देवदूतच ते!

नजरुद्दीन शेख
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

दोन दिवस खूपच चिंतेत गेले. रुग्णाला असलेला धोका टळला आहे, असे डॉक्‍टरांनी सांगितले अन्‌ आनंदाश्रू वाहू लागले.

दोन दिवस खूपच चिंतेत गेले. रुग्णाला असलेला धोका टळला आहे, असे डॉक्‍टरांनी सांगितले अन्‌ आनंदाश्रू वाहू लागले.

आम्ही कोंढव्याला राहतो. ईदसाठी दुचाकीवरून पंढरपूरजवळच्या करकंबला निघालो होतो. वाटेतच जस्मीनच्या पोटात दुखायला सुरवात झाली. ऍसिडिटीचा त्रास असेल म्हणून दुर्लक्ष केले. परंतु, गाव जवळ येत गेले तसतसा त्रास वाढतच गेला. संध्याकाळी सहा वाजता घरी पोहोचलो. ईदची सर्व तयारी झाली होती. दुसऱ्या दिवशी आम्ही सर्व जण मामांच्या शेतात जाणार होतो. त्यामुळे सोलापूरहून सासू व मेहुण्या आल्या होत्या. रात्री आठनंतर पत्नीचा त्रास आणखी वाढला. घरगुती उपचार झाले; परंतु पोटदुखीचा त्रास वाढतच गेला. रात्री चक्कर आली. डॉक्‍टर गावाच्या टोकाला राहायला होते. डॉ. श्रीपाद पेटकर यांच्याकडे रात्री दोन वाजता गेलो. त्यांना पाठदुखीचा त्रास होता. तरी ते तत्पर आले. त्यांनी तपासून उपचार सुरू केले; पण योग्य तो परिणाम दिसेना. डॉक्‍टर म्हणाले, ""शहरातील रुग्णालयात तातडीने हलवा.'' माझ्यासह कुटुंबातील सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. सोलापुरातील डॉ. सुजाता उंबरजे यांच्या रुग्णालयाला निरोप गेला. पण सोलापूरला जाण्यासाठी गाडी मिळेना. अखेर माझ्या भावाने एक गाडी मिळवली आणि आम्ही निघालो. रुग्णालय गाठेपर्यंत पत्नी बेशुद्ध झाली होती. तपासणी केल्यावर तातडीने तिला ऑपरेशन रूममध्ये नेण्यात आले. तातडीने दहा बाटल्या रक्त व दोन प्लाझ्मा पिशव्यांची व्यवस्था करावी लागणार होती. तीही व्यवस्था झाली. शस्त्रक्रियेआधी अर्जावर माझी व सासरे रफीक शेख यांची सही घेतली गेली. शस्त्रक्रिया झाली. डॉक्‍टर म्हणाल्या, ""अठ्ठेचाळीस तासांचा अवधी आहे. तोवर तुम्ही प्रार्थना करा. मी माझे सर्व प्रयत्न करीन.'' आम्ही अल्लाहकडे दया, याचना करू लागलो. डॉक्‍टरबाईनी गणपतीला साकडे घातले होते. दोन दिवसांनीही डॉक्‍टर खात्री देऊ शकत नव्हते. अजून बारा तास प्रतीक्षा करावी लागणार होती. आम्ही मिनिटे मोजत होतो. अनेक भल्या-बुऱ्या विचारांचा कल्लोळ सुरू होता मनात. अखेर डॉक्‍टरांनी सांगितले, की आता रुग्णाचा धोका टळला आहे आणि तोवर रोखलेल्या अश्रूंचा पूर आवरेना!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: najruddin shaikh write article in muktapeeth