मी : 'इंटरनॅशनल' आजी!

नीलिमा हर्डीकर
बुधवार, 11 एप्रिल 2018

मलेशियातील एका गृहसंकुलात वेगवेगळ्या देशातील मुले एकत्र खेळू लागली. एका मुलीची आजी या मुलांच्या खेळात रमली आणि तिलाही ही आंतरराष्ट्रीय नातवंडे मिळाली.

मलेशियातील एका गृहसंकुलात वेगवेगळ्या देशातील मुले एकत्र खेळू लागली. एका मुलीची आजी या मुलांच्या खेळात रमली आणि तिलाही ही आंतरराष्ट्रीय नातवंडे मिळाली.

मला आठवते आहे माझ्या मुलीच्या बाळंतपणाची वेळ. लेबर रूम... रात्रीची वेळ. घड्याळात दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटे झालेली. तेवढ्यात नर्सबाई बाहेर आल्या, म्हणाल्या, ""अभिनंदन, आजी झालात, नात झालीय...'' बाई गं ! दहा वाजून छप्पन - सत्तावन्न मिनिटांपर्यंत मी आई होते आणि दहा अठ्ठावन्नला आजी ! एका मिनिटात भूमिकेत एकदम सॉलिड चेंज ! क्‍या बात है ! सिया या माझ्या पहिल्या नातीने मला "आजी' ही पदवी दिली. दरम्यान, मुलालाही मुलगी झाली - देविका.

सिया आणि देविकाच्या आगमनाने मला परत लहान झाल्यासारखं वाटू लागलं. त्यांना अभिनयासहित गोष्टी सांगणे, त्यांच्याबरोबर जोरजोरात "पोएम्स' म्हणणे, "हाइड अँड सिक' म्हणजे आपली लपाछपी खेळणे, चादरींची घरे करून देऊन भातुकली खेळणे आणि याबरोबर "डान्स' करणेसुद्धा मी "एन्जॉय' करू लागले. सिया शाळेत जाऊ लागली. मी काही वेळा तिला आणायला जायची तेव्हा "सियाची आजी आलीय आज' असे म्हणत तिच्या मैत्रिणी माझ्याशी बोलायच्या. तनिष्का तर सियाची अपार्टमेंट मैत्रिण. ती पण आजी-आजी करायची. सुरवातीला हे आजीपण जरा जडच गेले. वय नव्हते ना तेवढे ! दुकानदार, भाजीवाले, फळ-फुलवाले मावशी-ताई-वहिनी-काकू अशी हाक मारायची सोडून जेव्हा आजी म्हणायला लागले तेव्हा तर रागच यायचा ! पण या नातवंडाच्या आजी हाकेने मात्र आनंदाचीच अनुभूती येते.

दरम्यान, मुलाची बदली झाली मलेशियातील क्वालालंपूरला. नवा देश, नवीन रीतीभाती, नवीन वातावरणात आम्ही तिथे राहावयास लागलो. कॅनडा, रशिया, नॉर्वे, स्वीडन, अमेरिका, ब्रिटन, सौदी अशा विविध देशांतून नोकरीनिमित्त इकडे आलेल्या विविध धर्मांच्या लोकांचे हे गृहसंकुल आहे. आपली भारतीय मंडळीही आहेतच. पण आपल्यासारखे बेधडक इथे एकमेकांकडे जाणे नाही. आवारात असलेल्या सुंदर तलावाच्या बाजूला देविकाला घेऊन मी संध्याकाळी जायला लागले. मुलांसाठी असलेल्या छोट्या बागेत ती खेळायची, सायकल फिरवायची, हळूहळू इतर मुले पण तिथे येऊन देविकाशी खेळायला लागली आणि इथे मला मिळाली भारतातील विविध प्रदेशांतली नातवंडे ! दिल्लीची दिवा, पंजाबचा अनहद या दोघांचे वडील इथे सिटी बॅंकेत होते. उत्तर प्रदेशची वैशाली, मुंबईहून आलेली त्रिशा व पुण्याची आर्या ! "देविकाज दादी' म्हणून ही मुले माझ्याशी बोलायला लागली. 2014 मध्ये गणपती उत्सवाच्या सुमारास इथे क्वालालंपूरला होते. तेव्हा मी व माझ्या सुनेने ठरविले, की आरतीला सर्वांना बोलवायचे. त्याप्रमाणे सर्व भारतीय कुटुंबे आली. नैवेद्य, आरती दणक्‍यात झाली. सर्व नातवंडे टाळ्या-घंटा वाजवीत होती. मग दिवाळी आली तेव्हा आपल्या भारतीयांबरोबरच गोऱ्या मंडळींना व छोट्यांना पण बोलविले. त्यांना खूप छान वाटले. "हॅपी दीपावली' असे म्हणत छोटी मंडळीही माझ्याशी शेकहॅंड करीत होती. दिवाळी फराळ तर त्यांना एकदम यम्मीऽऽऽ वाटला ! आणि इथे मला मिळाली विविध देशांतील नातवंडे ! नॉर्वेची जेनी, अमेरिकेचा सॅम, हॉलंडची इव्ही, श्रीलंकेची कियारा, इंडोनेशियाची क्‍लेरिस, थायलंडची पीन आणि कॅनडाची वॉरन हे सर्व देविकाच्या मित्रमंडळींत सामील झाली आहेत. त्यामुळे आता मी सर्वांची झाली आहे "ग्रॅण्डमा - इंटरनॅशनल आजी !' खूप छान वाटते.

आता मी जेव्हा जेव्हा इथे येते तेव्हा आवर्जून माझ्या या इंटरनॅशनल नातवंडांसाठी भारतीय खाऊ घेऊन येते. यंदा 2018 मध्ये काय बरे न्यावे, ह्याचा विचार करीत आहे. सुकामेवा लावलेले बेसन - रवा लाडू न्यावेत की चकली, खारी - गोडी शंकरपाळे की आंबापोळी? काहीही नेले तरी माझ्या या नातवंडांना हा खाऊ नक्की आवडेल अशी माझी खात्री आहे ! आज माझ्या दोन नाती अकरा आणि बारा वर्षांच्या आहेत. त्याचे माझे छान जमते. त्या माझ्या खूप छान मैत्रिणी आहेत. त्यांचा मला आधार वाटतो. त्यांनाही माझ्याबद्दल प्रेम आहे.
 
मला काय वाटते सांगू? देश-धर्म-वेष-भाषा, संस्कृती कुठलीही असो, मुले म्हणजे निरागसतेचे प्रतीकच असतात. म्हणून इथे भारतात काय किंवा परदेशात काय, ही सगळी मुले एकत्र येऊन खेळतात, भांडतात, हट्ट करतात, खाऊ मागतात आणि जवळ येऊन बिलगतात तेव्हा एकच निखळ पारदर्शी, कृतार्थ भावना जाणवते- असीम वात्सल्याची ! कारण अवघ्या स्त्रीत्वाची आभाळमाया "आजी' मध्येच तर दडलेली असते, हो ना?
जाता जाता...

आत्ताच देविकाचा मलेशियाहून फोन आला. म्हणाली, ""आजी, मला दोन नव्या मैत्रिणी मिळाल्या आहेत. चीनची सीसी आणि कोरियाची चेजीन !
अगो बाई, इंटरनॅशनल नातवंडांची संख्या वाढतच चालली की ! खाऊ आता जास्त न्यावा लागेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nilima hardikar write article in muktapeeth