रांगोळी रेखिली

निर्मला एम. कलबुर्गी
मंगळवार, 12 मार्च 2019

मनात चांगली इच्छा असली की ती पूर्ण होतेच, असा अनुभव अनेकांना आलेला असेल.

मनात चांगली इच्छा असली की ती पूर्ण होतेच, असा अनुभव अनेकांना आलेला असेल.

दोन वर्षे दिंडीचा आनंद लुटला; पण पडल्यामुळे तिसऱ्या वर्षी चालणे शक्‍य होणार नव्हते. किमान गावांबाहेरच्या विठोबा-रखुमाईच्या देवळात रिक्षाने जावे, दिंडी आली की दर्शन घेऊन यावे, असे ठरवले. दिंडी यायच्या वेळी देवळासमोरच्या मोकळ्या जागेत मोठी रांगोळी घालून वरच्या भागात "सुस्वागतम्‌' लिहायचे. दिंडी आली की फुलांचा वर्षाव करायचा. सर्वांच्या चहापाण्याची व्यवस्था करायची व घरी यायचे ठरवले. सोबत चौदा-पंधरा वर्षांची एक मुलगी आली. गुडघेदुखीमुळे वाकूनच रांगोळी काढू लागले. सोबतची मुलगी रंग भरू लागली. दिंडी यायच्या आत रांगोळी पूर्ण होईल की नाही असे वाटू लागले. तेवढ्यात खांद्याला बॅग अडकवलेली एक तरुणी येऊन उभी राहिली. मी गुडघा खूपच दुखायला लागला की थोडी उभी राहायचे, पुन्हा रांगोळी काढायचे. रांगोळी काढतानाच तिला विचारले, 'बाई, कुठे राहतेस?'' ती म्हणाली, 'देवळाच्या मागच्या भागाला. आता नोकरीहून आले.'' थोडा वेळ पाहत ती उभी राहिली. म्हणाली, 'ही बॅग घ्या आणि तेथे कट्ट्यावर बसा. मी पुढची रांगोळी पूर्ण करते.'' पाय दुखत असल्यामुळे मला फार बरे वाटले. मी जाऊन बसले.

तिने मुठीत रांगोळी घेऊन भराभरा रांगोळी पूर्ण केली. माझ्याबरोबर आलेल्या मुलीच्या मदतीने छानपैकी रंग भरले. थोडी लांब उभी राहिली. रांगोळीकडे पाहत विचारले, 'मावशी, कशी आली रांगोळी? अजून काय काढायचे?'' मी आनंदाने म्हणाले, 'एकदम मस्त.'' आणि भीतभीतच सांगितले, 'रांगोळीच्या वरच्या भागात "सुस्वागतम्‌' काढ बाई. छान वाटते.'' 'काढते ना! कुठल्या भाषेत? कन्नड, मराठी की हिंदी?'' मी म्हणाले, 'मराठीत''. सुंदर अक्षरात "सुस्वागतम्‌' काढून "मावशी येते मी आता' असे म्हणून निघाली. मी म्हणाले, 'दिंडी आली की ये, दर्शन घेऊन जा.'' रांगोळी अतिशय सुंदर दिसत होती. मी लगेच गाभाऱ्यात जाऊन विठ्ठल-रखुमाई समोर हात जोडून म्हणाले, 'देवा, तू न बोलताच मोठ्या सुंदर रांगोळीची माझी इच्छा त्या मुलीच्या हृदयात येऊन पूर्ण केलीस.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nirmala kalburgi write article in muktapeeth