दुःख सारुनी दूर...

नंदकुमार येवले
बुधवार, 30 जानेवारी 2019

त्या कुटुंबाने वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून मदत केली वळवाच्या पाऊसराती.

त्या कुटुंबाने वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून मदत केली वळवाच्या पाऊसराती.

कोकणात तारकर्लीला गेलो होतो. सोबत मित्राची सहा महिन्यांची नातही. दिवसभर आमचा वेळ मजेत गेला. समुद्र किनाऱ्यावर मौजमस्ती केली. संध्याकाळी परत इचलकरंजीला निघालो. दिवसभराच्या प्रवासामुळे व पुरेशी झोप न झाल्यामुळे बाळ रडू लागले. प्रत्येक जण त्याला आपल्यापरीने शांत करण्याचा प्रयत्न करत होता. पण बाळ काही केल्या रडण्याचे थांबेना. वळवाचा पाऊस पडण्याची लक्षणे दिसत होती. विजांच्या कडकडाटापाठोपाठ मुसळधार पावसाला सुरवात झाली. महत्‌प्रयासाने झोपवलेले बाळ जागे झाले. मोठ्याने रडू लागले. पावसाचा जोरही वाढतच चाललेला. वाटेत कुठे थांबावे, तर त्या घाटरस्त्यात मनुष्यवस्तीचा मागमूस दिसत नव्हता. घाटमाथ्यावर पोचलो. दूरवर प्रकाश दिसला. रस्त्याच्या कडेला एक साधेसुधे, परंतु प्रशस्त घर दिसले. घराजवळ गाडी नेताच कुत्री भुंकत गाडीजवळ आली. इतक्‍या रात्री कोण आले हे पाहायला त्या घरातील पुरुषमंडळी बॅटरी घेऊन बाहेर आली. "आमचे बाळ फार रडत आहे, त्याला थोडे दूध मिळेल का?' विचारले. त्यांनी आम्हाला घरात नेले. दूध पाजले तरी बाळ रडण्याचे थांबेना. त्या घरातली वृद्ध स्त्री म्हणाली, "बाळाला माझ्याकडे द्या.' तिने बाळाला मांडीवर घेतले व म्हणाली, "बाळ अवटाळलं हाय.' तिने आपल्या सुनेला तेल गरम करून आणण्यास सांगितले. बाळाला दोन्ही पायांवर ठेवून अर्धा तास चांगले मालिश केले. काय आश्‍चर्य! बाळ रडायचे थांबले व हातपाय हलवून हसू लागले.

आम्ही पुरुषमंडळी बाहेर ओसरीवर गप्पा मारत बसलो होतो. घरातील कर्त्या पुरुषांच्या चेहऱ्यावर दुःखाची छटा दिसत होती. प्रत्येकाचे क्षौर केले होते. इतक्‍यात थोरला भाऊ चहा देत म्हणाला, ""आजच आमच्या वडिलांचा तेरावा झाला. देवाने आमचे दुःख हलके करण्यासाठी तुम्हाला आमच्याकडे पाठविले आहे.'' आम्ही आभार मानून निघालो, तोच ती मघाचीच वृद्ध स्त्री जेवून जाण्याचा आग्रह करू लागली. म्हणालो, "मावशी, आपलं दुःख दूर सारून तुम्ही आमच्यावर उपकार केलेत, आणखी कशाला तसदी?' ती म्हणाली, "बाबा, तुज्यावानी माजा धाकला लेक हाय. आडल्यानडल्याला मदत केली म्हंजे परमेश्‍वर आपल्याला कायबी कमी करत नाय बग.' आपले वैयक्तिक दुःख बाजूला सारून मदत करणारे ते कुटुंब दहा-बारा वर्षांनंतरही माझ्या स्मरणात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nandkumar yewale write article in muktapeeth