समाजवास्तवाची मांडणी करणारा कवी : फ. मुं. शिंदे सर

Marathi Poet F. M. Shinde Sir
Marathi Poet F. M. Shinde Siresakal

माणसाच्या मनाची मशागत करायची असेल, तर त्यात विचारांची पेरणी करायची असते. मानवी समाजातल्या अनेक विचारवंतांनी माणसांच्या जीवन-जाणिवा प्रगल्भ करताना निसर्गदत्त अधिकार आणि हक्कासोबत माणसाला माणुसकीची हाक दिलेली आहे.

ही माणुसकीची हाक माणसाच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून देणारी असते. मानवी समाजव्यवस्थेतल्या वंचित, उपेक्षित घटकाला आपलेसे करीत त्याची दुःख वेदना ही आपलीच आहेत, हा विचार स्वीकारत आपल्या साहित्यात मांडणी करीत समाजमनाला आरसा दाखविणार्‍या ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. फ. मुं. शिंदे १२ ऑगस्ट, शुक्रवारी वयाच्या ७५ व्या वर्षात अर्थात अमृत महोत्सवात प्रवेश करीत आहेत. (Poet who arranges social reality F M Shinde Sir nashik Latest Marathi Article)

मराठी साहित्य आणि पुरोगामी साहित्यात आपल्या लिखाणाची, साहित्याची स्वतंत्र ओळख निर्माण करणार्‍या फ. मुं. सरांचा चाहता वर्ग देशभर आणि देशाबाहेरदेखील आहे. मराठी भाषिकांत कविसंमेलन रंगतदार करीत श्रोत्यांना, रसिकांना सूत्रसंचालनाच्या माध्यमातून खिळवून ठेवणारे कविवर्य फ. मुं. सरांच्या नावावर सत्तावीस कवितासंग्रह आहेत.

त्यांच्या कवितांतून सामाजिक प्रश्नांचा उकल आणि वेदना विद्रोहाची मांडणी केलेली निश्चितपणे लक्षात येते. त्यांच्या वाटेला आलेले दुःख, त्या दुःखातून आपल्या स्वतःला सावरत मार्गक्रमण केलेली वाट सरांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी अशीच आहे.

भारतीय समाजव्यवस्थेत आणि भारतीय लोकशाहीत माणूस केंद्रबिंदू मानला गेला आहे; पण जेव्हा हा माणूसच भारतीय लोकशाहीचा मारक ठरतोय, तेव्हा फ. मुं. सरांची कविता कागदावर राहत नाही, तर ती बोलू लागते.

लोकशाहीनं हक्क दिले

ज्यांनी ते घेतले

त्यांनीच थक्क केले

इतरांना अंधारात ठेवून

स्वतःचे घर लख्ख केले

भारतीय लोकशाहीच्या माध्यमातून न्याय, हक्काची मागणी करीत त्या हक्कांना पदरात पाडून घेत, स्वार्थी, भोंदू आणि सत्तापिपासू या गोष्टींकडे वाटचाल करणार्‍या वाटसरूंनी, जी देशाची वाट लावली, याविषयीची मांडणी करणार्‍या फ. मुं. शिंदे सरांची कविता आजदेखील तेवढीच योग्य आणि समर्पक अशी वाटते.

कारण, आजची परिस्थिती सर्वश्रृत अशीच आहे. आपल्या घरांना लख्ख करणार्‍या आणि जनतेला थक्क करणार्‍या माणसांची परिस्थितीच कवी मांडतात. काही वर्षांपूर्वी आपल्या घराची जेमतेम परिस्थिती असणारा माणूस राजकारणात गेल्यावर पुढच्या पंचवीस पिढ्यांची आर्थिक सोय करतो, हा त्यांच्या जीवनातला आणि लोकशाहीला संपविणारा, धनदांडग्यांना अभय देणारा प्रवासच फ. मुं. सर स्पष्ट आणि योग्य शब्दांत लिहितात. त्यांचे लिहिणे त्याचबरोबर श्रोत्यांसमोर मांडणे यातला गर्भितार्थ अतिशय संवेदनशीलतेने लक्षात येतो.

लोकशाही मरू नये म्हणून

माणसं मारली,

शांततेसाठीच बाही सारली

हा गहिवर आणि ही वास्तवता इथच थांबत नाही, तर ते आणखी पुढे लिहितात,

कत्तलीचा थोडाबहुत असतोच गहिवर

अहंकाराचे सुखद थरांवर थर

तर मित्रांनो, लोकशाही वाचवा

वार्‍यावर प्राण कुणाचेही नाचवा

लोकशाहीचा आधारस्तंभ असणारा आणि केंद्रबिंदूदेखील असणारा माणूस किती आणि कसा स्वतःला कुठे अहंकारात, धर्मात, जातीत, विषमतेत; त्याचसोबत मनभेदात अडकवून ठेवत स्वतःचे अस्तित्वच गहाण टाकण्याचा प्रयत्न करतोय, ही लोकशाहीची मारकता कवी वाचकांच्या लक्षात आणून देतात.

लोकशाहीला वाचविण्यासाठी जनता पुढे येण्याची गरज असण्याबरोबरच लोकशाही टिकली, जगली, तर माणसाचे जगणे सुसह्य होऊ शकते. त्यासाठीच लोकशाहीच्या मारेकर्‍यांना फ. मुं. सर सवालच करतात. त्यांची कविता कधी सामाजिक वास्तवाची वाट धुंडाळत जाते, तर कधी माणसाच्या अस्तित्वाची त्यालाच जाणीव करून देते, म्हणून हा कवी वाचकाला प्रचंड भावतो, त्यांच्या विचारांतून अपील होतो, तर कधी करुणेच्या बुद्ध महासागराकडे नेऊन मानव कल्याणाचा विचार जोपासत जातो.

त्यांची कविता ज्या सामाजिक जाणिवेची आठवण करून देते, त्या जाणिवा यातनांशी, दुःखाशी जोडल्या गेलेल्या आहेत. आयुष्य सजवीत असताना वाटेला आलेली दुःखे आणि आयुष्याशी चाललेला झगडा, हा साधा सोपा नाही. शेतकर्‍यांची, वंचितांची, गोरगरिबांची जात वास्तवतेची, विषमतेची दुःखे अनुभवलेली आणि पाहिलेली असल्याने फ. मुं. सरांच्या लेखनातील सारे संदर्भ सामाजिक मानसिकतेतून आलेली आहेत.

कुठल्या जाती, धर्मात न अडकता मानवी कल्याणाचा आविष्कार मांडणार्‍या विचारसमूहात आपली विचारधारा मांडणारा हा कवी आपल्या शब्दातील, लेखणीतील ताकद सर्वार्थाने एका चांगल्या मानवी समाजनिर्मितीसाठी उपयोगात आणत असतो.

आपली कविता समाजमान्य होण्यासाठी अनेक कवी धडपडत असतात; परंतु फ. मुं. सरांच्या कवितेने समाजमान्यता मिळविण्यासाठी धडपड न करता समाजातल्या अंध रूढी, परंपरा, शोषण, विषमता या गोष्टींवर आपल्या कवितेतून भाष्य करीत समाज एकसंध राहण्यासाठी जो प्रयत्न केला.

त्यामुळेच वाचक आणि समाजानेच सरांची कविता वाचकमान्य आणि समाजमान्यदेखील झाली. खोट्या अशा नैतिकतेचा बुरखा पांघरून दांभिकतेचा टेंभा मिरविणार्‍या अशा वृत्ती-प्रवृत्तींपासून सावध असण्याची गरज सर स्पष्ट करतात.

Marathi Poet F. M. Shinde Sir
ढिंग टांग : घाईलादेखील उशीर लागतो..!

एकटेपणाची कधी कधी भीती वाटते

तशी सोबतीचीही कधी कधी भीती वाटते

तनाचे, कीर्तनाचे हे केवढे व्यापार खुले

संतसज्जनांचीही कधी कधी भीती वाटते

समाजवास्तवाची दिशा कशी स्पष्ट होत जाताना दिसते आहे. एकाकी, एकटेपणा भीतिदायक तर आहेच; पण सोबतचा माणूस कधी दगा देईल, हे सांगता येत नाही, तर शोषण आणि शोषितांचे दिवसाढवळ्या चाललेले अन्याय यामुळे उद्विग्न होणारे मन ही विषमता संपविण्यासाठी कधी ऊर्जामय होईल, असा प्रश्न असताना ज्याकडे धाव घ्यावी, अशा संतसज्जनांनीदेखील धर्माची, जातीची दुकाने थाटली आहेत, पडद्याआड असणारे त्यांचे चेहरे बदमाषगिरीत अग्रेसर आहेत आणि म्हणूनच समाजव्यवस्थेतल्या स्त्री, पुरुषाला त्यांचीदेखील भीती वाटण्याची वास्तवता फ. मुं. सर मांडतात. ही मांडणी वाचकमान्य होते, हेच सरांच्या कवितेचे सर्वांत मोठे यश आहे.

अस्मितादर्श परिवाराशी आपली साहित्यिक आणि पारिवारिक नाळ जोडणाऱ्या फ. मुं. सरांनी परिवारासोबत एकनिष्ठता बाळगत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार धारेला अंगीकारत सामाजिक विषमतेला नाकारत आपल्या लेखणीतून प्रस्थापित समाज व्यवस्थेला जाब विचारले मराठवाडा विद्यापीठांच्या नामांतर आंदोलनात सहभागी होताना अनेकांचा विरोध त्यांनी झुगारला आपल्या स्वतंत्र अशा लेखणीचे हत्यार त्यांनी वापरत तत्कालीन परिस्थितीवर सार्वमत हा कवितासंग्रह काढला एक इतिहासच त्यांनी यानिमित्ताने निर्माण केला डॉ. बाबासाहेब आंबेडकर या कवितेत ते लिहितात,

काय गंमत!खरंच,

तुमच्या संदर्भाशिवाय

लोकसभा हलत नाही

विधानसभा हलत नाही

राज्यघटनेला

शब्द फुटत नाही;

काय गंमत!खरंच,

विद्यापीठाला तुमचं नावं

तरीही का पटत नाही!

वास्तवता मांडत समाजातील विषारी आणि जातीयवादी किडलेली मानसिकता सर आपल्या कवितेतून मांडतात हा सवर्ण तो दलित ही विषमता अमान्य करीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची महती गातात आपल आचरण उक्ती आणि कृतीत त्यांनी कधी फरक जाणवू दिला नाही आणि यामुळेच महाराष्ट्रातल्या मराठी मातीनं त्यांना भरभरून ओलावा दिला आहे ज्येष्ठ कवी तथा समीक्षक प्रा. डॉ. केशव सखाराम देशमुख फ. मुं. शिंदे सरांच्या साहित्य आणि एकूणच व्यक्तिमत्त्वाविषयी मांडतात "सर्वप्रिय अशी ओळख घेऊन कवितेच्या क्षेत्रात मुशाफिरी करणारे फ. मुं.शिंदे मिश्किल आणि गंभीर अशा दोन धारा घेऊन व्यक्त होत राहिले आहेत.

कुठलाही आव न बाळगणाऱ्या या कवीचा स्वभाव दिलखुलास मस्त कलंदर आहे भाषेवर विलक्षण पकड असणाऱ्या फमुंनी अंतरंगांचे सर्व रंग कवितेमधून ओले ठेवलेले पहावयास मिळतात हा कवी करुणेची गाथा वाचतो हा कवी वेदनेची गाणी लिहितो हा कवी लोकशाही वाद कवितेमधून टवटवीत ठेवतो हा कवी माणसांच्या श्वासाचा शब्द मांडतो हा कवी समतेची भाषा समाजाला प्रदान करतो".

सरांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख अतिशय समर्पक योग्य अशा शब्दात देशमुख सर करून देतात सरांनी आपल्या लिखाणाचा पोत ढळू दिला नाही ही त्यांची वैशिष्ट्ये साऱ्या वाचकांना ज्ञात आहेत.

सरांचे व्यक्तिमत्त्व बोलके आणि समाजातल्या वंचित, उपेक्षित, शेवटच्या घटकाशी नाते सांगणारे, नात्याचा आणि प्रेमाचा वर्षाव करणारे, भेटणार्‍या प्रत्येक व्यक्तीला मित्रच वाटणारे, नवोदितांना आपले पालकत्व बहाल करणारे या सार्‍या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या खुणा प्रत्येकाशी कौटुंबिक जिव्हाळा निर्माण करणार्‍या ठरल्या आहेत. त्यांनी मराठी साहित्यात दिलेले योगदान महत्त्वपूर्ण असेच आहे.

८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची झालेली निवड त्यांच्या साहित्य सेवेचा बहुमानच होता. साहित्याची व्याख्या करताना त्यांनी म्हटले आहे, “ साहित्य समाजाचं देणं लागतं, ही फक्त बांधिलकी नसून बांधिलकीच्या भूमिकेवरची अढळ श्रद्धा असते. साहित्यानं माणुसकीच्या श्रद्धा जोपासायच्या असतात. त्या या जीवनार्थानं.”

साहित्यासाठी आपल्या जगण्याची दिशा ठरविणारे फ. मुं. शिंदे सरांनी मराठी भाषेच्या वाचकाला आपल्या साहित्याच्या माध्यमातून भरभरून दिलेले आहे. त्यांच्या पंच्याहत्तरीच्या अर्थात वयाच्या अमृत महोत्सवानिमित्त मनस्वी शुभेच्छा...!

डॉ.मिलिंद विनायक बागूल,

अध्यक्ष,

भीमरमाई प्रतिष्ठान जळगाव

भ्रमणध्वनी - 9423185505

Marathi Poet F. M. Shinde Sir
दुनियादारी : काही दुर्मीळ कलाकृती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com