अफवेचे अस्त्र

प्रदीप कुलकर्णी
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

अफवा पसरवून एखाद्याला नामोहरम करणे सहज शक्‍य असते. लढण्याच्या अन्य मार्गांपेक्षा अफवेच्या वाटने जाणे तुलनेने सोपेही असते. पण तेच अस्त्र आपल्यावरही उलटू शकते, या बूमरॅंग सत्याचा विसर पडू देऊ नये.

अफवा पसरवून एखाद्याला नामोहरम करणे सहज शक्‍य असते. लढण्याच्या अन्य मार्गांपेक्षा अफवेच्या वाटने जाणे तुलनेने सोपेही असते. पण तेच अस्त्र आपल्यावरही उलटू शकते, या बूमरॅंग सत्याचा विसर पडू देऊ नये.

दाबून ठेवलेली वाफ जशी विध्वंसक असते ना, तशीच अफवाही विध्वंसक असते. अफवेची वाफ काय करील, हे सांगता येत नाही. दोन हजार माणसे करू शकणार नाही, असे काम एक अफवा करू शकते. आतापर्यंत या अफवेमुळे असंख्य लोकांचे बळी पडले आहेत. नुकत्याच मुंबईच्या एल्फिन्स्टन रेल्वे पुलावर झालेली चेंगराचेंगरी हे त्याचे अगदी ताजे उदाहरण आहे. सकाळी नेहमीच्या गर्दीच्या वेळी, रोजच्या कामकाजासाठी लोक एल्फिन्स्टन रेल्वे पुलांवरून जात होते. असे सांगतात, की गर्दीतल्या एका माणसाच्या हातातली फुले खाली पडली. त्या वेळेस त्याच्याबरोबर असलेला म्हणाला, ""अरे! फूल गिरा।' पुलावरून जाणाऱ्या त्याच्या आसपासच्या लोकांनी "फूल गिरा'च्याऐवजी "पूल गिरा' असे ऐकले आणि चुकीचा संदेश अर्थात अफवा इतकी वेगाने पसरली, की आपण उभे असलेला रेल्वे पूल पडला, असेच कित्येकांना वाटले. हे ऐकताच पुलावरील लोक जीव मुठीत घेऊन सैरावैरा पळत सुटले. त्यामुळे चेंगराचेंगरी होऊन अनेक लोक मृत्युमुखी पडले. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमध्ये हिंसाचार झाला. त्यामध्ये एक प्रसिद्ध क्रिकेटपटू उमर अकमल मारला गेल्याची अफवा पसरली. प्रत्यक्षात त्याच्यासारखी दिसणारी दुसरीच व्यक्ती मारली गेली होती. या अफवेचा अकमलला इतका मानसिक त्रास झाला, की अखेर त्याने दूरचित्रवाणी वाहिनीवर येऊन आपण जिवंत असल्याचे निवेदन दिले. या उदाहरणांवरून, अफवा या किती भयानक आणि परिणामकारक असतात, हे आपल्या लक्षात आले असेलच.

अफवा या अनेक प्रकारच्या आणि अनेक कारणास्तव पसरवल्या जातात. कधी विमानात, रेल्वे डब्यात बॉंब ठेवण्यात आला आहे, अमूक अमूक भागात जातीय दंगल पसरली आहे, कुठेतरी आग लागली आहे, दोन हजारांच्या नव्या नोटेमध्ये जीपीएस चिप बसवण्यात आली आहे. अशा प्रकारच्या किती तरी अफवा आपण ऐकतो. तसेच, अफवा अनेक कारणास्तव पसरवल्या जातात. जेव्हा एखाद्या व्यक्तीकडून किंवा गटाकडून एखादी अफवा पसरवली जाते, तेव्हा त्यामागे त्या व्यक्तीचे किंवा गटाचे एखाद्या व्यक्तीशी असलेले वैयक्तिक शत्रुत्व, अहंकार, स्वार्थ, झुंडशाही, दहशत, दादागिरी आणि लोकांनी कान भरल्यामुळे झालेला गैरसमज आदींचा समावेश असतो. एखाद्या व्यक्तीचा आवाज बंद करायचा असेल, विरोध मोडून काढायचा असेल किंवा काटा काढायचा असेल, तर सगळ्यात परिणामकारक अस्त्र ठरते अफवा. अफवेच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीचे चारित्र्यहनन करून त्याची सामाजिक बदनामी केली जाते. दुसऱ्याचे महत्त्व कमी करून स्वतःचे महत्त्व वाढवण्यासाठीही अफवेचा वापर केला जातो. वाऱ्याच्या वेगाने आणि अग्नीच्या दाहकतेने पसरणाऱ्या अफवेच्या किंवा खोटेपणाच्या गतीचे वर्णन करणारी एक म्हण आहे- "सत्य शोधण्यासाठी बाहेर पडल्यावर पायात चप्पल घालून तयार होईपर्यंत असत्य किंवा अफवा गावभर हिंडून आलेली असते.' दुर्दैव म्हणजे लोकांचा सत्यापेक्षा खोटेपणावर किंवा अफवेवर वेगाने विश्‍वास बसताना दिसतो.

छत्रपती शिवाजी महाराजांनी अफवेचे अस्त्र वेगळ्या प्रकारे वापरून आपले बुद्धिचातुर्य दाखवून दिले. औरंगजेबाने शिवाजी महाराजांना आग्रा येथे बोलावून घेतले होते. आपल्याला कैद करून ठार मारण्याचा औरंगजेबाचा कट आहे, हे शिवाजी महाराजांना चांगलेच ठाऊक होते; पण महाराज आग्रा येथे पोचेपर्यंत त्यांच्या गुप्तहेरांनी आधीच एक अफवा पसरवली, की शिवाजी महाराज एक चतुर, बिलंदर जादूगार असून ते केव्हाही गायब होतात आणि अचानक कोठेही प्रगट होऊन शत्रूवर हल्ला करतात. हे ऐकून औरंगजेबाच्या सैन्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले. त्यांना समोरचा प्रत्येक माणूस शिवाजी महाराज असल्याचा संशय येऊ लागला. प्रत्यक्ष औरंगजेबही भीतीने बिथरला होता. केवळ एका अफवेमुळे शिवाजी महाराजांचे आग्र्याहून सुटका करून घेतानाचे सर्व डावपेच यशस्वी झाले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी त्यांच्या मुलाच्या हेडमास्तरांना लिहिलेल्या पत्राद्वारे सर्व समाजाला एक परखड संदेशच दिला आहे. ते आपल्या पत्रात म्हणतात- "सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात, नसतात सगळी सत्यनिष्ठ, हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी. त्याला हेदेखील शिकवा, की जगात प्रत्येक बदमाशागणिक असतो एक साधुचरित पुरुषोत्तमही! स्वार्थी, राजकारणी असतात जगात, तसे असतात अवघे आयुष्य समर्पित करणारे नेतेही! असतात टपलेले वैरी, तसेच जपणारे मित्रही! गुंडांना भीत जाऊ नकोस म्हणावे, त्यांना नमवणे सर्वांत सोप्पे असते! त्याला सांगा, त्याने भल्यांशी भलेपणाने वागावे आणि टग्यांना अद्दल घडवावी! त्याला शिकवा, तुच्छतावाद्यांना तुच्छ लेखायला आणि चाटुगिरीपासून सावध राहायला! धिक्कार करणाऱ्यांच्या झुंडी आल्या तर त्यांच्याकडे काणाडोळा करायला शिकवा त्याला! आणि ठसवा त्याच्या मनावर जे सत्य आणि न्याय्य वाटते त्याच्याशी पाय रोवून लढत राहा!'

अफवेचे अस्त्र वारंवार यशस्वी होताना अनुभवाला येत असते. पण कधीतरी तेच अस्त्र परतू शकते आपल्यावरच, हे एक निसर्गनिर्मित बूमरॅंग सत्य आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pradeep kulkarni write article in muktapeeth