बेडूक आणि आठवणींचा गुच्छ

निर्मला एम. कलबुर्गी
शनिवार, 15 जुलै 2017

शेजारच्या बाईंच्या बहिणीच्या नवऱ्याच्या "दिवसाला' त्यांच्या गावात पोहोचले. बहीण गळ्यात पडून रडू लागली, तर तिच्या डोक्‍यातली क्‍लीप माझ्या केसात अडकली. भजनात दंग झाले, तर नजरेसमोर बेडूकच दिसत होते.

शेजारच्या बाईंच्या बहिणीच्या नवऱ्याच्या "दिवसाला' त्यांच्या गावात पोहोचले. बहीण गळ्यात पडून रडू लागली, तर तिच्या डोक्‍यातली क्‍लीप माझ्या केसात अडकली. भजनात दंग झाले, तर नजरेसमोर बेडूकच दिसत होते.

शेजारची बाई आणि मी एका भजनी मंडळात होतो. त्यांच्या मोठ्या बहिणीशीही मैत्री झाली होती. त्या बहिणीचा नवरा अचानक वारला. शेजारच्या बाईंबरोबर मी "दिवसाला' निघाले. त्यांच्या जावयांच्या गाडीतून. सोबत त्या बाईंची मुलगीही. दुपारी चार वाजता निघालो. आमच्या गावाहून दोन तासाच्या अंतरावर जायचे होते. गाडीत बाई म्हणाल्या, ""तुम्ही आलात बरे केलात, आज रात्रभर भजन असतंय.'' बहिणीच्या नवऱ्याबद्दल बाई बोलत होत्या.

गाडी वेगाने जात होती. अचानक जोराचा पाऊस आला. समोरच्या काचेतून पुढचे सारे धूसर होऊ लागले. जावयाने समोरच असलेले बटन दाबले. गरम हवा येऊ लागली. अशाने काचेवरचे पाणी जाते म्हणे! आम्हाला चुलीसमोर बसल्यासारखे वाटू लागले. आता पाऊस आणखी वाढला. समोरचे काहीच दिसेनासे झाले. आमच्या पुढची एक गाडी थांबली. आमचीही गाडी थांबली. मधूनच एखादी बस भर्रकन पाणी उडवीत निघून जायची. मला एक भजन आठवले "डगमग डगमग डोले माझी पाण्यावरती नाव रे। पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे।' भजनात हे गाणे आम्ही ठेक्‍यात म्हणत होतो, पण आता भिवून रडत म्हणायची वेळ आली.

पाऊस कमी झाला तसे आम्ही पुढे निघालो. गाव छोटे होते, गाडी गावात शिरली , तशी लहान मुले खेळ थांबवून गाडी पाहू लागली. लहानपणी विमानाचा आवाज आला की, आम्ही वाड्यातली मुलें घराबाहेर येऊन विमान डोळ्याआड होईपर्यंत तोंड वासून पाहात असायचो. गल्लीगल्लीतून वळण घेत एकदाचे त्यांचे घर आले. मोठ्या दरवाजातून आम्ही आत गेलो. मोठ्ठे आंगण होते. शेणाने सारवलेले. स्वच्छ. आतल्या भागात उजव्या कोपऱ्यात एक म्हैस आणि वासरू बांधलेले होते. डाव्या बाजूला अंगणातल्या उभ्या अर्ध्या भागात दाराच्या भिंतीपासून ओसरीपर्यंत दोन विताच्या उंचीचा कट्टा. आंगण झाले की चार-पाच पायऱ्या ओलांडून ओसरी होती. ओसरीवर बहीण, त्यांच्या मुली बसलेले होते. मी जाऊन बहिणीजवळ बसले तर ती माझ्या गळ्यात पडून रडू लागली. कितीतरी वेळ झाला. माझ्या गुडघ्यात कळ येऊ लागली. तोच तिच्या केसातली क्‍लीप माझ्या केसात अडकली. तिला ते समजले असावे. ती बाजूला झाली.

रात्री जेवण झाल्यावर ओसरीवर भजनी मंडळी आली. मला गुडघ्याचा त्रास असल्यामुळे मी अंगणात ओसरीला लागूनच खुर्चीवर बसले. जमीन खड्डू-डब्बू असल्यामुळे खुर्ची नीट बसत नव्हती. तरी मी घट्ट बसले. भजन छान चालले होते. ऐकण्यात दंग झाले, तेवढ्यात खालच्या पायरीजवळ एक बेडूक आला. मी खुर्चीला घट्ट धरून बेडकावर लक्ष ठेवून बसले. माझ्या बाजूला जमिनीवर एका चटईवर एक बाई झोपली होती. बेडूक एकदम उड्या मारत त्या बाईच्या पाठीला चिटकून बसला. बाई आता घाबरून उठेल असे वाटत असताना ती शांतपणे उठली आणि पट्‌द्‌÷िदशी बेडकाला धरून लांऽऽऽब फेकून दिले. पुन्हा झोपून गेली. मी मनात म्हणाले, "हेय बाई, किती लवकर बेडकाचा निकाल लावली की!'

मी पुन्हा भजनात रंगले. एक भजनकरी कट्ट्यावर आडवा झाला. त्याला झोप लागली. त्या कट्ट्याच्या खाली दोन बेडक दिसले. ते एक उडी घेऊन गप्प बसायचे. थोडा अंदाज घेत पुन्हा उडी. मला भीती वाटत होती, ते बेडूक कधीही त्या झोपलेल्या माणसावर उडी घेतील. एवढ्यात माझ्या पायाला काहीतरी लागल्यासारखे वाटले म्हणून मी खुर्चीखाली पाहिले तर दोन-तीन बेडूक दिसले. मी कशीबशी पट्‌द्‌÷िदशी उठले. ओसरीवर आमच्या शेजारच्या बाईजवळ जाऊन बसले. पण सारे लक्ष त्या झोपलेल्या माणसाकडे अन्‌ त्याच्या जवळ पोचलेल्या बेडकांकडे. एवढ्यात पुढचे भजन सुरू झाले - "डगमग डगमग डोले माझी पाण्यावरती नाव रे। पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे।'

हे भजन ऐकताच मला पावसात अडकलेल्या आमच्या गाडीची आठवण झाली. पाठीच्या कण्यातून सळकन्‌ भीती दौडत गेली. तोच एक जोरदार किंचाळी ऐकू आली. एक उंचीपुरी धिप्पाड बाई उभी राहून स्प्रिंगसारखी हालत होती आणि दोन्ही हात जोरजोरात मागे-पुढे करत होती. भजनात देवीचे गाणे चाललेले होते. बहुतेक बाईच्या अंगात देवी आली होती. आरती संपली. देवी अंगात आलेली बाई शांत झाली.

सर्वजण प्रसाद घेऊन आपापल्या घरी गेले.अंगणात मोठ्ठी सतरंजी अंथरण्यात आली. मी शेजारच्या बाईला म्हणाले, ""आपण आतच झोपू, मला बेडकांची भीती वाटते.'' ती म्हणाली, ""अहो, बेडकं काही करत नाही. बाहेर झोप चांगली होईल.'' मी मनात म्हणाले, ""चांगली झोप लागल्यावर बेडूक केव्हा कुशीत येईल आणि तेथून उडी मारून गालावर आणि गालावरून डोक्‍यावर उडी घेऊन डोके गांगरत बसेल सांगायला यायचे नाही.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nirmala kalburgi write article in muktapeeth