर, नायक आणि तत्सम लोकांपासून सुरक्षित ठेवल्या जाऊ शकते.


संपादन - स्वाती हुद्दार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com