ज्येष्ठी पौर्णिमा - एक पर्यावरण पूजा 

निर्मला सु. देशपांडे 
मंगळवार, 26 जून 2018

रखरखीत उन्हाळा संपतो आणि चराचराला पावसाचे वेध लागतात. हवा बदलते. अधुनमधून वळवाच्या पावसाच्या सरी ओघळतात. भल्या पहाटे पासूनच पावशा पक्षी पेरते व्हा अशी शेतकऱ्याला साद घालू लागतो. शेतकरीही घाईगडबडीने पेरणीची तयारी करतो. बघता बघता झाडं, वेली, नव्या लाल पोपटी पर्णसंभाराने नटू लागतात. अवघा निसर्ग आनंदाने डोलत वर्षाराणीची आतुरतेने वाट बघत असतो. अशा सुरेख समयी डौलदारपणे येते ज्येष्ठी पौर्णिमा-वटपौर्णिमा. अवघ्या महिलांचा वर्षातला एक आनंदाचा पारंपारिक सण. 

रखरखीत उन्हाळा संपतो आणि चराचराला पावसाचे वेध लागतात. हवा बदलते. अधुनमधून वळवाच्या पावसाच्या सरी ओघळतात. भल्या पहाटे पासूनच पावशा पक्षी पेरते व्हा अशी शेतकऱ्याला साद घालू लागतो. शेतकरीही घाईगडबडीने पेरणीची तयारी करतो. बघता बघता झाडं, वेली, नव्या लाल पोपटी पर्णसंभाराने नटू लागतात. अवघा निसर्ग आनंदाने डोलत वर्षाराणीची आतुरतेने वाट बघत असतो. अशा सुरेख समयी डौलदारपणे येते ज्येष्ठी पौर्णिमा-वटपौर्णिमा. अवघ्या महिलांचा वर्षातला एक आनंदाचा पारंपारिक सण. 

या दिवशी महिला वडाच्या झाडाची पूजा करतात. सात जन्माचे प्रतिक म्हणून सुताचे सात धागे वडाभोवती गुंडाळून हाच पती सात जन्म मिळो अशी त्याची प्रार्थना करतात. आपल्या दृष्ट्या पूर्वजांनी मानवी आयुष्यातले निसर्गाचे महत्व ओळखून त्याची पूजा सुरु केली. ज्या पंचमहाभूतामुळे पृथ्वीवर सजीवसृष्टी जन्माला आली, वाढली त्यांच्याप्रमाणेच निसर्गातील सर्व सजीव-निर्जीव सृष्टीची मानवाला आवश्‍यकता आहे. त्यातलीच एक वृक्षसंपदा अनेक प्रकारच्या वनस्पतींचा यात समावेश होतो. परंतु, या सर्वांपेक्षाही एक महत्वाचे काम वनस्पती करतात. ते म्हणजे हवा शुद्धीकरण. 
वड हा मोठा वृक्ष आणि त्याचे कामही तितकेच मोठे. अगदी प्राचीन काळापासून हा वृक्ष मानवाला सेवा, सुविधा, सोबत देतोय. त्याच्या विषयी एक पौराणिक कथाही सांगितली जाते. सत्यवान-सावित्रीची. सत्यवान एक राजकुमार तर सावित्री एक राजकन्या. वडिलांचे राज्य गेल्याने त्यांना तिघांना जंगलात येऊन रहावे लागते. लाकडे गोळा करताना झाडावरुन पडून सत्यवान मरण पावतो. यमदेव प्राण घेऊन निघतात. त्यांच्यामागे सावित्री निघते. त्यांच्या विनवण्या करत व शेवटी या वडाखालीच सत्यवानाला जीवन पुनःच मिळते. पुढे सर्व मंगल घडते. आपलेही सावित्रीसारखे सौभाग्य अखंडीत रहावे म्हणून आजही महिला वडाची पूजा करतात. 

या गोष्टीतील पौराणिक भाग सोडला तरी वटवृक्ष हवा शुद्धीकरणाचे फार मोठे काम करुन आपल्या सौभाग्याचे रक्षण करतच आहे. रोज शेकडो लिटर पाणी, बाष्प हवेत सोडून हवेतला कार्बनडाय-ऑक्‍साईड शोषून घेतो व हवेत ऑक्‍सिन सोडतो. प्रदूषण नष्ट करुन हवा शुद्द करण्याचा तो एक मोठा कारखानाच आहे. म्हणूनच, तर तो वंदनीय आहे. वडाचे इतरही भाग उपयुक्त आहेत. याच्या पारंब्याचा केशवर्धक तेलामध्ये उपयोग केला जातो. दुखावल्याने सूज आलेल्या भागावर वडाची पाने, कोमट करुन त्याला गोडेतेल लावून बांधल्याने सूज कमी होते. वडाखालची पहिली माती काढून खालीच माती घेऊन त्यात झाड लावल्यास झाडे चांगली येतात. मायेने पसरलेल्या मोठमोठ्या फांद्यावर पाखरे घरटी करतात. याची लाल फळे खातात. याच्या दाट सावलीत माणसं, गुरं विसावतात. 

वटवृक्ष हा तसा मोठा वृक्ष असल्याने तो सहसा घराच्या अंगणात किंवा परसबागेत दिसत नाही, त्याचा विस्तार मोठा असल्याने त्याला जागाही भरपूर लागते. त्यामुळे तो गावाबाहेर, माळरानावर, रस्त्याच्या कडेला, शेतात, बखळीत दिसून येतो. याच्या जाडसर पानांवर तांदळाच्या साल पापड्या करतात. तर चैत्र गौरीच्या, हळदी कुंकवाच्या वेळी खेडोपाडी वडाच्या पानावर कैरीच्या डाळीची खिरापत देण्याची पद्धत होती. याच्या पारंब्या जमीनीत जाऊन त्यांची नवीन झाडे तयार होत असतात. त्यामुळे भरपूर मोकळी जागा असेल तर वडाचे एक फार मोठे कुटूंब तयार होते. जंगलात तर वटवृक्षांची अशी मोठमोठी कुटूंबे पहायला मिळतात. 

राजस्थानमध्ये पर्यावरणाचे महत्व लोकांना समजले आहे. राखी पौर्णिमेला तिथल्या स्त्रिया झाडाला राखी बांधतात आणि कुटूंबातील एक सदस्य म्हणून त्याचे रक्षण, संगोपन करतात. जंगलांचे रक्षण करण्याकरता देशाच्या अनेक भागात देवराया आहेत. तिथले एकही झाड कोणीही तोडत नाही. वनदेवाच्या शापाच्या भितीने या वनराया आतापर्यंत तरी टिकून आहेत. आपली जंगल संपत्ती जपण्याचा पूर्वजांचा हा प्रयत्न अत्यंत स्तुत्य व अनुकरणीय आहे. चिपको सारखे आंदोलन करुन जागृत समाजसेवकही या कामात मदत करत आहेत. आपले सरकारही आता जागे होऊन जंगलाला अभय देत आहे. पर्यावरण दिन, आठवडा साजरा करत आहे. दरवर्षी हजारो झाडे लावण्याचा संकल्प होतो. वृक्षारोपण केले जाते. पण अजुनही त्यांचे रक्षण, संगोपन व्हावे तसे होत नाही. या कामात सरकार बरोबर तुमचा, आमचाही सहभाग असायला हवा. आपल्याला शुद्ध हवा देण्यासाठीच प्रदूषण हटवण्यासाठी आपल्याला हा आपला वृक्षमित्र जपला पाहिजे, जगवला पाहिजे. सरकारच्या "झाडे लावा, झाडे जगवा' या आवाहनाला प्रतिसाद दिला पाहिजे.

औद्योगीक प्रगती, चैनी विलासी, भोगवादी संस्कृतीचे अंधानुकरण, बदलणारी जीवनपद्धती त्यामुळे होणारी प्रचंड वृक्षतोड, शहरात व आसपास उभी राहणारी सिमेंटची जंगले त्यामुळे आपला हा उपयुक्त मित्र आपणच आपल्या हाताने नष्ट करुन टाकतोय. त्यांची हत्या करतोय. 

आता वेळ आली आहे. राजस्थानप्रमाणे आपणही सगळ्यांनी एकजुटीने या वृक्षराजीला प्रेमाचे धागे बांधुन त्यांचे संरक्षण, संगोपन करण्याची, नाहीतर एक दिवस ही हिरवी निसर्गसंपत्ती नष्ट होऊन माणूस प्रदुषणाच्या विळख्यात आणखीन सापडेल. यंदा आपण वडाची पूजा जंगलात जावून करु. त्याची फांदी तोडून नव्हे. निसर्गाच्या सानिध्यात जाऊन एक तरी झाड लावण्याचा, वाढवण्याचा संकल्प करु आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी सुंदर, शुद्ध हवेशीर, प्रदुषणमुक्त देश निर्माण करुन ठेवू. मात्र, झाडे लावताना वड, पिंपळ, कडुलिंब, बाभळ यासारखी देशी झाडेच लावावीत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nirmala deshapande article on vatpornima