प्रेम मित्रांचे

प्रभा रमाकांत कवठेकर
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

त्यांच्यातील कलावंताने खूप जणांकडून प्रेम मिळवले, मैत्र जोपासले.

त्यांच्यातील कलावंताने खूप जणांकडून प्रेम मिळवले, मैत्र जोपासले.

रमाकांत कवठेकर यांचे दिल्लीला चित्र प्रदर्शन होते. उल्हासदादा पवार प्रदर्शन पाहायला यशवंतराव चव्हाण यांना घेऊन गेले. त्यांनी दीड-दोन तास प्रदर्शन बघून यांच्याशी चर्चा केली. त्याच वेळेस दिल्लीच्या कला दालनामध्ये ऑल इंडिया असोसिएशनचे प्रदर्शन भरले होते. यशवंतरावांनी यांचे एखादे चित्र तेथे देण्याचा आग्रह केला. देशो-देशीची मोठमोठ्या चित्रकारांची चित्रे तिथे लावलेली होती. यांना पहिले बक्षीस मिळाले. त्या वेळी हे दिल्लीला मोहन धारिया यांच्याकडे उतरले होते. खरे तर त्याचाही किस्सा आहे. यांची दिल्लीत ना ओळख होती, ना राहायची सोय. हे सहज म्हणून धारियांकडे गेले. धारियांनी यांची सगळी चौकशी केली. एक कलावंत एवढी धडपड करतो आहे. पुण्याहून आला आहे म्हणताच धारियांनी सांगितले, ""सामान घेऊन ये, आजपासून प्रदर्शन संपेपर्यंत तू माझ्याकडे राहायचे. जेवण-खाण कुठलीच काळजी करायची नाही.'' तर यांना बक्षीस मिळालेले समजताच धारियांनी यांना, पुण्याला घरी कळवलेस का, विचारले. फोन नसल्याची अडचण समजताच आमच्या घराजवळ आगरकर हायस्कूलच्या मुख्याध्यापकांच्या घरी फोन करून आम्हाला पुण्यात ही आनंदाची बातमी कळवली.

उल्हासदादा आणि यांची मैत्री खूप जुनी. साहित्य, कला, संगीत यावर रात्र-रात्र चर्चा चालत असे. दोघांचीही निरीक्षणे जबरदस्त असत. माहितीचा खजिना असे. दादा घरी आले की त्यांचे जबरदस्त स्वागत असायचे. एकदा रात्री साडेबाराला आम्ही सर्व झोपणार, एवढ्यात दार वाजले. नुकतेच दिवे मालवून पाठ टेकली होती. आता दार उघडू नये असेच वाटत होते. पण दारात दादा उभे. दादांचे नेहमीप्रमाणे जोरदार स्वागत केले. नेहमीप्रमाणे चार वाजेपर्यंत गप्पा रंगल्या. यांचे व दादांचे प्रेम काही वेगळेच होते. दादांच्याही घरातले सगळेच यांच्यावर खूप प्रेम करायचे. त्यांची आई तर फारच प्रेम करावयाची. कवठेकरांमधील कलावंताने खूप जणांचे मैत्र मिळवले, प्रेम मिळवले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prabha kawthekar write article in muktapeeth