शेवटचा सोबती

निर्मला एम. कलबुर्गी
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

पडलेल्या दाताविषयीही कृतज्ञता जपणे, हे खरेच विलक्षण आहे!

पडलेल्या दाताविषयीही कृतज्ञता जपणे, हे खरेच विलक्षण आहे!

आधीच एक एक करून एकतीस दूर गेले होते. पण, तो अखेरचाही त्यादिवशी हातात आला. त्याला छतावर फेकावे म्हणून अंगणात आले. पण त्याला असे दूर करणे जमले नाही. मनात आले, या शेवटच्या सोबत्याला वाहत्या पाण्यात सोडून यायचे. म्हणजे कुठल्या तरी नदीत. पण, श्रावणात किंवा शिवरात्रीला एखाद्या तीर्थस्थळी जावे, तर घरातून विचारणा होत असे, की ""घरात देव नाहीत काय? बाहेरच्या देवाला कशाला? घरातल्या देवाची मनापासून पूजा करा.'' त्यामुळे पडलेला दात सोडण्यासाठी नदी असलेल्या गावाला जाऊया का, असे विचारण्याची सोयच नव्हती. एक कापराची डब्बी स्वच्छ धुऊन त्यात दात ठेवला. ती डब्बी सेल्फमध्ये एका कोपऱ्यात ठेवली.

दोन दिवसांनी एक लग्नपत्रिका आली. लग्न नदी असलेल्या देवस्थानच्या गावात होते. मी सर्वांबरोबर निघाले. बसचा वेग वाढला. गडबड कमी झाली. थोडेसे निवांत वाटत असताना एकदम लक्षात आले, की मी दाताची डबीच विसरून आले होते. लग्न छान झाले. पण माझे दाताचे काम तसेच राहिल्यामुळे मन हळहळतच होते. एवढ्या मुद्दाम या लग्नाला आले खरी, पण इच्छापूर्ती झाली नाहीच. घरी आल्यावर ओसरीवर पाहतो तो लग्न पत्रिका दिसली. मी पत्रिका घेऊन वाचून पाहिली. तसे जवळचे लग्न नव्हते. एरव्ही मी गेलेच नसते, पण हे लग्न गाणगापुरात होते. म्हणजे पुन्हा एक संधी. मला उत्साह आला. या वेळी लग्नाला जाताना आठवणीने दाताची डब्बी जवळच्या बॅगेत ठेवली. निघेपर्यंत दहा वेळा खात्री करून घेतली. वऱ्हाडाबरोबर गाणगापूरला गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी "संगमा'वर सगळ्याबरोबर जाताना आठवणींने दाताचा डबा घेऊन स्नान केले. डब्यातला दात बाहेर काढला. दोन्ही हातांची ओंजळ केली. त्यात हळूच दात ठेवला. ओंजळ पाण्यात धरून त्या "संगमा'त माझ्या या शेवटच्या सोबत्याला सोडून दिले. दोन्ही हात जोडून डोळे झाकून म्हणाले, ""तू माझा सोबती होतास, पुढच्या जन्मीपण माझ्याच तोंडात वसतीला ये.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nirmala kalburgi write article in muktapeeth