नावात काय आहे?

प्रभा सोनवणे
गुरुवार, 7 मार्च 2019

नाव असते त्या व्यक्तीची ओळख. म्हणून दुसऱ्याला नाव ठेवण्याआधी विचार करायला हवा, नाही का!

नाव असते त्या व्यक्तीची ओळख. म्हणून दुसऱ्याला नाव ठेवण्याआधी विचार करायला हवा, नाही का!

एका मैत्रिणीचा फोन आला. ती म्हणाली, ""तुझा नातू खूप शूर होणार, ढाण्या वाघासारखा! आताच बातमी वाचली, कात्रज गार्डनमधल्या वाघिणीला चार पिल्ले झाली, त्यातल्या एका बछड्याचे नाव "सार्थक' ठेवलेय. मला तुझाच सार्थक आठवला!'' तोपर्यंत मी ती बातमी वाचली नव्हती. छान वाटले, सार्थक नाव वाचून. सार्थक हे नाव माझ्या मुलाच्या आवडीचे. सार्थकचे राशीनाव "ढाणोजी' आहे. म्हणजे तसाही सार्थक ढाण्या वाघच! शेक्‍सपियर या महान लेखकाने म्हटलेय, "नावात काय आहे?' पण नावात बरेच काही आहे. एक लहानपणीची आठवण सांगते. माझ्या एका आजीला मांजरे खूप आवडायची. तिने एका मांजरीचे नाव "गुणी' ठेवले होते! पण "गुणीऽऽ गुणीऽऽ' अशी हाक मारली की त्यांच्या एका सुनेला खूप राग येई. त्या म्हणत, ""मुद्दाम मांजरीचे नाव गुणी ठेवलेय. कारण माझ्या आईचे नाव "गुणवंताबाई' आहे!'' खरे तर त्या आजी अगदी साध्या होत्या, त्यांना लक्षातही नसेल सुनेच्या आईचे नाव! पण सुनेला तसे वाटणे हाच नामाचा महिमा!

तुम्ही कोणते नाव कुठे, कशा पद्धतीने वापरता त्यावरून तुमची वृत्ती कशी आहे ते समजते. माझ्या नावाची गंमत अशी, की माझ्या आईला व आजीला माझी नावे वेगळीच ठेवायची होती. पण "देवबाप्पा' चित्रपटाचे गारूड लोकांच्या मनावर अनेक वर्षे राहिले. "देवबाप्पा'तील चंदाराणी ही व्यक्तिरेखा खूपच लोकप्रिय झाली होती. म्हणून माझ्या मामानी माझे नाव चंदाराणी ठेवले, जे फक्त सात-आठ वर्षांच्या मुलीलाच शोभून दिसते! पुढे लग्न झाल्यावर सासूबाईंनी प्रभा हे नाव ठेवले. ते मला अजिबातच आवडले नव्हते. पण त्या काळात पाहिलेल्या "छोटी सी बात' चित्रपटातील नायिकेचे नाव प्रभा होते आणि तेव्हा वाचत असलेल्या राजेंद्र यादव यांच्या "सारा आकाश' या कादंबरीची नायिकाही प्रभाच होती... आणि त्या दोन्ही नायिका मला आवडल्या होत्या! त्यामुळे फारसे न आवडलेले नाव मी स्वीकारले! आपले नाव ही आपली ओळख असते.

Web Title: prabha sonawane write article in muktapeeth