विमानातील सहकार्य

प्रभा हाटले
शनिवार, 6 ऑक्टोबर 2018

माझ्याबरोबर आलेल्या अण्णांचे विमानातच निधन झाले. त्या कठीण प्रसंगी डॉक्‍टर, हवाई सुंदरी, पोलिस सारेच खूप धीर देत राहिले.

माझ्याबरोबर आलेल्या अण्णांचे विमानातच निधन झाले. त्या कठीण प्रसंगी डॉक्‍टर, हवाई सुंदरी, पोलिस सारेच खूप धीर देत राहिले.

जावयांच्या वडिलांना घेऊन अमेरिकेला निघाले. पहाटे थोडा उजेड दिसू लागल्यानंतर चहा घेतला. खिडकीजवळ बसलेले अण्णा बाथरूममध्ये गेले. दहा मिनिटे झाली, तरी अण्णा आले नाहीत. तेव्हा हवाई सुंदरीला बोलावून घेतले. आतून उत्तर नाही. मी घाबरले. अखेर बिजागरे काढून दरवाजा उघडला. अण्णांना बाहेर काढले. तेथील डॉक्‍टरांनी प्राथमिक उपचार चालू केले. छातीवर जोरजोराने दाब दिला. मसाज केले. एकाने ऑक्‍सिजन सुरू केला. फनेल तोंडावाटे टाकून कृत्रिम श्‍वासोच्छ्वास देण्यात आला. अजून एक-दोन डॉक्‍टर मदतीला आले. साधारण अर्धा तास उलटून गेला होता. पायलटने कुठल्याशा विमानतळाशी संपर्क साधला होता. आतून एक आयताकृती मशिन आणून काही वायर जोडून एक हवाईसुंदरी बातचीत करीत होती. विमानतळावरून येणाऱ्या डॉक्‍टरच्या सल्ल्यानुसार येथील डॉक्‍टर काम करीत होते. पण, काहीच हालचाल नव्हती. हृदयाची स्पंदने बंदच पडल्याने सर्व काही संपले होते. मी हबकूनच गेले. तेथील मुख्य हवाईसुंदरी माझ्या शेजारी येऊन बसली. मला समजाविण्यात आले.

ंमाझ्या हाताची थरथर तिच्या लक्षात आली. तिने खुणेने डॉक्‍टरांना बोलावले. माझा रक्तदाब तपासला. मला विचारून माझ्या पर्समधील गोळी दिली. पुन्हा अर्ध्या तासाने डॉक्‍टरांनी माझे बीपी तपासले. हवाई सुंदरीने थोड्या वेळाने माझा जबाब नोंदवला. त्यांना काय औषधे दिली, काय जेवण दिले. स्वतः काय इतर खाल्ले का? वगैरे. अजून तीन तास घालवायचे होते. विमान सॅन फ्रान्सिस्कोला उतरले. विमानातील सर्व प्रवाशांना थांबवण्यात आले. विमानाजवळ एक खास गाडी आली. त्यातून सात-आठ पोलिस अधिकारी दोन कुत्री घेऊन आले. मग अण्णांचा देह खाली नेला. नंतर एक महिला पोलिस अधिकारी आणि विमानतळावरील प्रमुख अधिकारी माझ्याकडे आले. तुम्ही नातेवाईक असल्याने तुमच्याशी थोडे बोलायचे आहे, अशी विनंती केली. माझ्याकडून प्राथमिक माहिती घेतली गेली. दुसऱ्या बाजूने इतर प्रवाशांना सोडण्यात आले. सर्व जण शांतपणे निघून गेल्यावर शेवटी मला गाडीतून नेले. मला सांगितले, की तुम्ही काहीच काळजी करू नका. त्यांनीच माझ्या जावयाला बोलावून कल्पना दिली. अण्णांचे कॅबीन लगेज सील करून घेऊन गेले. नंतर तिसऱ्या दिवशी अण्णांचे सामान दिले. पाचव्या दिवशी आलिशान सजविलेल्या गाडीने मृतदेह स्मशानभूमीत दोन अधिकारी घेऊन आले. दहनविधी होताना सॅल्युट केला. कठीण समयी किती चांगले वागले हे सारे!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prabha hatale write article in muktapeeth