गोडवा मराठीचा!

पूजा सामंत
बुधवार, 27 फेब्रुवारी 2019

आत्मविश्‍वास देणाऱ्या मराठीचा मला अभिमान आहे. भाषेतील गंमत मला जगण्याचा आनंद देते.

आत्मविश्‍वास देणाऱ्या मराठीचा मला अभिमान आहे. भाषेतील गंमत मला जगण्याचा आनंद देते.

"माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा।' या कुसुमाग्रजांच्या शब्दांत मराठीविषयी अभिमान व्यक्त करतो आपण. कधी कधी प्रश्‍न पडतो, मला या भाषेने काय दिले? माझे मन मला कौल देते, की मराठी भाषेने मला जगायला शिकविले, आत्मविश्‍वास दिला, मनातील भाव प्रकट करण्याचे सामर्थ्य दिले, अस्तित्व सिद्ध करण्याची संधी दिली. माझ्या भाषेचे काय वर्णन करावे... संत साहित्य-अभंग, कविता, उखाणे, भोंडल्याची गाणी, पोवाडे, लावणी अशा कितीतरी प्रकारांनी सजलेली आपली ही भाषा. मराठी भाषेतील शब्दांमधील काना, मात्रा, वेलांटी, उकार, अनुस्वार म्हणजेच आपल्या या भाषेचे सुबक दागिने. या सर्वांमुळे मराठी भाषा अधिकच खुलली आहे. एकाच शब्दाला काना-मात्रा-वेलांटी दिली, की अनेकविध अर्थांच्या छटा निर्माण होतात. जसे "सर, सैर, सार, सारा, सरी, सुरी, सुरू...' म्हणजेच मूळ अक्षरांना काना-मात्रा-वेलांटी, उकार जोडले, की नवनवीन अर्थाचे शब्द तयार होतात.

मराठी भाषेत शब्दांनाही एक वेगळेपण आहे. भक्तीचे शब्द, मायेचे शब्द, भीतीचे शब्द, आश्‍चर्याचे शब्द, प्रेरणादायी शब्द, रागाचे शब्द असे हे आपल्या जगण्याला अर्थ प्राप्त करून देणारे शब्द. "आई' या हाकेत वात्सल्य आहे, तर "आई गं'मध्ये दुःख, वेदना. "बापमाणूस'मध्ये थोरपण व्यक्त होते, तर "बाप रे'च्या उच्चारासरशी आश्‍चर्य, भीती. "वा' या शब्दात शाबासकी आहे, कौतुक आहे, अशा विविध शब्दांच्या साथीनेच तर आपण जगत असतो. अशी ही साधी सरळ मराठी भाषा. म्हणूनच तर ती प्रत्येकाला जवळची भाषा वाटते.

सध्या मराठीची गोडी कळावी, वाढावी म्हणून सर्व स्तरांतून प्रयत्न होताना दिसत आहेत. त्याचेच उदाहरण म्हणजे नववी, दहावीच्या मराठी विषयात आता "स्वमत' हा प्रकार आला आहे. एखादा विषय देऊन त्यावर मुलांनी आपले मत मांडायचे, मग ते चांगले, वाईट दोन्ही असू शकते. मुलांना विचार करायला भाग पाडणे, हाच यामागचा हेतू असावा. हा निर्णय खरेच स्वागतार्ह आहे. नुसतीच प्रश्‍नांची उत्तरे पाठ करून न लिहिता, तो विषय समजावून घेऊन यावर स्वतःचे मत मांडणे, ही मुलांच्या आत्मविश्‍वासाच्या, भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाची व उपयोगी गोष्ट आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pooja samant write article in muktapeeth