घुसळण घुसळिते

निर्मला देशपांडे
मंगळवार, 5 जून 2018

पूर्वी अनेक घरांत ताक करण्यासाठी लाकडी खांब असायचा. त्याला घुसळण खांब म्हणून ओळखत. त्यावर ताक करून लोणी काढणे हा विलक्षण प्रसंग असायचा.

दोन, तीन दिवसांचं भरपूर विरजण साठलं होतं. जरा मोठ्या पातेल्यात घालून मी ते घुसळत होते आणि सहज शाळेतील एक कविता गुणगुणत होते. ""चंद्रामावशी आपुल्या आकाशीच्या अंगणात घुसळण घुसळिते डेरे कसे घुमतात''... आणि गुणगुणतानाच मन बालपणात गेलं. अवघं बालपण आणि घुसळखांबावर ताक करणारी आई डोळ्यासमोर उभी राहिली.

पूर्वी अनेक घरांत ताक करण्यासाठी लाकडी खांब असायचा. त्याला घुसळण खांब म्हणून ओळखत. त्यावर ताक करून लोणी काढणे हा विलक्षण प्रसंग असायचा.

दोन, तीन दिवसांचं भरपूर विरजण साठलं होतं. जरा मोठ्या पातेल्यात घालून मी ते घुसळत होते आणि सहज शाळेतील एक कविता गुणगुणत होते. ""चंद्रामावशी आपुल्या आकाशीच्या अंगणात घुसळण घुसळिते डेरे कसे घुमतात''... आणि गुणगुणतानाच मन बालपणात गेलं. अवघं बालपण आणि घुसळखांबावर ताक करणारी आई डोळ्यासमोर उभी राहिली.

सणसर (ता. इंदापूर) या छोट्याशा खेडेगावातल्या एका शेतकऱ्याची मी मुलगी. आमच्या घरी 5-6 गायी होत्या. त्यांचं निघणारं सगळं दूध घरात वापरलं जायचं. आमच्या गायी गावरान असल्याने जर्सी गायींसारखं 7-8 लिटर दूध देत नसत. शेर, दोनशेर दूध त्या देत. घरात दूध, तूप, दही, लोणी भरपूर असायचं. गाय व्यायली की, खरवस, मग कोवळं नासलेलं गोड दूध यांची मेजवानी असे. भरपूर वेलची पूड घातलेल्या आईच्या हाताच्या त्या खरवसाच्या आठवणीने आजही तोंडाला पाणी सुटतं.
गायीला वासरू होणार असेल त्या वेळी व नंतरही तिची खूप काळजी घेतली जाई. तिला खायला भाजून, भरडून शिजवलेली बाजरी देत. तिला 3-4 हांडे गरम पाण्याने अंघोळ घातली जायची. सकाळी आम्हाला चहाऐवजी दूध देत. गायीचं घरचं दूध खूप चवदार, गोड असायचं. सगळ्यांचं चहापाणी उरकल्यावर रात्रीचं दूध आणि सकाळचं उरलेलं दूध एका मोठ्या पातेल्यात शेगडीवर तापत पडे. त्याला मस्त जाड साय येई. संध्याकाळी ती काढून तिला विरजण लावलं जाई. अशा दोन विरजणांचं आई किंवा वहिनी ताक करीत.

स्वयंपाक घरात घुसळखांब होता. भिंतीला फिक्‍स केलेली ती एक मोठी जाडजूड मांडणी होती. आमच्या जुन्या स्वयंपाकघरात मध्यभागी घुसळखांब होता. पण स्वयंपाकघर बदललं आणि मग आईला घुसळखांबाची वेगळी व्यवस्था करावी लागली. तो घुसळखांब आणि त्याची दोरी बऱ्यापैकी ओशट म्हणजे तुपकट असायची. ताक करणारी व्यक्ती उभी राहून पुढे वाकून दोरीने रवी हरवून ताक करायची. मस्त व्यायाम असायचा. घुसळखांबाला एक चांगली मध्यम जाडीची दोरी दोन्ही टोकं बांधून योग्य तेवढा गोलवा देऊन बांधलेली असे. खाली जमिनीवर विरजणाचं तपेलं ठेवलेलं. त्याच्यातली रवी या गोल दोरीत अडकवायची. दुसऱ्या दोरीचे रवीला दोन वेढे देऊन दोन टोकं आपल्या हातात धरायची आणि दोरीच्या सहाय्याने रवी हरवून ताक करायचं. खरंतर हे काम सोपं नाही. पण जुन्या बायका ते सहज करत. ताक करायला पितळेचं झक्क तपेल असे. त्यात एका विशिष्ट लयीत फिरताना रवी घुमायची आणि एखाद्या तालवाद्यासारखा लयबद्ध आवाज यायचा. लोणी आलं की ताकसुद्धा लोण्याचा बाळकृष्णाला नैवेद्य दाखवायचा आणि मग घरातल्या रांगत्या बाळकृष्णाला चांदीच्या वाटीत लोणीसाखर दिली जायची. मग किंचित पिवळीझाक असलेलं पांढरंशुभ्र लोणी काढून उरलेलं ताक दुसऱ्या भांड्यात ठेवून कुणाकुणाला दिलं जायचं. त्या वेळी खेड्यामध्ये कोणालाही ताक विकत घ्यावं लागत नसे.

ताक करताना अवतीभोवती दह्याचे शिंतोडे उडत. गायीच्या दुधापासून तयार होणाऱ्या या पदार्थाला पाय लागू नये या आदराच्या भावनेने त्यावर लगेच शेणाचा बोळा फिरवला जाई. आम्हा मुलांच्या न्याहरीसाठी अनेक वेळा कर्दळीच्या किंवा केळीच्या पानावर खमंग भाजणीचे थालीपीठ त्यावर पांढराशुभ्र लोण्याचा गोळा, कैरीचं घरी बनवलेलं लोणचं आणि दह्याची किंवा ताज्या ताकाची वाटी असा खमंग बेत असे. त्या वेळी फ्रिज नव्हता तरी 2-3 वेळचं लोणी साठवून मग त्याचं तूप केलं जायचं. ते रोज स्वच्छ धुतल्यामुळे असेल, शुद्ध हवेमुळे असेल पण लोण्याला कधी वास येत नसे की त्याचा रंगही बदलत नसे. माझ्या सासरीही शेती होती. गायी-म्हशींनी गोठा भरला होता. (तसा तो आजही आहे) त्यामुळे दूध आणि दुधाच्या पदार्थांची चंगळ असते. माझ्या सासूबाई भल्यामोठ्या पितळेच्या तपेल्यात घुसळ खांबावर ताक करीत. मीही ते हळूहळू शिकले.

जरा वेळ रवीने हलवून लोणी येण्याचे चिन्ह दिसेना, म्हणून ते मिक्‍सरच्या भांड्यात घालून फिरवलं. पाच मिनिटात लोणी आले. शरीराला, हाताला कुठलाही त्रास न होता होणारं हेही घुसळणचकी, नाहीतरी आजच्या या धावपळीच्या युगात नोकरदार गृहिणींना एवढा वेळ तरी कुठे असतो की, शांतपणाने दूध तापवणे, सायीला विरजण लावणे, त्याचं घुसळून लोणी काढणे, ताक करणे या सगळ्या कामाला? पण माझ्यासारखी एखादी घुसळखांबावर घुसळण पाहिलेली आजही दूध शांतपणाने तापविणं, सायीला विरजण लावणं आणि रवीने घुसळण घुसळणे हे अगदी आवडीने करते आपलं बालपण आठवीत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nirmala deshpande write article in muktapeeth