पंढरपुरात पूर

पांडुरंग बडवे
शनिवार, 21 जुलै 2018

आयुष्यात एकदा पूर अनुभवला की प्रत्येक मुसळधार पावसात तो आठवतोच.

आयुष्यात एकदा पूर अनुभवला की प्रत्येक मुसळधार पावसात तो आठवतोच.

ही आठवण 1956 मधील. आठवडाभर मुसळधार पाऊस पडत होता. चंद्रभागा पात्र सोडून घाटावरून पंढरपूर गावात शिरू लागली होती. गावकरी सुरक्षित जागेचा आसरा घेऊ लागले होते. गावाच्या तीनही बाजूंनी पाणी वेगाने शिरत होते. जुना दगडी पूल, लखूबाई मंदिर, कबीर घाट, उद्धव घाट, दत्त घाट, महाद्वार घाट पार करीत पाणी गावात आले, तरीही मध्य भागातले लोक घर सोडून हलले नव्हते. पावसाळ्यात भागेला पूर येतोच, त्यामुळे सगळे काहीसे बेसावधच राहिलेले. पहिली रात्र गेली, पण पाणी वाढायचे थांबेना. मंडई गल्लीत आमचा वाडा होता. सकाळी पाहिले तर बाराखणी तळघर पूर्ण भरले होते. पाणी अंगणातून ओसरीकडे सरकत होते. कोळी लोकांनी त्यांच्या होड्या त्या पुरातून गावात आणल्या होत्या. गल्ल्यांमधून गाड्यांऐवजी होड्या फिरत होत्या. होड्यांबरोबर तरुण मंडळांचे कार्यकर्ते लोकांना मदत करायला निघाले होते. दारात होडी आली. बाबा, काका, मोठा भाऊ यांनी आम्हा सगळ्यांना घराबाहेर सुरक्षित काढत होड्यांमध्ये बसवून दिले. आई घर सोडायला तयार नव्हती. घरातील विठ्ठल-सखुमाईला सोडून ती बाहेर निघू पाहीना. बाबांनी तिची कशीबशी समजूत काढली. थोडेफार गरजेचे सामान एका होडीत टाकले. चौफाळ्यातील काकांच्या घरी गेलो.

सारा गाव उंचावरल्या जागांवर पांगून. सगळे जीव सुरक्षित होते. पाण्याला उतार नव्हता. आता काळोख पसरत गेला. टेंभे, मशाली उजळल्या. पोलिसांच्या बॅटऱ्यांचे झोत फिरू लागले. समोर पूर, पण पिण्याला थेंबही नाही, अशी स्थिती. तरुणांनी, कार्यकर्त्यांनी पिण्याचे पाणी वाटले. थोड्या वेळाने जेवणही पुरवले. धर्म-जात विसरून या पुराने सगळ्यांना एक केले होते. दुसऱ्या दिवशीही पाणी कमी झाले नाही. आता लोकांनी कीर्तन, भजन सुरू केले. भीमेची प्रार्थना केली. उत्पात, बडवे, रंगा पहिलवान, कोळ्यांचे महादेवअण्णा यांनी होडीने जाऊन भीमेची खणानारळाने ओटी भरली. चौथ्या दिवशी पहाटे पूर ओसरू लागला. नदी गावातून पुन्हा आपल्या पात्रात परतली आणि गावकरी आपापल्या घरात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pandurang badwe write article in muktapeeth