esakal | धडा व्यसनमुक्तीचा
sakal

बोलून बातमी शोधा

muktapeeth

धडा व्यसनमुक्तीचा

sakal_logo
By
पांडुरंग बडवे

तंबाखूचे व्यसन लागले होते. पण एकवेळ अशी आली की चांगलीच अद्दल घडली आणि त्यातून व्यसनमुक्तीही.

मित्राला भिगवण मालधक्‍क्‍यावर माल उतरवून घेण्याचे काम मिळाले होते. व्यवस्थापक म्हणून माझी नेमणूक झाली होती. भिगवण गावात कार्यालय. गावापासून मालधक्का दोन किलोमीटरवर.

चंद्रपूरहून सिमेंट गोण्या आल्या होत्या. चाळीस-पंचेचाळीस हजार गोण्या भरलेली पूर्ण गाडी रिकामी करण्यासाठी रेल्वे दहा तासांची मुदत देत असे. त्या वेळेत गोदामात माल भरायचा, वितरकांनी आधी नोंदवल्यानुसार त्यांच्या मालमोटारी भरून शिल्लक गोण्यांसाठी रात्री पहारा करावा लागत असे. एकच "गुडशेड'. त्यावर एकच ट्यूब पेटलेली. माल तर लांबपर्यंत उतरलेला. रात्री सतत बॅटरी वापरावी लागे. संध्याकाळी सहानंतर मालधक्का बंद, कॅन्टीन बंद. दिवसभर जेवण केले नसल्याने बाकीचे सर्वजण गावात जेवायला गेले. येताना माझ्यासाठी डबा आणणार होते. धक्‍क्‍यावर काळोख पडू लागला. सतत दोन्ही टोकांपर्यंत फेऱ्या माराव्या लागत. भूक लागलेली. पाणी संपले. वेळ जाईना. तंबाखूचा रवंथ सारखा चालू झाला. गावात गेलेल्यांची वाट पाहता पाहता बरीच रात्र झाली. तंबाखूच्या दोन पुड्या संपल्या. तोंडाला व घश्‍याला कोरड पडू लागली. आतील गालाचे सालपट निघू लागले. तोंड उघडता येईना. रात्री दोननंतर सर्वजण मजा करून आले. कसातरी वरणभात खाल्ला. सकाळी दोघेजण गावातील डॉक्‍टरांकडे घेऊन गेले. डॉक्‍टर म्हणाले, ""तंबाखूला राम राम करा. त्यातच तुमचे हित आहे,''

आईचे शब्द आठवले, "परगावी जात आहेस, तब्बेत सांभाळ. कुठल्याही आमिषाला बळी पडू नकोस. व्यसनाच्या अधीन जाऊ नकोस. शरीराचे रक्षण तर धर्माचे रक्षण.' रात्रभर झोप नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळीच स्नान करून श्री दुर्गादेवी मंदिरात गेलो. संकल्प सोडला, "तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणार नाही.' माझी तंबाखू सुटण्यास माझे सोबती कारणीभूत झाले. ते सगळे गावातून लवकर परतले असते तर मी तंबाखूचे अतिसेवन केले नसते. तेव्हा त्रास झाला नसता आणि अजून व्यसन चालूच राहिले असते. या गोष्टीला आता बावीस वर्षे झाली. मित्रांमुळे माझे तंबाखूचे व्यसन सुटले व आयुष्य वाढले.

loading image