मायबाप दोघांचे 

नलिनी रसाळ (रेखी)
गुरुवार, 19 जानेवारी 2017

शांतपणे विपदा झेलायची ताकद सर्वसामान्य माणसांत कुठून येते? अशा जगण्यातही हसतमुख राहण्याची किमया कशी साधतात ही माणसं? अशी माणसं जगात आहेत, म्हणून तर असे प्रश्‍न पडतात. 

सतत येता जाता, उठता बसता ॐ चा जप करणारे माझे वडील जळगावला रेल्वेत गुड्‌स क्‍लार्कची नोकरी करीत होते. अत्यंत साधी राहणी आणि भाजी- भाकरीचे जेवण. श्री शंकराचार्यांची स्तोत्रे गुणगुणत दर गुरुवारी सायंकाळी घरी व कार्यालयात श्रीदत्ताची आरती करीत. रोज दुपारी घरी जेवायला येताना कुणीतरी अतिथी बरोबर असे. आई दोघांनाही जेवायला वाढी. सुरवातीस नवीनच लग्न झाल्यावर ती अर्धपोटी राही. नंतर जास्त स्वयंपाक करायला लागली. आम्हा सात भावंडांचे नीटनेटके करून कथा- कीर्तनाला जाई. निजामपूरकर बुवांची कीर्तने रात्री नऊपासून दोन-अडीचपर्यंत चालत. वडील म्हणत दिवसभर दमणूक होते. एवढ्या लांब जायचे? पण ती जाई. तिच्यासोबत ऐकलेली कीर्तने अजूनही आठवतात, ती म्हणायची, ‘जन्माला येऊन एकदा तरी श्रीभागवत कथा ऐकावी’, संतसंगतीने ती बहुश्रुत झाली होती. श्रीदासबोधातील, कथेतील दाखले द्यायची, आमच्यासह आवळी भोजनाला, भरीत पार्टीला जायची. चाळीतील एका एकट्या बाईंना भाजी, सामान आणून द्यायची व लगेच हिशेब द्यायची. कुणाला फुलवाती करून दे, नवविवाहितेला पाखडता येत नसेल तर हाडसून दे, लोणचे घालून दे. आमचे परकर ती हातानेच शिवत असे. वर्षाची सगळी कामे घरीच करी. जवळपासच्या गावातील ओळखीची मुले मॅट्रिकच्या परीक्षेला येत. तीन-चार दिवस मुक्काम आमच्या घरीच असे. कुणी दवाखान्यात उपचारासाठी आले तर त्यांनाही मदतीचा हात असे.

वडिलांची नोकरीची दोन वर्षे राहिली असताना ते एका खटल्यात नाहक गोवले गेले. प्रारब्ध भोग. दोन वर्षे घरी होते. पगारपाणी नाही; पण त्याही परिस्थितीत ते अत्यंत स्थितप्रज्ञ. आम्ही भावंडे पोटभर जेवत असू. मात्र त्या दोन वर्षांत वडिलांची श्रीगुरुचरित्राची पारायणे चालूच होती. किती झाली प्रभूच जाणे. श्रीमंगलमूर्ती आणि श्रीदत्त उपासनेमुळे असेल, पण निकाल त्यांच्याच बाजूनेच लागला. त्यांची बाजू सत्याची होती. त्या दिवशी चतुर्थी व गुरुवार होता. घरी आल्यावर वडील चाळीतील आजींच्या पाया पडले व तुमच्या आशीर्वादाने सुटलो, म्हणाले, त्या दोन वर्षांत त्यांच्याबरोबरच आईनेही जननिंदा सोसली.

ऐंशीव्या वर्षीही सतत कार्यरत असलेले वडील शेवटचे आठ-दहा दिवस अंथरुणावर अर्धवट शुद्धीत होते. गुरुवारी रात्री आईला म्हणाले, ‘‘उद्या मी कुठल्याही परिस्थितीत घरी येणार.’’ निरोप येता क्षणी आम्ही मोठा भाऊ, आई व मी तातडीने दवाखान्यात गेलो. ‘‘किती वाजले?’’ त्यांनी विचारले. मी म्हटले, ‘पावणेदोन.’ ते म्हणाले, ‘तीन वाजता.’ आणि बरोबर तीन वाजता ‘जगदंबा जगदंबा, श्रीराम’ म्हणत ते पंचत्वात विलीन झाले.

लष्करी जवानाशी लग्नगाठ बांधून मी रसाळांच्या घरात प्रवेश केला. चार-पाच दिवसांनी येरवड्याला सासूबाईंना भेटायला गेलो. मुलाचे लग्न झाले हे त्यांना माहिती नव्हते. पण यांच्याकडे पाहून हसल्या नि म्हणाल्या, ‘‘कोण, सूनबाई का?’’ माझा हात हातात घेत म्हणाल्या, ‘‘बिलवर, पाटल्या नाही घातल्या का?’’ मी म्हणाले, ‘‘ताई, तुम्ही घरी या मग करू!’’ त्यांचा तो गाऊन, ते कापलेले केस बघून मला कसेसेच झाले; आणि मनात विचार आला, आपली आई असती तर आपल्या भावाने आईला घरी आणावे असे वाटले असते. मग त्यांनाही घरी आणणे आपले कर्तव्यच आहे. यांची लष्करी सेवा, आम्ही लांब कोलकता, दार्जिलिंगला. सेवानिवृत्तीनंतर मात्र त्यांना घरी आणले. तेव्हा तेथील डॉक्‍टर म्हणाले, ‘‘फार जुना पेशंट तुम्ही घरी नेताय.’’

सारखे त्यांच्याशी बोलून त्या खूपच सुधारल्या होत्या. बडबड आणि खाण्याचे वेड होते. प्रत्येक सणाला काय करायचे हे बरोबर सांगायच्या. जाण्याच्या आधी आठ महिने त्यांना अर्धांगवायू झाला. दवाखान्यातून घरी आणल्यावरही त्यांना उठता येत नव्हते. तेव्हा म्हणाल्या, ‘‘मोठाली दुखणी. तुम्हाला करावं लागतं. कपडे बाईला धुवायला द्या.’’ मी मनात म्हटले, किती शहाणपण आहे हे. कोण म्हणेल वेडे? औषध घालताना सांडले. मी म्हटले, ‘‘ताई, मान हलवू नका.’’ तर म्हणतात, ‘‘माझी मान नागिणीसारखी आहे.’’ आयुष्याची तीस वर्षे मनोरुग्णालयात काढली होती या बाईनी असे सांगितले तर पटणार नाही. त्यांना येरवड्याला पाठवले तेव्हा माझे पती दहा वर्षांचे होते. सासरे शाळामास्तर. त्यांनी नोकरी सांभाळून तीन मुलांचे शिक्षण केले. मुलीचे लग्न केले. फाळणीनंतर उर्दूतून मराठी शिकवणारे नगरमध्ये ते एकटेच. त्यांचे सिंधी विद्यार्थी, साहित्यिक लछमान हर्दवाणी यांनी ‘अनाहूत’ हे पुस्तक माझ्या सासऱ्याना अर्पण केले आहे. त्यांनीही वेळ सांगितली होती जाण्याची. आयुष्यभर वेळ साधणाऱ्या सासऱ्यांनी अखेरची वेळही पाळली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nalini rasal articles

टॅग्स